“द्या पेटवून!”

३१ मार्च २०२३ च्या रात्री कानावर पडलेले हे शब्द मोहन बहादुर बुधाला आजही नीट आठवतायत. काही क्षणात ११३ वर्षं जुना असलेला मदरसा अझिझिया जाळून टाकण्यात आला होता.

“लायब्ररीचं मुख्य दार तोडून लोक ओरडत आत आले ते मला ऐकू आलं. मी बाहेर आलो तर ते आधीच लायब्ररीत घुसले होते आणि तिथे तोडफोड सुरू केली होती,” सुरक्षारक्षक असणारा २५ वर्षांचा बुधा सांगतो.

पुढे तो म्हणतो, त्या लोकांच्या हातात “भाला, तलवारी होत्या. विटा होत्या. वो लोग चिल्ला रहे थे, ‘जला दो, मार दो’.”

‘कपाटात २५० कलमी [हस्तलिखित] पुस्तकं होती. त्यात तत्त्वज्ञान, वैद्यकशास्त्र आणि वक्तृत्व अशा विषयांवरची पुस्तकंही होती’

बुधा नेपाळहून इथे स्थलांतरित झाला आहे. तो गेल्या दीड वर्षापासून बिहारशरीफच्या मदरसा अझिझियामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो आहे. “मी त्यांना हे थांबवायची विनंती केली तर त्यांनी माझ्याच अंगावर यायला लागले. गुद्दे मारून ते म्हणाले, ‘साला नेपाली, भागो यहां से, नही तो मार देंगे’.”

३१ मार्च २०२३ रोजी शहरात काढलेल्या राम नवमीच्या शोभायात्रेदरम्यान दंगलखोरांनी इस्लामचं शिक्षण देणाऱ्या आणि वाचनालय असलेल्या मदरसाला आग लावली तेव्हाचे प्रसंग तो सांगतोय.

“लायब्ररीत आता काहीही राहिलेलं नाहीये,” बुधा म्हणतो. “आता त्यांना सुरक्षारक्षकाची गरजच नाहीये. माझं काम सुटलं.”

पारीने एप्रिल २०२३ मध्ये मदरशाला भेट दिली. बिहारच्या नालंदा जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या बिहारशरीफ गावातल्या फक्त या मदरशावर नाही तर अनेक प्रार्थनास्थळांवर दंगलखोरांनी हल्ला केला होता. सुरुवातीला शहरात कलम १४४ खाली संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आलं. एक आठवड्यानंतर दोन्ही उठवण्यात आलं.

याच मदरशातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले सईद जमाल सुन्नपणे तिथे फिरत होते. “या वाचनालयात किती सारी पुस्तकं होती, पण मी काही ती सगळी वाचू शकलो नव्हतो,” ते म्हणतात. १९७० मध्ये ते तिसरीत या मदरशात दाखल झाले आणि आलिम होऊन (पदवीधर) इथून बाहेर पडले.

“काही तरी राहिलंय का ते पहायला मी आलोय,” हसन सांगतात.

PHOTO • Umesh Kumar Ray
PHOTO • Umesh Kumar Ray

डावीकडेः लायब्ररीचा सुरक्षारक्षक मोहन बहादुर बुधा सांगतो की जमावाकडे भाला, तलवारी आणि हल्ला करण्यासाठी विटा होत्या. उजवीकडेः तोडपोड, जाळपोळ केल्यानंतरचं लायब्ररीतलं दृश्य

सत्तर वर्षीय हसन सभोवताली पाहतात तेव्हा स्पष्टच दिसतं की कधी काळी जिथे ते शिकले ते सभागृह पूर्णपणे बेचिराख झालंय. सगळीकडे फक्त पूर्ण जळालेल्या काळ्या कागदांचा आणि अर्धवट जळालेल्या पुस्तकांचा खच पडलाय. ज्या लायब्ररीत बसून विद्यार्थी आणि शिक्षकांनी वाचन आणि संशोधन केलंय तिच्या सगळ्या भिंती धुराने काळ्या पडल्यात. कुठे कुठे भेगा दिसू लागल्या आहेत. जळालेल्या पुस्तकांचा वास हवेत भरून राहिलाय. पुस्तकं ठेवली होती ती अगदी पुरातन अशी लाकडी कपाटंसुद्धा आता जळून खाक झाली आहेत.

एकशे तेरा वर्षं जुन्या मदरसा अझिझियामध्ये सुमारे ४,५०० पुस्तकं होतीय त्यातली ३०० पुस्तकं तर इस्लाम धर्मासाठी पवित्र मानली जाणारी हाताने लिहिलेली संपूर्ण कुराण आणि हदिथची पुस्तकं होती. शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद शाकिर कासमी सांगतात, “इथे या कपाटांमध्ये २५० कलमी [हस्तलिखित] पुस्तकं होती. तत्त्वज्ञान, वक्तृत्व आणि वैद्यकावरचीही पुस्तकं त्यात होती. शिवाय प्रवेशाच्या नोंदवह्या, गुणपत्रिका, १९१० पासून इथे शिकलेल्या मुलांची प्रमाणपत्रं असं सगळं काही या लायब्ररीत होतं.”

त्या दिवशीची परिस्थिती आठवून कासमी सांगतात, “मी सिटी पॅलेस हॉटेलजवळ आलो आणि तेव्हाच माझ्या ध्यानात आलं की शहरातली परिस्थिती फारच गंभीर झाली होती. सगळीकडे नुसता धूरच धूर. सध्याची [राजकीय] परिस्थिती अशी नाही की आम्ही घराच्या बाहेर पडू शकू.”

दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्याध्यापक कासमी मदरशात आत शिरू शकले. तीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात वीज नव्हती. “मी एकटाच इथे पहाटे ४ वाजता आलो. मी हातातल्या मोबाइलच्या विजेरीच्या उजेडात पाहत होतो. मला असला धक्का हसला. मी स्वतःला सावरूच शकलो नाही.”

*****

PHOTO • Umesh Kumar Ray
PHOTO • Umesh Kumar Ray

डावीकडेः मदरसा अझिझियाचे मुख्याध्यापक मोहम्मद शाकिर कासमी यांची पिढी त्यांच्या कुटुंबातली शिक्षण घेणारी पहिलीच. १ एप्रिल रोजी तिथली परिस्थिती पाहून त्यांना जबर धक्का बसला. उजवीकडेः लायब्ररीतली अर्धवट जळालेली पुस्तकं

मदरसा अझिझियाच्या प्रवेशद्वारापाशी सहासात लोक मच्छी विकतात. इथे लोकांची भरपूर वर्दळ असते. विक्रेत्यांचा मालभाव जोरजोरात सुरू असतो. लोक रस्त्याने ये जा करतायत. सगळं काही सुरळित असल्यासारखं भासतंय.

“मदरशाच्या पश्चिमेकडे मंदीर आहे आणि पूर्वेला मस्जिद. गंगा-जमुनी तहजीब म्हणजे काय त्याची ही बेहतरीन अलामत [उत्तम खूण] आहे,” कासमी सांगतात.

“आमच्या अझानचा त्यांना त्रास व्हायचा नाही किंवा त्यांच्या भजनांचा आम्हाला. मी विचारही केला नव्हता की हे दंगलखोर आमची ही तेहजीब अशी उद्ध्वस्त करतील. फार फार वाईट वाटतंय आम्हाला.”

शाळेतल्या काही जणांचं म्हणणं होतं की दुसऱ्या दिवशी देखील दंगलखोरांनी इतर खोल्यांमध्ये पेट्रोल बाँब टाकून नुकसान करण्याचा प्रयत्न केला. किमान बारा दुकानं आणि गोदामांचं नुकसान झालं आणि माल लुटला गेला. इथल्या स्थानिकांनी दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या प्रती आम्हाला लोक दाखवत होते.

धार्मिक दंगे आणि हिंसा बिहारशरीफसाठी नवीन नाही. १९८१ साली इथे मोठे धार्मिक दंगे उसळले होते पण अगदी तेव्हाही या लायब्ररीला आणि मदरशाला कुणी हात लावला नव्हता असं स्थानिक सांगतात.

*****

PHOTO • Shreya Katyayini
PHOTO • Shreya Katyayini

डावीकडेः या मदरशाची स्थापना बीबी सोघरा यांनी १८९६ साली पटणा इथे केली आणि १९१० मध्ये तो बिहारशरीफला हलवण्यात आला. उजवीकडेः मुख्याधापक कासमी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेत जमा झालेल्या विद्यार्थिनांचा एक जुना फोटो पारीला दाखवतात

बीबी सोघरा यांनी १८९६ साली सुरू केलेल्या या मदरशात एकूण ५०० मुलं मुली शिक्षण घेतात. इथे प्रवेश घेतल्यानंतर अगदी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत इथे शिकता येऊ शकतं. बिहार राज्य परीक्षा महामंडळाच्या तोडीस तोड शिक्षण इथे मिळतं.

बीबी सोघरांनी आपले शौहर, या भागातले जमीनदार अब्दुल अझीझ यांचं निधन झाल्यानंतर या मदरशाची स्थापना केली. “त्यांनी बीबी सोघरा वक्फ इस्टेटची देखील स्थापना केली. वक्फच्या जागेचा वापर सामाजिक कामांसाठी केला गेला. शिक्षण मिळावं म्हणून मदरसे, दवाखाना, मशिदींसाठी देखभाल खर्च, निवृत्तीवेतन, अन्नदान आणि इतरही बऱ्याच गोष्टी केल्या गेल्या,” हेरिटेज टाइम्सचे संस्थापक उमर अश्रफ सांगतात.

तालीम-इ-नाबालिगान – या युएनएफपीए, बिहार मदरसा बोर्ड आणि बिहार शिक्षण विभागातर्फे २०१९ मध्ये सुरी करण्यात आलेल्या किशोरवयीन मुलांसाठीच्या कार्यक्रमातही हा मदरसा सहभागी होता.

“ही जखम कदाचित भरून निघेल, पण त्याचं दुःख मात्र कायम सलत राहणार आहे,” बीबी सोघरा वक्फ इस्टेटचे प्रशासक मोख्तरुल हक सांगतात.

Video : Shreya Katyayini

Shreya Katyayini is a filmmaker and Senior Video Editor at the People's Archive of Rural India. She also illustrates for PARI.

Other stories by Shreya Katyayini
Text : Umesh Kumar Ray

Umesh Kumar Ray is a freelance journalist based in Bihar

Other stories by Umesh Kumar Ray
Editor : Priti David

Priti David is the Executive Editor of PARI. She writes on forests, Adivasis and livelihoods. Priti also leads the Education section of PARI and works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Priti David