“वर्षातून एक दिवस तरी.”

स्वप्नाली दत्तात्रय जाधव ३१ डिसेंबर २०२२ ची गोष्ट सांगते. वेड हा मराठी सिनेमा नुकताच चित्रपटगृहात लागला होता. प्रेमाभोवती गुंफलेला सिनेमा, ओळखीचे नटनटी असूनही राष्ट्रीय स्तरावर फारसा पोचला नाही. घरकाम करणाऱ्या स्वप्नालीने सिनेमा पाहून सुट्टी साजरी करण्याचं ठरवलं. अख्ख्या वर्षभरात तिला दोनच सुट्ट्या मिळतात. त्यातली ही एक.

“नवीन वर्षाची सुरुवात होणार होती. आम्ही जेवलो पण बाहेरच, गोरेगावमध्ये कुठे तरी,” सुटी कशी मजेत गेली हे २३ वर्षांची स्वप्नाली अगदी मजेत सांगते.

उरलेलं अख्खं वर्ष म्हणजे फक्त काम आणि काम. धुणी, भांडी आणि इतर कामं करण्यात दिवसाचे सहा तास जातात. दोन कामांमध्ये १०-१५ मिनिटं विश्रांती. तेव्हा फोनवर मराठी गाणी ऐकायची. “ही ऐकत ऐकत जरासा टाइमपास होतो,” ते मोजके क्षणही किती आनंद निर्माण करू शकतात ते हसत हसत स्वप्नाली सांगते.

PHOTO • Devesh
PHOTO • Devesh

स्वप्नाली जाधव मुंबईत घरकामगार आहे. दोन कामांच्या मधे तिला फोनवर गाणी ऐकायला आवडतं

फोन असला तर जरा वेळ जातो, २५ वर्षांची नीलम देवी सांगते. ती म्हणते, “मला जमेल तेव्हा फोनवर भोजपुरी आणि हिंदी सिनेमे पहायला आवडतं.” शेतमजुरीसाठी स्थलांतर करून आलेली नीलम देवी बिहारच्या मोहम्मदपूर बलिया गावातून १५० किलोमीटरवच्या मोकामेह तालमध्ये कापणीच्या हंगामात कामाला आली आहे.

ती आणि तिच्यासोबतची १५ बायांची टोळी पिकं कापून, पेंड्या बांधून साठवणीच्या जागी माल गोळा करून ठेवणार. त्यांना धान्याच्या रुपात मजुरी मिळते. कापलेल्या दर १२ पेंड्यांमागे एक पेंडी. सध्या किराण्यामध्ये डाळी सगळ्यात जास्त महाग आहेत. सुहागिनी सोरेन म्हणते, “डाळींचं कसं, वर्षभर खाता येतात. लागलं तर घरी-नातेवाइकांना देता येतात.” महिन्याभराच्या कामाची मजुरी म्हणून त्यांना क्विंटलभर डाळी मिळत असतील.

या बायांचे नवरे कामाच्या शोधात आणखी दूर गेलेत आणि लेकरं गावी कुणी तरी सांभाळतंय. अगदी तान्ही असली तर ती त्यांच्यासोबत असतात.

भाताच्या पेंढ्याची दोरी आवळत त्या पारीला सांगतात की इथे कामावर त्यांना फोनवरती सिनेमे पाहता येत नाहीत कारण “फोन चार्जिंग करायला वीजच नाही.” नीलमकडे स्वतःचा फोन आहे. आणि ग्रामीण भागाचं चित्र पाहता हे दुर्मिळच. ऑक्सफॅम इंडियाने प्रकाशित केलेल्या डिजिटल डिव्हाइड इनिक्वॉलिटी रिपोर्ट २०२२ नुसार ग्रामीण भारतात फक्त ३१ टक्के स्त्रिया फोन वापरू शकत होत्या. पुरुषांसाठी हेच प्रमाण ६१ टक्के आहे.

पण नीलमने त्याच्यावरही उपाय शोधून काढलाय. कामगार राहतात त्या पालांच्या बाहेरच बरेचसे ट्रॅक्टर उभे असतात. “आम्ही महत्त्वाचे काही फोन करायचे असले तर ट्रॅक्टरवर चार्जिंग करतो. वीज जर ठीकठाक असती ना तर आम्ही नक्कीच सिनेमे पाहिले असते,” ती पुढे म्हणते.

PHOTO • Umesh Kumar Ray
PHOTO • Umesh Kumar Ray

डावीकडेः फावल्या वेळात नीलम देवीला फोनवर सिनेमे पहायला आवडतात. उजवीकडेः बिहारच्या मोकामेह तालमध्ये पिकं काढून विश्रांती घेत बसलेल्या स्थलांतरित कामगार महिला

मोकामेह तालमध्ये बाया सकाळी ६ वाजल्यापासून काम करतायत. दुपारी सूर्य माथ्यावर आला, उन्हं तापली की त्या हातातली अवजारं खाली ठेवतात. त्यानंतर घरच्यासाठी ट्यूबवेलवरून पाणी भरायचं. त्यानंतर, अनिता सांगते की “प्रत्येकाने स्वतःसाठी थोडा तरी वेळ बाजूला ठेवायला पाहिजे.”

संथाली आदिवासी असणारी अनिता झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातल्या नरयनपूर गावची आहे. ती म्हणते, “दुपारी फार गरम असतं, काम करणं शक्यच नाही. तेव्हा मी झोप काढते.” रोजंदारीवर शेतात मजुरी करणारी अनिता झारखंडहून बिहारला स्थलांतर करून आली आहे. मार्च महिन्यात ती मोकामेह तालमध्ये डाळी आणि इतर पिकं काढण्याचं काम करत होती.

रानं निम्मी मोकळी झाली आहेत. दहा-बारा बाया पाय जरासे लांबवून बसल्या आहेत. तिन्ही सांजा व्हायची वेळ आहे.

थकलेल्या असतानाही या शेतमजूर स्त्रियांचे हात मात्र रिकामे नाहीत. त्या मालातला काडीकचरा तरी साफ करत बसतात किंवा दुसऱ्या दिवशी पेंड्या बांधून नेण्यासाठी पेंढ्याची रस्सी वळून ठेवतात. जवळच तुराट्यांच्या तीन फुटी भिंती असलेली, प्लास्टिक अंथरलेली त्यांची घरं दिसतात. मातीच्या चुलीत लवकरच विस्तव धगधगणार आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू होणार. आताच्या गप्पा आता उद्या पुढे चालू.

राष्ट्रीय नमुना पाहणी संस्थेची २०१९ ची आकडेवारी पाहिली तर असं दिसून येतं की भारतात स्त्रियांची घरच्यांसाठी, कुठलाही मोबदला नसणारी घरकाम समजली जाणारी कामं करण्यात दररोज सरासरी २८० मिनिटं जातात. पुरुषांसाठी हाच आकडा केवळ ३६ मिनिटे इतका असल्याचं दिसतं.

PHOTO • Umesh Kumar Ray
PHOTO • Umesh Kumar Ray

अनिता मरांडी (डावीकडे) आणि सुहागिनी सोरेन (उजवीकडे) बिहारच्या मोकामेह तालमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित कामगार आहेत. त्या महिनाभर डाळींची काढणी करतात आणि त्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना क्विंटलभर डाळी मिळतात

PHOTO • Umesh Kumar Ray
PHOTO • Umesh Kumar Ray

डावीकडेः तुराट्यांच्या भिंती आणि छत म्हणून प्लास्टिक अंथरलेल्या झोपड्यांच्या बाहेर तात्पुरत्या मातीच्या चुलींवर कामगार स्त्रिया स्वयंपाक करतात. उजवीकडेः मोकामेह तालमधल्या काही झोपड्या

*****

काहीही न ठरवता एकमेकींबरोबर नुसती मजा करणं आरती सोरेन आणि मंगली मुर्मूला भारी आवडतं. दोघी १५ वर्षांच्या आहेत आणि बहिणी आहेत. दोघींचे आई-वडील पश्चिम बंगालच्या पारुलडांगा गावात भूमीहीन शेतमजूर आहेत. “मला इथे येऊन पक्षी न्याहाळायला फार आवडतं. कधी कधी आम्ही फळं तोडतो आणि दोघी मिळून खातो,” असं म्हणत आरती आणि मंगली झाडाखाली बसतात. त्यांची जनावरं जवळच चरतायत. त्यांच्यावरही लक्ष असतं.

“या दिवसात [कापणीच्या काळात]  गुरं चारायला फार लांब जावं लागत नाही. शेतात धसकटं असतात. त्यामुळे आम्हाला जरा नुसतं झाडाच्या सावलीत बसायला वेळ मिळतो.”

आम्ही त्यांना भेटलो तो रविवार होता. त्यांच्या आया बिरबूम जिल्ह्यातल्या शेजारच्यात गावी कुणा नातेवाइकाकडे गेल्या होत्या. “माझी आईच एरवी गुरं चारायला नेते. पण रविवारी ते माझं काम असतं. मला इथे यायला आणि मंगलीबरोबर वेळ घालवायला आवडतं,” आरती आपल्या बहिणीकडे पाहून हसते आणि म्हणते, “ती माझी मैत्रीण पण आहे ना.”

मंगलीला मात्र रोजच गुरं चारावी लागतात. ती पाचवीपर्यंत शिकली आणि त्यानंतर तिच्या आईवडलांना शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने तिला शाळा सोडावी लागली. “टाळेबंदी लागली आणि मग परत शाळेत पाठवणं त्यांच्यासाठी जास्तच अवघड झालं,” मंगली सांगते. ती घरचा सगळा स्वयंपाकही करते. गुरं चारायचं तिचं काम फार मोलाचं आहे. या कोरडवाहू भागामध्ये जनावरं सांभाळूनच घरात जरा तरी नियमित पैसा येतो.

PHOTO • Smita Khator

आरती सोरेन आणि मंगली मुर्मू या बहिणींना एकमेकींबरोबर वेळ घालवायला फार आवडतं

ग्रामीण भारतात केवळ ३१ टक्के स्त्रिया मोबाइल फोन वापरू शकतात तर पुरुषांचं प्रमाण ६१ टक्के आहे असं ऑक्सफॅम इंडियाचा डिजिटल डिव्हाइड इनिक्वॉलिटी रिपोर्ट सांगतो

“आमच्या आई-बाबांकडे साधे फोन आहेत. कधी कधी आम्ही एकत्र असताना या विषयांवर [स्वतःचा फोन] बोलतो,” आरती सांगते. भारतात ज्यांच्याकडे फोन आहे अशांपैकी जवळपास ४० टक्के लोकांकडे स्मार्टफोन नाही, असं डिजिटल डिव्हाइड इनिक्वॉलिटी रिपोर्ट २०२२ अहवाल नमूद करतो. या मुलींचा अनुभव तसा सार्वत्रिकच म्हणायचा.

फावल्या वेळाबद्दल बोलायला सुरुवात केली काही तरी करून मोबाइल फोन हा विषय येतोच. कधी कधी तर कामाच्या संदर्भातही फोनचा उल्लेख होतो. शेतमजुरी करणारी सुनीता पटेल फार चिडून एक मुद्दा सांगतेः “आम्ही इथून आमचा भाजीपाला घेऊन शहरात विकायला जातो, घसा फोडून आवाज देतो. आणि त्या [शहरातल्या स्त्रिया] आम्हाला साधं हो नाही पण म्हणत नाहीत. त्यांचं आपलं फोनवर बोलणं सुरू. फार त्रास होतो. रागही येतो.”

सुनीता इतर काही बायांबरोबर छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातल्या राका गावात भाताच्या शेतात जरा आराम करत बसलीये. काही जणी बसल्या होत्या. तर काहींचा क्षणभर डोळा लागला होता.

“आम्ही अख्खं वर्ष शेतात राबत असतो. फावला म्हणून कसलाच वेळ मिळत नाही,” दुगडी बाई नेताम कोऱ्या चेहऱ्याने सांगतात. आदिवासी असलेल्या म्हाताऱ्या दुगडी बाईंना विधवा पेन्शन मिळतं तरीही त्या रोजंदारीवर काम करतात. “सध्या खुरपणी चालू आहे. वर्षभर आम्ही काम करत असतो.”

सुनीताच्या मनात आधीची आठवण अजूनही ताजी असणार. ती म्हणते, “फावला वेळ आमच्यासाठी नाही. हे सगळे शहरातल्या बायकांचे चोचले आहेत.” खरं तर चांगलं खाणंसुद्धा मनोरंजनाची गोष्ट असू शकतं. “मला तर वाटतं चांगलेचुंगले पदार्थ असे चारही बाजूने मांडलेले असावे. पण पैसाच नाही त्यामुळे अशक्यच आहे.”

*****

PHOTO • Purusottam Thakur

छतीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातल्या राका गावात भाताच्या शेतात काम करणाऱ्या शेतमजूर बाया जरा विश्रांती घेतायत

PHOTO • Purusottam Thakur
PHOTO • Purusottam Thakur

छत्तीसगडमध्ये भाताच्या शेतात काम करणाऱ्या बाया. उजवीकडेः वय झालं असलं तरी दुगडी बाई नेताम यांना रोज काम करावंच लागतं

PHOTO • Purusottam Thakur
PHOTO • Purusottam Thakur

राजनांदगाव जिल्ह्याच्या राका गावात उमा निषाद रताळी उपटतायत. उजवीकडेः घरच्यांसोबत काही निवांत क्षण

यल्लूबाई नंदीवाले जैनापूर गावापाशी जरा क्षणभर विसावल्या आहेत आणि कोल्हापूर सांगली महामार्गावरची गाड्यांची वर्दळ पाहतायत. त्या कंगवे, पिना, नकली दागिने, अल्युमिनियमची भांडी आणि अशाच इतर काही वस्तू विकतायत. वेताच्या पाटीत आणि एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत त्या सगळा माल घेऊन हिंडतात. सगळ्याचं वजन किमान ६-७ किलो असेल.

कोल्हापूर जिल्ह्यात भेटलेल्या यल्लूबाई पुढच्या वर्षी सत्तरीच्या होतील. त्या म्हणतात की उभं राहिल्यावर किंवा चालताना आता त्यांचे गुडघे बोलायला लागलेत. तरीही या दोन्ही गोष्टी त्यांना कराव्याच लागतात नाही तर रोजच्या कमाईवर पाणीच सोडावं लागेल. “शंभर रुपये कमावणंही कष्टाचं झालंय. कधी कधी तर अख्खा दिवस काहीच हातात पडत नाही,” हातानेच दुखरे गुडघे दाबत दाबत त्या सांगतात.

सत्तरीच्या यल्लूबाई आणि त्यांचे पती यल्लप्पा शिरोळ तालुक्यातल्या दानोली गावी राहतात. दोघं नंदीवाले या भटक्या जमातीचे असून भूमीहीन आहेत.

“छंद, मजा, फावल्या वेळाचे उद्योग... हे सगळं लग्नाआधी,” त्या म्हणतात. तरुणपणीच्या आठवणींनी चेहऱ्यावर हसू दिसू लागतं. “मी कधीच घरी नसायची... शेतात जा, नदीत उड्या टाक. लग्नानंतर त्यातलं काहीसुद्धा राहत नाही. निस्तं चूल आन् मूल.”

PHOTO • Jyoti Shinoli
PHOTO • Jyoti Shinoli

डावीकडेः यल्लूबाई कंगवे, पिना, नकली दागिने, अल्युमिनियमची भांडी आणि अशाच इतर काही वस्तू विकतायत. वेताच्या पाटीत आणि एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत त्या सगळा माल घेऊन हिंडतात. गिऱ्हाईक आलं की त्या सगळं खोलून ठेवतात

भारतभराचा विचार करता ग्रामीण भागातल्या बाया दिवसभरातला २० टक्के वेळ कुठलाही मोबदला नसलेल्या घरकामात आणि संगोपनाच्या कामात घालवतात असं या विषयावरचा एक अहवाल सांगतो. देशभराचा असा हा पहिलाच सर्वे आहे. टाइम-यूझ इन इंडिया – २०१९ असं शीर्षक असलेला हा अहवाल सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिद्ध केला आहे.

कामगार, आई, पत्नी, मुलगी आणि सून अशा विविध भूमिका जरा बाजूला ठेवल्या तर जो वेळ उरतो तो गावाकडच्या बायांसाठी इतर कामांवर खर्च होतो – लोणची घाला, पापड लाटा आणि शिवणकाम. “हाताने शिवणाचं काम करताना एकदम निवांत वाटू लागतं. आम्ही जुन्या साड्यांच्या चिंध्या करतो आणि त्यापासून कोठरी [गोधडी] शिवतो,” उत्तर प्रदेशच्या बैठकवा पाड्यावर राहणाऱ्या ऊर्मिला देवी सांगतात.

अंगणवाडी कार्यकर्ती असलेल्या पन्नाशीच्या ऊर्मिला देवींसाठी उन्हाळ्यात आपल्या मैत्रिणींसोबत घरच्या म्हशी पाण्याला नेणं हा एक आनंदाचा क्षण असतो. “पोरं बेलन नदीच्या पाण्यात डुंबत असतात आणि आम्हाला जरा एकमेकीची ख्यालीखुशाली विचारायला वेळ मिळतो,” त्या सांगतात. नदी म्हणजे उन्हाळ्यात नालाच होते हे सांगायला त्या विसरत नाहीत.

कोराउँ जिल्ह्याच्या देवघाट गावात अंगणवाडी कार्यकर्ती असणाऱ्या ऊर्मिला आठवडाभर तरुण माता आणि त्यांच्या बालकांची काळजी घेतात. लसीकरण, गरोदरपण आणि बाळंतपणानंतरच्या तपासण्या वगैरंची मोठी यादी भरून घेण्याचं काम सुरूच असतं.

यल्लूबाईंची चार मुलं आहेत आणि तीन वर्षांचा एक नातू. २०००-२००५ या काळात त्यांनी देवघाट गावात ग्राम प्रधान पदावर काम केलं आहे. या दलित बहुल वस्तीतल्या मोजक्या शिकलेल्या स्त्रियांपैकी त्या एक. “शाळा सोडून लग्न करणाऱ्या मुलींना मी नेहमी टोकते. पण त्याही ऐकत नाहीत आणि त्यांच्या घरचेही,” त्या अगदी हताशपणे म्हणतात.

लग्नं, साखरपुडा अशा प्रसंगी स्त्रियांना त्यांचा असा थोडा फार वेळ मिळतो. “आम्ही एकत्र गाणी गातो, हसतो,” ऊर्मिला सांगतात. ही गाणी लग्नं, संसार अशा विषयांभोवती गुंफलेली असतात आणि अनेकदा चावटही असतात असं त्या हसत हसत सांगतात.

PHOTO • Priti David
PHOTO • Priti David

डावीकडेः ऊर्मिला देवी उत्तर प्रदेशच्या कोराउँ जिल्ह्याच्या देवघाटात अंगणवाडी कार्यकर्ती आहेत. उजवीकडेः ऊर्मिला देवी घरच्या म्हशीचं सगळं पाहतात

PHOTO • Purusottam Thakur
PHOTO • Purusottam Thakur

चित्रेखा घरकामगार असून छत्तीसगडच्या धमतरीच चार घरात काम करतात. रिकामा वेळ मिळाला तर त्यांना तीर्थयात्रेला जायचंय

खरं तर लग्नांप्रमाणे सण समारंभातही स्त्रियांना, खास करून छोट्या मुलींना थोडी तरी सुट्टी मिळते.

आरती आणि मंगली सांगतात की जानेवारी महिन्यात बिरभूमच्या संथाल आदिवासींचा बंदना हा सण त्यांचा सगळ्यात आवडता सण आहे. “आम्ही नटतो, सजतो, नाचतो, गाणी गातो. आई घरी असते त्यामुळे आम्हाला फार जास्त काम नसतं. मैत्रिणींबरोबर जरा वेळ घालवता येतो. कुणीही आम्हाला ओरडत नाही. मनाला येईल ते करता येतं,” आरती म्हणते. सणाच्या काळात जनावरांचं सगळं काम वडील बघतात कारण जनावरं पूजली जातात. “मला काहीच काम नसतं,” मंगली हसत हसत सांगते.

तीर्थयात्रा, देवदर्शन हाही मन रमवण्याचा मार्ग असल्याचं ४९ वर्षांच्या चित्रेखा सांगतात. त्यांच्या फावल्या वेळात करण्याच्या गोष्टींच्या यादीत हेही आहे. “मला घरच्यांसोबत [मध्य प्रदेशातल्या] सिहोरच्या शंकराच्या मंदिरात जायचंय. दोन तीन दिवस. मी कधी तरी सुट्टी घेऊन जाणार आहे.”

छत्तीसगडच्या धमतरीत घरकामं करणाऱ्या ऊर्मिला देवी चार घरी कामाला निघण्याआधी सकाळी ६ वाजता उठून घरचं सगळं काम उरकतात. सगळी कामं संपवून परत यायला संध्याकाळचे ६ वाजतात. रोज इतके कष्ट केल्यानंतर त्यांना महिन्याला ७,५०० रुपये मिळतात. त्यांचं पाच जणांचं कुटुंब आहे. नवरा-बायको, दोन मुलं आणि सासू.

*****

स्वप्नालीसाठी काम नाही असा एकही दिवस नाही. “महा महिन्याला फक्त दोन दिवस सुट्टी मिळते. शनिवार आणि रविवारीही मला काम करावं लागतं कारण तेव्हा त्यांना सुट्टी असते. त्यामुळे त्या दिवशी मला सुट्टी मिळण्याचा सवालच येत नाही,” ती सांगते. आपल्याला एक दिवस सुट्टी मिळायला पाहिजे ही गरज तिने स्वतःही फार मनावर घेतलेली नाही.

“माझ्या नवऱ्याला रविवारी काम नसतं. कधी कधी तो म्हणतो की रात्री उशीरा सिनेमा पाहू म्हणून. पण मला दुसऱ्या दिवशी सकाळी काम असतं त्यामुळे माझं धाडस होत नाही,” ती म्हणते.

PHOTO • Smita Khator

पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यात गुरं चारता चारता चार क्षण निवांत बसलेल्या लोहार स्त्रिया

घर चालवण्यासाठी एक ना अनेक कामं करणाऱ्या स्त्रियांच्या आवडीचं कामच कधी कधी त्यांचा फावल्या वेळेतला आवडीचा छंद बनून जातं. “आता घरी जाऊन मी घरकाम उरकेन – स्वयंपाक, झाडलोट, पोरांना खायला घालायचं. त्यानंतर मी ब्लाउज पीस आणि ओढण्यांवर कांथा भरेन,” रमा लोहार सांगते (नाव बदललं आहे).

पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातल्या आदित्यपूर गावातली २८ वर्षीय रमा इतर चौघींसोबत गुरं चरतायत तिथेच जवळ गवतात बसलीये. २८ ते ६५ वर्षं वयोगटातल्या या सगळ्या जणी भूमीहीन आहेत आणि दुसऱ्यांच्या रानात काम करतात. त्या लोहार जातीच्या असून पश्चिम बंगालमध्ये त्यांची गणना अनुसूचित जातीत होते.

“आम्ही घरचं सगळं काम सकाळीच उरकलंय. त्यानंतरच आम्ही गायी आणि शेरडं चारायला घेऊन आलोय,” ती सांगते.

“आमच्यासाठी वेळ कसा काढायचा, ते आमचं आम्हाला माहितीये,” ती सांगते.

“वेळ काढता तेव्हा तुम्ही काय करता?” आम्ही विचारलं.

“खरं तर फार काहीच नाही. मी डुलकी काढते किंवा माझ्या आवडत्या मैत्रिणींशी बोलते,” असं म्हणून रुमा तिच्या मैत्रिणींकडे सूचक पाहते. सगळ्यांना हसू फुटतं.

“आम्ही काम करतो असंच कुणाला वाटत नाही. सगळे फक्त इतकंच म्हणतात की वेळ कसा वाया घालवायचा, ते बायांना विचारा.”

वार्तांकनः देवेश ज्योती शिनोळी (महाराष्ट्र), पुरुषोत्तम ठाकूर (छत्तीसगड), उमेश कुमार राय (बिहार), स्मिता खटोर (पश्चिम बंगाल) आणि प्रीती डेव्हिड (उत्तर प्रदेश). संपादन सहाय्यः रिया बेहेल, सन्विती अय्यर, जोशुआ बोधिनेत्रा आणि विशाखा जॉर्ज यांनी केलं आहे. फोटो संपादनः बिनायफर भरुचा

Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale