“मी बांधलेली प्रत्येक झोपडी कमीत कमी ७० वर्षं टिकते.”

कोल्हापूरच्या जांभळी गावात राहणारे विष्णू भोसले झोपडी उभारण्यात माहीर आहेत. त्यांचं हे कौशल्य अगदी आगळं वेगळं आहे.

लाकडी चौकट आणि वरती झापांचं छप्पर असलेली झोपडी बांधण्याचं हे कसब विष्णूकाका आपल्या वडलांकडून म्हणजे गुंडू भोसलेंकडून शिकले. आतापर्यंत त्यांनी किमान १० झोपड्या एकट्याने बांधल्या आहेत तर तेवढ्याच झोपड्या बांधायला मदत केली आहे. “आम्ही उन्हाळ्यातच झोपड्यांची कामं करायचो कारण तेव्हा रानं रिकामी असायची,” ते सांगतात. “झोपडी बांधायची म्हणून लोकं पण उत्साहात असायची.”

१९६० च्या दशकापर्यंत जांभळीत अशा शंभरेक झोपड्या असल्याचं विष्णूकाकांना आजही आठवतंय. दोस्त मंडळी एकमेकांच्या मदतीला यायची आणि जवळपासचंच साहित्य आणून झोपड्या बांधायची. “झोपडी बांधाया रुपया कधी खर्च केलो नाही. पैसा होताच कुणाकडं?” ते म्हणतात आणि पुढे सांगतात, “लोकं तीन तीन महिने थांबाया तयार असायची. सगळं साहित्य मनाजोगतं जमल्याशिवाय काम सुरू व्हायचं नाही.”

एकविसावं शतक उजाडेपर्यंत ४,९३६ लोकसंख्येच्या (जनगणना, २०११) लाकडी, झापाच्या झोपड्यांची जागा सिमेंट, वीट आणि पत्र्याच्या खोल्यांनी घेतली होती. त्या आधी झोपड्यांवर खापरी किंवा कुंभारी कौलं असायची, जी गावातले कुंभारच बनवत असत. त्यानंतर यंत्रावर तयार झालेली बंगलोर कौलं आली जी जास्त मजबूत आणि टिकाऊ होती.

झोपडीवर झापाचं छत घालायला जितके कष्ट लागतात त्या मानाने कौलं बसवणं सोपं आणि झटपट होतं. त्याची जास्त निगाही राखावी लागत नसे. सिमेंट आणि विटांचा वापर करून पक्की घरं बांधायला सुरुवात झाली आणि झोपडी बांधण्याच्या कलेला उतरती कळा लागली. जांभळीतल्या लोकांनीही आपल्या झोपड्या सोडून नव्या प्रकारची घरं बांधायला सुरुवात केली आणि आज गावात बोटावर मोजता येतील इतक्याच झोपड्या उरल्या आहेत.

“आजकाल गावात झोपडीच पहायला मिळणं दुरापास्त झालंय. पुढल्या काही वर्षात जुन्या पद्धतीच्या झोपड्या दिसेनाशा होणार. कुणाला त्याची निगा राखायची नाही,” विष्णूकाका म्हणतात.

*****

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

विष्णू भोसले घायपातीच्या रस्सीने लाकडी खांब आणि आडू घट्ट बांधून घेतायत. त्यांनी आजवर एकट्याने १० झोपड्या उभारल्या आहेत आणि तितक्याच झोपड्या बांधायला मदत केली आहे


विष्णूकाकांचे मित्र आणि शेजारी नारायण गायकवाड म्हणजे बापूंना झोपडी बांधायची होती म्हणून ते काकांपाशी आले. हे दोघं मित्र आजवर भारतभरात अनेक शेतकरी मोर्चांमध्ये, आंदोलनांमध्ये सहभागी झाले आहेत.

जांभळीत विष्णूकाकांची एक एकर तर बापूंची सव्वातीन एकर जमीन आहे. दोघंही रानात ऊस, जवारी, खपली गहू, सोयाबीन आणि बाकी डाळी करतात. तसंच पालक, मेथी, कोथिंबीर अशा हिरव्या भाज्याही घेतात.

नारायण बापू अनेक वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. तिथल्या शेतमजुरांशी त्यांच्या कामाच्या परिस्थितीबद्दल बोलत होते. तिथे त्यांनी एक गोल आकाराची झोपडी पाहिली होती. तेव्हाच त्यांच्या मनात विचार आला होता, “अगदी प्रेक्षणीय. त्याचं गुरुत्वाकर्षण केंद्र अगदी बरोबर होतं,” ते सांगतात.

ती झोपडी भाताच्या पेंढ्याने बनवलेली होती आणि एकदम अचूकपणे बांधलेली होती. त्यांनी थोडी अधिक चौकशी केली तेव्हा समजलं की ती एका शेतमजुरानेच बांधलेली होती पण त्याची भेट काही होऊ शकली नाही. ७६ वर्षांच्या बापूंनी त्या झोपडीची नोंद मात्र करून ठेवली होती. रोजच्या जगण्यातल्या अशा गोष्टींच्या नोंदी करण्याची, टिपणं काढायची त्यांना सवयच आहे. आज त्यांच्याकडे अगदी खिशात मावतील एवढ्या ते ए४ आकाराच्या ४० वेगवेगळ्या वह्या-डायऱ्या आहेत आणि मराठीतल्या अशा टिपणांनी हजारो पानं भरलेली आहेत.

दहा एक वर्षांनंतर त्यांनी आपल्या सव्वातीन एकरात झोपडी उभारायचं ठरवलं. अडचणी चिक्कार होत्या पण सगळ्यात मोठी अडचण म्हणजे झोपडी उभारणारा कारागीर शोधणं.

मग त्यांनी झोपड्या बांधण्यात माहीर असलेल्या विष्णू भोसलेंपाशी विषय काढला. आणि त्यातून आज लाकूड आणि झापाची देखणी झोपडी आज दिमाखात उभी असलेली आपल्याला दिसते. हाताची जादू आणि वास्तु उभारण्याचं कसब या दोन्हीचं प्रतीक म्हणावं अशी ही झोपडी आहे.

“जोपर्यंत ही झोपडी इथे उभी आहे, तोपर्यंत तरुण पोरांना हजारो वर्षांपासून चालत आलेली ही कला काय आहे ते लक्षात राहील,” नारायण बापू म्हणतात. झोपडी बांधणारे त्यांचे दोस्त विष्णूकाका म्हणतात, “माझं काम लोकांना समजणार तरी कसं?”

*****

PHOTO • Sanket Jain

विष्णू भोसले (डावीकडे उभे) आणि नारायण गायकवाड शेजारी शेजारी राहतात. अगदी पक्के मित्र असलेल्या या दोघांनी एकत्र झोपडी बांधण्याचं ठरवलं

PHOTO • Sanket Jain

नारायण गायकवाड झोपडी बांधण्यासाठी फार मोलाचा असलेला घायपातीचा दांडा किंवा फड्याचा वासा पाहतायत. ‘हा दांडा चांगला मजबूत असतो आणि त्याच्यामुळे झोपडी जास्त दिवस टिकते,’ विष्णूकाका सांगतात. पुढे ते म्हणतात, ‘फड्यासा वासा कापणं लई जिकिरीचं काम असतं’


PHOTO • Sanket Jain

नारायण गायकवाड ( डावीकडे) आणि विष्णू भोसले मेडकं बसवण्यासाठी जमिनीत खड्डे घेतायत

झोपडी बांधण्याआधी तिचा वापर कशासाठी होणार हे ठरवणं गरजेचं महत्त्वाचं असतं. “तिचा आकार किती ठेवायचा, ती कशी बांधायची हे त्यावर ठरतं,” विष्णूकाका सांगतात. उदाहरणच घ्यायचं तर कडबा किंवा चाऱ्यासाठी त्रिकोणी आकाराची खोप बांधतात आणि एखादं छोटंसं कुटुंब राहणार असेल तर १२ बाय १० फूट आकाराची आयताकृती खोली तयार केली जाते.

बापू पुस्तकवेडे आहेत आणि वाचनाचा त्यांना प्रचंड नाद आहे. त्यांना वाचन करण्यासाठी उपयोगी पडेल अशी छोटीशी झोपडी बांधून हवी होती. आपली पुस्तकं, मासिकं आणि वर्तमानपत्रं तिथे ठेवता यावी असं त्यांच्या मनात होतं.

कशासाठी वापर होणार हे स्पष्ट झाल्यावर विष्णूकाकांनी काही काटक्या घेतल्या आणि झोपडीचं छोटंसं मॉडेल किंवा प्रतिकृती तयार केली. त्यानंतर पाऊण एक तास चर्चा करून त्यांनी आणि बापूंनी आकार वगैरे तपशील पक्के केले. त्यानंतर बापूंच्या शेतात एक नाही अनेक वाऱ्या केल्यानंतर वाऱ्याचा जोर सगळ्यात कमी असलेली जागा त्यांनी झोपडीसाठी निश्चित केली.

“नुस्तं उन्हाळा किंवा हिवाळा असला विचार करून झोपडी बांधत नसतात. पुढची कित्येक दशकं ती अशीच उभी रहाया हवी. किती तरी गोष्टींचा विचार करायला लागतो,” बापू सांगतात.

झोपडीचा आयत ठरवून प्रत्येकी दीड फूटाच्या अंतरावर दोन फूट खोल बिळं घेऊन बांधकामाची सुरुवात होते. १२x९ फूट आकाराच्या झोपडीसाठी १५ बिळं केली जातात. ही बिळं करण्यासाठी अंदाजे तासभर वेळ जातो. त्यानंतर या खड्ड्यांमध्ये प्लास्टिकची पिशवी खोचली जाते. “आता हितं जे लाकूड रोवणार ना त्या सांगाड्याचा पाण्यापासून बचाव होतोय,” विष्णू काका सांगतात. या लाकडी खांबांनाच पाणी लागलं तर झोपडीची मजबुतीच धोक्यात येते.

सगळ्यात लांबवरची दोन आणि मध्यभागी असलेल्या खड्ड्यात विष्णूकाका आणि त्यांचे मित्र आणि कुशल गवंडीकाम करणारे अशोक भोसले मेडकं घट्ट बसवतात. मेडकं म्हणजे लाकडाची बेचका असलेली १२ फुटी फांदी. शक्यतो चंदन, बाभूळ किंवा कडुनिंबाची.

वरच्या बेचक्यात आडवे खांब बसवले जातात. “मध्यभागी जी दोन मेडकं आहेत ना, त्यांना म्हणायचं आडू. ती असतात १२ फूट लांब, आणि बाकी १० फूट,” बापू सांगतात.

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः झोपडीचा पाया तयार करण्यासाठी नारायण गायकवाड दोन फूट खोल खड्डे खोदतायत. उजवीकडेः अशोक भोसले (डाव्या बाजूस) आणि विष्णू भोसले मेडकं बसवतायत

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

नारायण बापू आणि विष्णू काका (निळ्या सदऱ्यात) कोल्हापूरच्या जांभळीत बापूंच्या शेतात झोपडी उभारतायत

या लाकडी सांगाड्यावर नंतर झापांचं छत लागणार. मधले मेडके दोन फूट उंच ठेवल्याने छताला उतार मिळतो आणि पावसाचं पाणी झोपडीत न शिरता बाजूने वाहून जातं.

आठ मेडकं मातीत घट्ट रोवली आणि झोपडीचा पाया तयार झाला. या कामाला दोन तास लागले. आता या मेडक्यांना खाली वेळू बसवणार. झोपडीच्या दोन्ही बाजू यामुळे एकमेकीला जोडल्या जातात.

“आजकाल चंदनाची किंवा बाभळीची झाडंच मिळंना गेलीत,” विष्णूकाका सांगतात. “ही सगळी चांगली [देशी] झाडं गेली आणि त्यांची जागा ऊस किंवा इमारतींनी घेतली.”

सांगाडा उभा राहिल्यानंतर पुढची पायरी म्हणजे वासे बसवायचे. झोपडीच्या छताची आतल्या बाजूची ही रचना. विष्णूकाकांनी या झोपडीसाठी ४४ वासे वापरायचं ठरवलं. छताच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी २२. वासे घायपातीच्या दांड्यापासून तयार करतात. त्याला या भागात फड्यासा वासा म्हणतात. हा दांडा सरासरी २५-३० फूट उंच जातो आणि चांगलाच मजबूत आणि टिकाऊ असतो.

“हा वासा खूपच मजबूत असतो. त्याच्यामुळे झोपडी जास्त वर्षं टिकते,” विष्णू काका म्हणतात. जितके वासे जास्त, तितकी झोपडी मजबूत. पण ते आणखी एक गोष्ट सांगतात, “फड्याचा वासा कापणं लई जिकिरीचं काम आहे, बाबा.”

खांब आणि वाश्यांचा सांगाडा तयार झाला की तो घायपातीच्या दोऱ्यांनी घट्ट बांधला जातो. हे दोर प्रचंड मजबूत असतात. घायपातीच्या पानांपासून धागे काढणं फार किचकट काम आहे. पण बापूंचा त्यात हातखंडा आहे. कोयत्याने अगदी २० सेकंदात ते घायपातीचे दोर काढतात. “लोकांना माहित पण नाही, याचे असले दोर निघतात ते,” ते हसत हसत म्हणतात.

याच धाग्यांपासून पर्यावरणपूरक रस्सी तयार होते. (वाचाः दोर वळायची कलाच गायब होऊ लागते तेव्हा .)

PHOTO • Sanket Jain

अशोक भोसले विष्णू काकांना उसाची पाचट देतायत. जनावरांना चारा म्हणून वापरण्यात येणारी ही पाचट छप्पर जलरोधक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते

PHOTO • Sanket Jain

झोपडी बांधणं आता अवघड होत चाललंय कारण त्यासाठी लागणारं साहित्य आता सहजासहजी मिळत नाही. नारायण बापू गेला आठवडाभर चांगल्यात चांगलं साहित्य मिळण्यासाठी खटपट करतायत. काटे रुतण्याची, धसकटं लागण्याची भीती होतीच

एकदा का लाकडी सांगाडा तयार झाला की नारळाच्या झापांपासून आणि उसाच्या मुळ्यांचा वापर करून भिंती बांधल्या जातात. त्यांची रचनाही अशी असते की वाटलं तर विळा-कोयता पटकन अडकवता यावा.

आता झोपडीची रचना बऱ्यापैकी स्पष्ट व्हायला लागली आहे. छपरासाठी उसाटी पाचट वापरली जाते. “पूर्वी आम्ही ज्यांच्याकडे जनावरं नाहीत अशा शेतकऱ्यांकडून पाचट गोळा करून आणायचो.” आजही जनावरांसाठी चारा म्हणून पाचट फार मोठ्या प्रमाणावर वापरली जाते त्यामुळे शेतकरी फुकटात ती देत नाहीत.

ज्वारीचा कडबा आणि खपली गव्हाचं तनीससुद्धा छपरासाठी वापरलं जातं. खास करून फटी बुजवायला किंवा झोपडीचं सौंदर्य वाढवायला. “एका झोपडीसाठी किमान आठ बिंडे लागतात [अंदाजे २००-२५० किलो पाचट],” बापू सांगतात.

छताची शाकारणी हे फार कष्टाचं काम आहे. त्याला किमान तीन दिवस लागतात आणि तेही दोन-तीन माणसांनी सलग तीन दिवस रोज सहा ते सात तास काम केलं तर. “काडी अन् काडी नीट रचावी लागते, नाही तर पावसाळ्यात छत गळायचं,” विष्णू काका म्हणतात. छप्पर जास्त टिकावं म्हणून दर तीन चार वर्षांनी शाकारलं जातं.

“कसंय, जांभळीत पूर्वापासपासून फक्त गडीच झोपड्या बांधतायत. पण त्याला लागणारं साहित्य हुडकून आणायचं, खालची भुई सपाट करायची, असली सगळी कामं बायाच करतात,” विष्णू काकांच्या पत्नी, अंजना काकी सांगतात. त्यांची साठी पार झाली आहे.

आता झोपडीची सगळी रचना पूर्ण झाली आहे. खालची माती चांगली नांगरून तिला भरपूर पाणी पाजलं जातं. पुढचे तीन दिवस ती तशीच सुकू दिली जाते. “असं केलं की माती चांगली चिकण होते,” बापू सांगतात. जमीन वाळली की तिच्यावर पांढऱ्या मातीचा थर टाकला जातो. बापूंनी त्यांच्या शेतकरी मित्र्यांच्या रानातून पांढरी माती गोळा करून आणलीये. या मातीत लोह आणि मँगनीज निघून गेलं असल्याने ती रंगाला फिक्की असते.

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

झोपडी बांधण्याआधी विष्णू भोसले त्याची एक अगदी तपशीलवार प्रतिकृती तयार करतात. झोपडी कुठे बांधायची ती जागा शोधणं हाही यातला महत्त्वाचा भाग आहे

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

अशोक भोसले जास्तीचं लाकूड छाटून टाकतायत. उजवीकडेः आडवे वासे टाकण्यासाठी बेचकं असलेलं मेडकं

या पांढऱ्या मातीत घोड्याची लीद, जनावराचं शेण आणि बाकी बारक्या जनावराच्या लेंड्या टाकून ती कालवली जाते, त्याने मातीची मजबुती वाढते. माती पसरली की गडीमाणसं धुम्मस घेऊन ती जमीन चांगली धोपटतात. धुम्मस किमान १० किलो वजनाची असते आणि तरबेज सुताराकडून करून घेतली जाते.

गड्यांचं धोपटून झालं की बाया बडवणं घेऊन जमीन एकदम सपई करतात. बडवणं बाभळीच्या लाकडाचं असतं. क्रिकेटच्या बॅटसारखं दिसतं, पण दांडा अगदी बारका असतो. याचं वजन देखील ३ किलोच्या आसपास भरतं. बापूंकडचं बडवणं काळाच्या ओघात हरवलंय पण त्यांचे थोरले बंधू, सखाराम यांनी मात्र ते नीट जपून ठेवलंय.

नारायण बापूंच्या पत्नी कुसुम काकींचा पण या झोपडीच्या उभारणीत मोलाचा सहभाग आहे. “शेतातल्या कामातून जरा वेळ मिळाला की आम्ही जमीन सपई करायचो,” ६८ वर्षीय कुसुम काकी सांगतात. हे काम इतकं कठीण होतं की घरचे, दारचे, मित्र मंडळी अशा सगळ्यांनी आळीपाळीने ते केलं म्हणून झालं.

जमीन सपाट झाली की बाया ती शेणाने सारवून घेतात. शेण सगळीकडे नीट पसरतं आणि माती घट्ट धरून ठेवतं आणि डाससुद्धा निघून जातात.

घर म्हणजे त्याला कवाड पाहिजेच. पूर्वी गावरान ज्वारीची धाटं किंवा उसाचं पाचट किंवा नारळाच्या झावळ्यांपासून कवाड केलं जायचं. पण जांभळीत आता कुणीच गावरान ज्वारी करत नाही. त्यामुळे झोपडी बांधणाऱ्याची अडचण झालीये.

“आजकाल सगळे हायब्रीड पिकवायला लागलेत. त्याचा चारा पौष्टिक पण नाही आणि देशी वाणासारखा टिकत पण नाही,” बापू सांगतात.

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

नारायण बापू ४०० मीटरवरच्या आपल्या शेतातून घायपातीचा १४ फूट उंच दांडा खांद्यावर टाकून घेऊन येतायत. हे दांडे इतके चिवट असतात की कधी कधी विळ्याचं पातंसुद्धा वाकतं. फड्याचा वासा कापताना त्यांच्याकडच्या सगळ्यात धारदार विळ्याची काय गत झालीये (उजवीकडे) ते बापू दाखवतायत

पीक पद्धती बदलली त्यानुसार झोपडी बांधणाऱ्यांनाही आपल्या कामात बदल करावा लागला आहे. पूर्वी उन्हाळ्यात झोपड्या बांधल्या जायच्या. कारण तेव्हा रानात काही कामं नसायची. पण विष्णूकाका आणि बापू दोघंही आपल्या शेतीच्या अनुभवाच्या आधारावर सांगतात की आता वर्षभर रानात काही ना काही असतंच. रान रिकामं म्हणून नसतंच. “पूर्वी आम्ही फक्त एक पीक घेत होतो. आता दोन-तीन पिकं काढली तर पुरंना झालंय,” विष्णूकाका म्हणतात.

नारायण बापू, विष्णू काका, अशोक भाऊ आणि कुसुम काकींचे सगळ्यांनी मिळून पाच महिने काम केल्यानंतर, त्यांच्या ३०० तासांच्या कष्टांनंतर ही झोपडी उभी राहिली आहे. त्यातही मधून मधून शेतीची कामं सुरू होतीच. “हे फार मेहनतीचं काम आहे. त्यात लागणारं सगळं साहित्य शोधणं आता फार कठीण झालंय,” बापू सांगतात. जांभळीच्या कानाकोपऱ्यातून लागणारा माल शोधण्यात त्यांचा आठवडा गेला.

झोपडी बांधताना किती तरी जखमा होतात, लागतं. काटे रुततात, कुसळं घुसतात. “आता असल्या दुखाची सवय नसली तर तुम्ही कसले शेतकरी हो?” दुखावलेलं बोट दाखवत बापू विचारतात.

अखेर झोपडी पूर्ण झाली. तिच्या उभारणीत ज्यांचा ज्यांचा हात लागला ते सगळे दमले जरी असले तरी पार आनंदून गेलेत. कुणास ठाऊक, जांभळीतली ही अखेरची झोपडी ठरावी, कारण आता ही कला शिकायला कुणीच येत नसल्याची सल विष्णू काका बोलून दाखवतात. “कोण येऊ दे किंवा नाही येऊ दे, आपल्याला काहीही फरक पडत नाही,” बापू त्यांची समजूत घालतात. स्वतःच्या हाताने बांधलेल्या या झोपडीत आपल्याला शांत झोप लागल्याचं ते सांगतात. आता वाचनालय म्हणून तिचा वापर करण्याचा त्यांचा मानस आहे.

“जेव्हा कुणी मित्रमंडळी किंवा पाहुणे रावळे आमच्या घरी येतात, तेव्हा मी अगदी टेचात ही झोपडी दाखवतो. पूर्वापारपासून चालत आलेली ही कला जिवंत ठेवल्याबद्दल सगळे माझं कौतुक करतायत,” नारायण बापू म्हणतात.

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

विष्णू भोसले वेळू योग्य आकारात छाटून, तासून घेतायत. नारायण गायकवाड खांब आणि वासे एकमेकांना घट्ट बांधण्यासाठी घायपातीचे दोरे काढतायत

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

झोपडीच्या उभारणीत घरच्या बायाही शेतीची कामं सांभाळून सहभागी होतात. कुसुम गायकवाड (डावीकडे) धान्य उफणतायत आणि (उजवीकडे) विष्णू काकांना काही तरी सांगतायत

PHOTO • Sanket Jain

झोपडीचं काम सुरू असतानाच नारायण गायकवाडांना कुणाचा तरी फोन आलाय

PHOTO • Sanket Jain

नारायण बापूंचा नातू, ९ वर्षांचा वरद गायकवाड छपर शाकारण्यासाठी लागणारं उसाचं पाचट आपल्या छोट्या सायकलवरून आणून देतोय

PHOTO • Sanket Jain

झोपडीचं काम सुरू असताना नारायण बापूंचा नातू वरद तिथेच येजा करत असतो

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

नारायण गायकवाड, कुसुम गायकवाड, विष्णू आणि अशोक भोसले यांनी मिळून बांधलेली झोपडी. ‘ही झोपडी किमान ५० वर्षं टिकणार,’ नारायण बापू सांगतात

PHOTO • Sanket Jain

नारायण गायकवाड यांची सव्वा तीन एकर शेती असून ते ऊस, ज्वारी, खपली गहू, सोयाबीन, इतर कडधान्यं आणि पालक, मेथी, कोथिंबीर अशा पालेभाज्या घेतात. पुस्तकवेड्या कॉम्रेड बापूंसाठी ही आता वाचनाची खोली झाली आहे

संकेत जैन लिखित ग्रामीण कारागिरांवरील या लेखमालेसाठी मृणालिनी मुखर्जी फाउंडेशनचे अर्थसहाय्य मिळाले आहे.

Sanket Jain

Sanket Jain is a journalist based in Kolhapur, Maharashtra. He is a 2022 PARI Senior Fellow and a 2019 PARI Fellow.

Other stories by Sanket Jain
Editor : Priti David

Priti David is the Executive Editor of PARI. A journalist and teacher, she also heads the Education section of PARI and works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum, and with young people to document the issues of our times.

Other stories by Priti David
Photo Editor : Sinchita Maji

Sinchita Maji is a Senior Video Editor at the People’s Archive of Rural India, and a freelance photographer and documentary filmmaker.

Other stories by Sinchita Maji