सकाळचे ६ वाजले आहेत आणि शरण्या बलरामन गुम्मिडिपूंडीतील आपल्या घरातून निघायच्या तयारीत आहेत. चेन्नईजवळील तिरूवल्लूर जिल्ह्यातल्या या छोट्याश्या शहरातील रेल्वे स्थानकावरून त्या आपल्या तीन मुलांसह लोकल ट्रेन पकडतात. साधारण दोन तासांनी ४० किलोमीटरवरील चेन्नईच्या मुख्य स्थानकावर पोहोचतात. इथून मुलांच्या शाळेत पोहोचण्यासाठी ही आई व तिची तीन मुलं आणखी १०-१२ किमी लोकलने प्रवास करतात.

दुपारी ४ वाजता असाच परतीचा प्रवास सुरु होतो आणि घरी येईस्तोवर साधारण संध्याकाळचे ७ वाजलेले असतात.

घरापासून शाळेपर्यंतचा हा १०० किमीचा प्रवास आठवड्यातून पाच वेळा करावा लागतो. शरण्यासाठी ही एक मोठीच कामगिरी आहे. याविषयी सांगताना त्या म्हणतात, “पूर्वी (लग्नाआधी) बस किंवा ट्रेनमध्ये कुठून बसायचं, एवढेच काय तर कुठे उतरायचं हे देखील मला माहित नव्हतं.”

PHOTO • M. Palani Kumar

एम. लेबाना या आपल्या मुलीसह गुम्मिडिपूंडी रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनची वाट पाहत असलेल्या शरण्या बलरामन. चेन्नईच्या दृष्टीहीन मुलांच्या शाळेत जाण्यासाठीचा हा रोजचा १०० किलोमीटरचा प्रवास; त्या सकाळी ६ ला निघतात आणि संध्याकाळी ७ वाजता परततात

शरण्या यांचा हा सगळा संघर्ष आहे आपल्या जन्मतः दृष्टिहीन असणाऱ्या तीन मुलांसाठी सुरू आहे. अगदी पहिल्यांदा या प्रवासासाठी निघाल्या तेव्हा त्यांना वाट दाखविण्यासाठी एक एक वयस्क मामी त्यांच्या सोबत आल्या. “दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्यांना पुन्हा माझ्यासोबत यायची विनंती केली तेव्हा त्या म्हणाल्या की ‘मला महत्त्वाचे काम आहे’. मी रडले. प्रवासात मला खूप त्रास झाला,” मुलांसोबतच्या प्रवासाचे सुरुवातीचे कष्ट आठवत त्या सांगतात.

आपल्या तिन्ही मुलांना औपचारिक शिक्षण मिळवून देण्याचा शरण्या यांचा निर्धार ठाम होता. परंतु घराजवळ दृष्टीहीनांसाठी एकही शाळा नव्हती. “आमच्या घराजवळ एक मोठी (खाजगी) शाळा आहे. मी त्या शाळेत गेले आणि त्यांना माझ्या मुलांना प्रवेश देण्याविषयी विचारलं. त्यावर ते सरळ म्हणाले, ‘आम्ही तुमच्या मुलांना प्रवेश दिला आणि इतर मुलांनी पेन्सिल किंवा तत्सम टोकदार वस्तूने त्यांच्या डोळ्यांना इजा केली, तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही’,” त्या सांगतात.

मग तिथल्याच शिक्षकांच्या सल्ल्यावरून शरण्या यांनी दृष्टीहीनांसाठीच्या शाळेचा शोध घ्यायला सुरुवात केली. दृष्टीहीनांसाठी एकमेव शासकीय शाळा त्यांच्या घारापासून ४० किमीवरील, चेन्नईतील पूनामल्लीत आहे. परंतु शरण्यांच्या शेजाऱ्यांनी मात्र त्यांना मुलांना शहरातील खाजगी शाळेत घालण्याचा सल्ला दिला. त्यांनी खाजगी शाळेत जाऊन येण्याचं ठरवलं.

PHOTO • M. Palani Kumar

शरण्या आपल्या तीन मुलांसह – एम. मेशक, एम. लेबाना आणि एम. मनसे (डावीकडून उजवीकडे) तामिळनाडूतील गुम्मिडिपूंडी येथील आपल्या घरी

“कुठे जायचं, काय करायचं, मला काहीच माहित नव्हतं,”  त्या दिवसांबद्दल शरण्या सांगतात. “लग्नापूर्वी आपला बहुतेक वेळ घरातच घालवणारी” एक तरुण स्त्री आता आपल्या मुलांसाठी शाळांच्या शोधात वणवण फिरत होती. “लग्नानंतरही एकटीने प्रवास कसा करायचा हे मला माहित नव्हतं.”

शेवटी दक्षिण चेन्नईतील अड्यार भागात शरण्या यांना सेंट लुई इन्स्टिट्यूट फॉर डेफ अँड द ब्लाइंड ही शाळा सापडली. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे इथे घातली. पुढे त्यांनी जवळच असलेल्या जी. एन. चेट्टी रोडवरील लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायर सेकंडरी स्कूलमध्ये आपल्या मुलीचं नाव घातलं. आज, त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा, एम. मेशक आठवीत आहे, दुसरा एम. मनासे सहावीत. सगळ्यात धाकटी मुलगी एम. लेबना तिसरीत शिकत आहे.

पण या मुलांचं शिक्षण सुरु ठेवायचं तर दररोज ट्रेनने लांबचा प्रवास करावा लागतो. आणि हा प्रवास अतिशय थकवणारा, तणावपूर्ण आणि बऱ्याचदा अत्यंत क्लेशदायकही असतो. शरण्या यांच्या मोठ्या मुलाला चेन्नई सेंट्रलच्या या प्रवासात अनेकदा आकडी (अपस्माराचा झटका) येते. “त्याला काय होतं तेच मला माहित नाही... त्याला फिट यायला लागते. कोणी पाहू नये म्हणून मी त्याला आपल्या मांडीवर घेते. थोड्या वेळाने, मी त्याला उचलून नेते.”

निवासी शाळा हा पर्याय त्यांच्या मुलांसाठी कधीच नव्हता. त्यांच्या मोठ्या मुलाकडे सतत लक्ष द्यावं लागतं. “त्याला दिवसातून तीन ते चार वेळा फिट येतात,” त्या पुढे म्हणतात, “मी जवळ नसले तर माझा मधला मुलगा जेवत नाही.”

PHOTO • M. Palani Kumar

शरण्या एम. मनासे (उजवीकडे) आणि एम. मेशक यांना आपले वडील बलरामन आर. (सर्वात डावीकडे) यांच्या मदतीने जेऊ घालतायत

*****

शरण्या १७ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचं लग्न मामाशी, मुथू यांच्याशी लावून देण्यात आलं. तमिळ नाडूत मागास प्रवर्गात मोडणाऱ्या रेड्डी समुदायात रक्ताच्या नात्यात लग्न ही सामान्य बाब आहे. “माझ्या वडलांना नातेसंबंध तुटू द्यायचे नव्हते, त्यामुळे त्यांनी माझं लग्न माझ्या मामाशी लावून दिलं,” त्या सांगतात. “मी एका एकत्र कुटुंबात वाढले. मला चार थाई मामन (मामा) होते, माझे पती हे त्यातले सर्वांत धाकटे.”

शरण्या २५ वर्षांच्या झाल्या तोवर त्यांना जन्मतः अंध असलेली तीन मुलं झाली होती. “माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मापर्यंत मुलं अशीही (दृष्टीहीन) जन्माला येऊ शकतात हे मला माहितच नव्हतं. तो जन्मला तेव्हा मी १७ वर्षांची होते. त्याचे डोळे बाहुलीच्या डोळ्यांसारखे दिसायचे. अशा प्रकारच्या डोळ्यांची मी फक्त म्हातारी माणसेच पहिली होती,” शरण्या सांगत होत्या.

दुसऱ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा शरण्या २१ वर्षांच्या होत्या. “मला वाटलं होतं किमान दुसरं मूल तरी सर्वसामान्य असेल, पण पाच महिन्यांनी मला लक्षात आलं की यालाही दृष्टी नाही.” दुसरा मुलगा दोन वर्षांचा झाला तेव्हा शरण्याच्या पतीला अपघात झाला आणि ते कोमात गेले. ते बरे झाल्यावर शरण्याच्या वडलांनी त्यांना ट्रक दुरुस्तीचे एक छोटं गॅरेज टाकायला मदत केली.

पतीच्या अपघाताला दोन वर्ष झाल्यानंतर शरण्या यांना आणखी एक मुलगी झाली. “आम्हाला वाटलं ही तरी चांगली असेल पण...,” शरण्या आपली व्यथा मांडतात. “लोक म्हणत माझी तिन्ही मुलं अशी जन्मली कारण मी रक्ताच्या नात्यात लग्न केलं. मला हे आधी माहित असतं तर...”

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

शरण्या आणि मुथू यांच्या लग्नाच्या अल्बममधील फोटो. लग्नावेळी शरण्या (उजवीकडे) अतिशय आनंदी होती

PHOTO • M. Palani Kumar

शरण्याचं कुटुंब चेन्नईच्या उत्तरेला गुम्मिडिपूंडीतील आपल्या घरी

शरण्या यांच्या सर्वात मोठ्या मुलाच्या अपस्माराच्या उपचारांवर दर महिन्याला १,५०० रुपये खर्च होतात. शिवाय, दोन्ही मुलांची वर्षाची शाळेची फी ८,००० रुपये आहे; सुदैवाने, मुलीची शाळा शुल्क आकारत नाही.  “माझे पती आमचा सांभाळ करत होते,” पतीच्या आठवणीत हरवत शरण्या सांगतात. “ते दिवसाला ५००-६०० रुपये कमवत.”

२०२१ मध्ये त्यांचे पती हृदयविकाराच्या झटक्याने वारल्यानंतर, शरण्या त्याच वस्तीत राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांच्या घरी राहायला आल्या. त्यांच्याविषयी बोलताना शरण्या म्हणतात, “आता, माझे आई-वडील हेच माझा एकमेव आधार आहेत. मला हे सगळं (मुलांचे संगोपन) एकटीनं करावं लागतं. मी हसणं विसरून गेले आहे.”

शरण्याचे वडील एका पॉवरलूम फॅक्टरीत काम करतात. एकही सुट्टी न घेता काम केलं तर त्यांना महिन्याला १५,००० रुपये मिळतात. त्यांच्या आईला अपंगांसाठी असणारी महिना १,००० रुपये पेन्शन मिळते. “माझे वडील आता म्हातारे झाले आहेत. आता ते महिन्याचे ३० दिवस कामाला जाऊ शकत नाहीत, त्यामुळे आम्हाला आमचा खर्च भागवणं अवघड झालं आहे,” शरण्या म्हणतात, “मला मुलांना सोडून कुठे जाता येत नाही. त्यामुळे इच्छा असूनही मला काम करता येत नाही.” एखादी सरकारी नोकरी मिळाली ती आम्हाला मोठी मदत होईल. शरण्या यांनी त्यासाठी अनेक विनंती अर्जही सादर केले आहेत पण अजूनपर्यंत काहीही झालेलं नाही.

रोजची आव्हानं आणि अडचणींना कंटाळल्याने शरण्या यांच्या मनात अनेकदा अत्म्हत्येचे विचार येतात. “आज मी फक्त माझ्या मुलीमुळे जिवंत आहे,” मुलीविषयी बोलताना त्या भावूक होतात.  “ती मला म्हणते, ‘आमचे वडील आम्हाला सोडून गेले. आता तू तरी आमच्या सोबत रहा म्हणजे आम्ही निदान काही वर्ष तरी जगू शकू’.”

PHOTO • M. Palani Kumar

बालरामन आपल्या नातीला शाळेत जाण्यासाठी तयार करतायत. शरण्याचे आई-वडील हे त्यांचा एकमेव आधार आहेत

PHOTO • M. Palani Kumar

शरण्याचा दिवस सकाळी ४ वाजता सुरु होतो. मुलांना उठवून त्यांना शाळेत जाण्यासाठी तयार करण्यापूर्वी घरातील सर्व कामे आटोपणं गरजेचं असतं

PHOTO • M. Palani Kumar

शरण्या आणि त्यांच्या मांडीवर झोपलेला त्यांचा मुलगा मनासे. ‘मी जर जवळ नसेन तर माझा मधला मुलगा (मनासे) जेवत नाही’

PHOTO • M. Palani Kumar

गुम्मिडिपूंडीतील घरात फरशीवर झोपलेला मनासे

PHOTO • M. Palani Kumar

शरण्याची मुलगी, लेबना आपली आणि आपल्या वस्तूंची काळजी घ्यायला शिकली आहे

PHOTO • M. Palani Kumar

लेबना आईच्या फोनमधील यूट्यूबवर तमिळ गाणी ऐकताना; कधीकधी याच सुरांवर तीही गुणगुणते

PHOTO • M. Palani Kumar

मनासेला त्याची खेळण्यातली लाकडी गाडी खूप आवडते. घरी असताना तो आपला अधिकांश वेळ तीच घेऊन खेळत असतो

PHOTO • M. Palani Kumar

थंगम आर. नातू मनासेसोबत खेळतायत. त्यांना अपंगांसाठीची १,००० रुपये पेन्शन मिळते. ही रक्कम त्या आपल्या नातवांवरच खर्च करतात

PHOTO • M. Palani Kumar

लेबना आपल्या आजीसोबत. ही लहानगी लोकांच्या आवाजावरून त्यांच्या भावना ओळखू त्यानुसार प्रतिसाद देते

PHOTO • M. Palani Kumar

बालरामन अतिशय प्रेमाने आपल्या नातवांची काळजी घेतात. ते पॉवरलूम फॅक्टरीत काम करतात

PHOTO • M. Palani Kumar

बालरामन (डावीकडे) आपला सर्वात मोठा नातू मेशकला (मध्यभागी) दररोज गच्चीवर फिरायला घेऊन जातात. अपस्माराचे झटके येत असल्याने मेशककडे सतत लक्ष द्यावे लागते. कधीकधी त्याची बहीण, लेबनाही (उजवीकडे) त्यांच्यात सामील होते

PHOTO • M. Palani Kumar

लेबनाला त्यांच्या घरावरील गच्चीवर खेळायला आवडते. ती तिच्यासोबत खेळायला तिच्या मित्र-मैत्रिणींनाही घेऊन येते

PHOTO • M. Palani Kumar

गुम्मिडिपूंडीतील त्यांच्या घराच्या गच्चीवर लेबाना आईला सोबत खेळण्याचा आग्रह करतीये

PHOTO • M. Palani Kumar

आपल्या तीन मुलांच्या संगोपनात रोज अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असला तरी घरी त्यांच्यासोबत वेळ घालवण्यात शरण्यांना खरे मानसिक समाधान मिळते

PHOTO • M. Palani Kumar

आपल्या मुलांना शाळेसाठी तयार केल्यानंतर, शरण्यांना पायरीवर बसून नाश्ता करायला आवडतं. स्वतःसाठी असा फक्त हाच वेळ त्यांना मिळतो

PHOTO • M. Palani Kumar

शरण्या गुम्मिडिपूंडीतील आपल्या घराबाहेर मुलीसोबत (साबणाच्या पाण्याचे) बुडबुडे उडवताना. ‘माझ्या मुलीमुळेच मी जिवंत आहे’

PHOTO • M. Palani Kumar

‘मला मुलांना सोडून कुठेच जाता येत नाही. इच्छा असूनही मी नोकरी करू शकत नाही’

हा लेख मूळ तमिळमध्ये लिहिला गेला असून एस. सेन्थलिर यांनी त्याचा इंग्रजीत अनुवाद केला आहे.

M. Palani Kumar

M. Palani Kumar is PARI's Staff Photographer and documents the lives of the marginalised. He was earlier a 2019 PARI Fellow. Palani was the cinematographer for ‘Kakoos’, a documentary on manual scavengers in Tamil Nadu, by filmmaker Divya Bharathi.

Other stories by M. Palani Kumar
Editor : S. Senthalir

S. Senthalir is Assistant Editor at the People's Archive of Rural India. She reports on the intersection of gender, caste and labour. She was a PARI Fellow in 2020

Other stories by S. Senthalir
Translator : Parikshit Suryavanshi

Parikshit Suryavanshi is a freelance writer and translator based in Aurangabad. He writes on environmental and social issues.

Other stories by Parikshit Suryavanshi