वजन पाच किलोनं कमी झालं आणि बजरंग गायकवाड समजून चुकला की होत्याचं नव्हतं झालं. “या आधी मी दर दिवसाला सहा लिटर म्हशीचं दूध, ५० बदाम, १२ केळी आणि दोन अंडी खायचो. एका आड एक दिवस वशाट असायचं,” तो सांगतो. आणि आता मात्र हा सगळा खुराक आठवड्याभरात किंवा कधी कधी त्याहून जास्त दिवसांत मिळून घ्यावा लागतोय. त्याचं वजन कमी होऊन ६१ किलोवर आलंय.

“पैलवानाचं वजन कमी नाही व्हायला पाहिजे,” कोल्हापूरच्या जुने पारगावचा पैलवान, २५ वर्षीय बजरंग सांगतो. “अंगातली ताकद कमी होते, कुस्तीत हवी ती चाल टाकता येत नाही. आमच्या तालमीइतकाच आमचा खुराक पण फार महत्त्वाचा आहे.” पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या इतर पैलवानांप्रमाणे मैदान - लाल मातीतल्या कुस्त्या - मारून मिळवलेल्या पैशातून बजरंग आपला खुराक भागवत होता.

कोल्हापूरच्या दोनोली गावात बजरंगने मैदान मारलं त्याला आता ५०० दिवस उलटून गेलेत. “वाईटात वाईट दुखापत जरी झाली असती तरी मी इतका खंड पडू दिला नसता,” तो म्हणतो.

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः बजरंग आणि त्याची आई, पुष्पा गायकवाड. जुलै २०२१ मध्ये त्यांच्या घरात पुराचं पाणी शिरलं होतं. उजवीकडेः वस्ताद मारुती माने पावसात तालमीचं किती नुकसान झालंय ते पाहतायत. गेलं वर्षभर टाळेबंदीमुळे कुस्त्या बंदच होत्या. त्यानंतर आता पूर आला

मार्च २०२० पासून कुस्त्या बंदच होत्या. टाळेबंदी लागल्यापासून महाराष्ट्रात गावोगावी भरणाऱ्या जत्रा बंद झाल्या आणि तिथे खेळल्या जाणाऱ्या कुस्त्या देखील. ती बंदी अजूनही उठलेली नाही.

कोविड-१९ ची महासाथ पसरली त्या आधीच्या कुस्तीच्या हंगामात महाराष्ट्राच्या आणि उत्तर कर्नाटकातल्या बऱ्याच गावांमधल्या कुस्त्या मारून बजरंगने एकूण १,५०,००० रुपये कमावले होते. त्याची ती त्या वर्षीची एकूण कमाई होती. “चांगला पैलवान एका हंगामात किमान १५० कुस्त्या खेळू शकतो,” तो सांगतो. ऑक्टोबरच्या शेवटी सुरू होणाऱ्या कुस्त्या एप्रिल-मे पर्यंत (पावसाला सुरुवात होईपर्यंत) चालतात. “शिकाऊ पैलवान असला तर तो एखाद्या हंगामात ५०,००० रुपये कमावून आणतो. आणि तरबेज पैलवान २० लाखांपर्यंत रक्कम जिंकू शकतात,” बजरंगचे वस्ताद, ५१ वर्षीय मारुती माने सांगतात.

टाळेबंदी लागण्याआधीपासूनच ऑगस्ट २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला महापुराचा फटका बसला आणि हातकणंगले तालुक्यातल्या जुने पारगावच्या बजरंग आणि इतर पैलवानांना त्याची मोठी झळ बसली. तीन दिवसांच्या पावसाने वारणेच्या उत्तरेकडच्या तीरावर असलेलं जुने पारगाव आणि त्याच्या शेजारी असलेलं पारगाव पाण्याखाली गेलं होतं. या दोन्ही गावांची एकत्रित लोकसंख्या १३,३१० इतकी आहे (जनगणना, २०११).

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

टाळेबंदीचे निर्बंध लागले आणि महाराष्ट्रभरातल्या तालमी किंवा आखाडे देखील बंद झाले. याचा पैलवानांच्या तालमीवर परिणाम झाला. तालमी आणि कुस्त्यांमध्ये खंड पडू लागल्याने अनेक जण दुसरी कामं शोधू लागले

जुने पारगावातली जय हनुमान तालीमदेखील पाण्याखाली गेली. ही तालीम १०० वर्षांहून जास्त जुनी असल्याचा मानेंचा अंदाज आहे. इथल्या आणि आसपासच्या गावातल्या ५० पैलवानांच्या मदतीने सांगली जिल्ह्यातून २७ टन तांबडी माती ट्रकमध्ये लादून आणली आणि २३ बाय २० फुटाचा पाच फूट खोल आखाडा पुन्हा उभा केला. त्यासाठी ५०,००० रुपये खर्च आला.

पण टाळेबंदीच्या निर्बंधांमुळे महाराष्ट्रभरातले तालमी किंवा आखाडे बंद करण्यात आले. बजरंगच्या आणि बाकी पैलवानांच्या तालमीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. तसंच तालमी आणि कुस्त्यांमध्ये खंड पडू लागल्यामुळे अनेक जण दुसरी कामं शोधू लागले आहेत.

२०२१ च्या जून महिन्यात बजरंगने देखील गावापासून २० किलोमीटरवर असलेल्या एका वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कारखान्यात मजुरीला जायला सुरुवात केली. “मला १०,००० रुपये पगार मिळतो. खुराकच ७,००० रुपयांचा होतो,” तो सांगतो. अगदी तगड्या पैलवानांना तर दिवसाला १,००० रुपये खुराकावर खर्च करावे लागतात, मारुती माने सांगतात. पण याचं गणित जमेना. म्हणून ऑगस्ट २०२० पासून बजरंगने आपला आहार कमी करायला सुरुवात केली – आणि त्याचं वजन घटायला लागलं.

‘पुढचे किमान दोन महिने तरी इथे कुठलाच पैलवान तालीम करू शकणार नाही,’ वस्ताद माने सांगतात. ‘सर्वात आधी, सगळी माती महिनाभर सुकवावी लागणार’

व्हिडिओ पहाः पूर, टाळेबंदी आणि इतरही संकटांशी दोन हात

२०१३ साली बजरंगचे वडील वारले. ते शेतमजुरी करायचे. त्यानंतर बजरंगने बरीच कामं केली. काही काळ गावातल्या दूधसंघात तो पॅकेजिंगच्या कामाला जायचा. दिवसाला १५० रुपये मिळायचे आणि हवं तेवढं दूध.

त्याची आई, पुष्पा गायकवाड, वय ५० कायम त्याच्या पाठीशी होत्या. वयाच्या १२ व्या वर्षी त्याने पहिली कुस्ती खेळली तिथपासून ते आखाड्यातल्या तालमीपर्यंत. “रानात राबून [सहा तासांच्या कामाची १०० रुपये मजुरी घेऊन] मी त्याला पैलवान बनविलंय. पण आता लई अवघड झालंय. पूर यायला लागलाय त्यामुळं रानांनी कामंच नाहीत,” त्या म्हणतात.

बजरंग आता कामाला जातोय ते मेहनतीचं काम आहे आणि तालमीचा वेळ पण मिळत नाहीये. “कधी कधी तर तालमीला पण जाऊशी वाटत नाही,” तो सांगतो. मार्च २०२० पासून तालमी बंद असल्या तरी थोडे पैलवान कदी कधी जाऊन तालीम करतात.

PHOTO • Sanket Jain

जुने पारगावमधली तालीम मार्च २०२० पासून बंद असली तरी काही पैलवान तालमीला जातात. कुस्ती सुरू करायच्या आधी, पकड मिळवण्यासाठी अंग लाल मातीने माखून घेतलं जातं

मे २०२१ मध्ये एक वर्षभर तालीम वापरात नव्हती तेव्हा या पैलवानांनी पुन्हा एकदा आखाडा तयार करायला सुरुवात केली. ५२० लिटर म्हशीचं दूध, ३०० किलो हळद, १५ किलो दळलेला कापूर, अंदाजे २,५०० लिंबांचा रस, १५० किलो मीठ, १८० लिटर गोडं तेल आणि ५० लिटर कडुलिंबाचं पाणी मातीत कालवलं गेलं. या सगळ्यामुळे पैलवानांना कसल्या जखमा झाल्या किंवा काही लागलं तरी ते चिघळत नाहीत. यासाठी आलेला लाखभराचा खर्च परत एकदा पैलवानांच्या आणि काही स्थानिकांच्या मदतीने उचलला गेला.

दोन महिने पण उलटले नसतील, २३ जुलैला पुन्हा एकदा गावात पावसाचं आणि पुराचं पाणी भरलं. “२०१९ साली तालमीत १० फूट पाणी भरलं होतं. २०२१ साली १४ फुटांच्या वर पाणी गेलं,” बजरंग सांगतो. “आता आम्हाला [पुन्हा एकदा] हातभार लावणं होत नाही, म्हणून मी पंचायतीत गेलो. पण कुणीच मदतीसाठी पुढं आलं नाही.”

“आता पुढचे किमान दोन महिने तरी पैलवानांना तालीम करता यायची नाही,” माने वस्ताद सांगतात. “सर्वात आधी ही माती महिनाभर तर सुकवावी लागेल. आणि त्यानंतर नवी माती विकत आणून पसरावी लागणार आहे.”

PHOTO • Sanket Jain

जुने पारगावच्या एक पैलवान तालमीचा भाग म्हणून दोरखंडावर सराव करतोय. ‘एक दिवस पण तालीम बुडू द्या, तुम्ही हप्ताभर मागे गेलात समजा,’ सचिन पाटील सांगतो

मध्ये खंड पडलाय त्याचे पुढे थेट परिणाम दिसून येणार आहेत. “एक दिवस पण तालीम बुडू द्या, तुम्ही हप्ताभर मागे गेलात समजा,” २९ वर्षीय सचिन पाटील सांगतो. त्याने मानाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. फेब्रुवारी २०२० मध्ये त्याने हरयाणात सात कुस्त्या मारल्या होत्या. “चांगला हंगाम होता. मी २५,००० रुपये जिंकून आलो होतो,” तो म्हणतो.

गेल्या चार वर्षांपासून सचिन शेतमजुरी करतोय. कधी कधी पिकाला रासायनिक खतं देण्याचं काम असतं.  महिन्याला मजुरीतून ६,००० रुपये मिळतात. काही काळ त्याला कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा सहकारी साखर कारखान्याकडून मदत मिळाली – दिवसाला १ लिटर दूध आणि रहायला जागा. (तरुण होतकरू पैलवानांना राज्याच्या सहकारी साखर आणि दूधसंघांकडून अशी मदत केली जाते. बजरंगला देखील २०१४ ते २०१७ असं सहाय्य मिळालं होतं.)

मार्च २०२० आधी तो दररोज पहाटे ४.३० ते सकाळी पर्यंत आणि त्यानंतर संध्याकाळी ५.३० नंतर असा सराव करायचा. “पण टाळेबंदीच्या काळात तालीम बंद झाली, आणि त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय,” वस्ताद माने म्हणतात. पुन्हा कुस्ती खेळायची तर पैलवानांना किमान चार महिने तरी जोरदार तालीम गरजेची असल्याचं ते सांगतात. मात्र २०१९ च्या मध्यापासून ते आतापर्यंत – केवळ दोन वर्षांत दोन पूर आणि कोविडमुळे कुस्तीतली उमेदीची वर्षं हातची गेली की काय ही भीती सचिनच्या मनात घर करून आहे.

PHOTO • Sanket Jain

या सगळ्या आघातांमुळे कधी काळी लोकप्रिय असलेली मात्र आधीच उतरती कळा लागलेली कुस्ती आता मात्र घोर संकटात आहे

“२५ ते ३० या वयात तुम्ही एकदम भरात असता, त्यानंतर कुस्त्या खेळणं अवघड जातं,” माने सांगतात. ते स्वतः २० वर्षं कुस्त्या खेळले आहेत. गेल्या वीस वर्षांपासून ते गावातल्या एका खाजगी रुग्णालयात सुरक्षा रक्षकाचं काम करतायत. “गावाकडच्या पैलवानाचं आयुष्य म्हणजे संघर्ष आणि दुःख. अगदी तरबेज असलेले पैलवानसुद्धा मजुरी करायला लागलेत,” ते म्हणतात.

या सगळ्या आघातांमुळे कधी काळी लोकप्रिय असलेली, आधीच उतरती कळा लागलेली कुस्ती आता मात्र घोर संकटात आहे. महाराष्ट्रात मातीतली कुस्ती लोकप्रिय झाली कारण थोर समाजसुधारक आणि कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी तिला राजाश्रय दिला (१८९० पासून). अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान, तुर्कस्तान आणि आफ्रिकेतल्या काही पैलवानांना इथल्या कुस्त्यांमध्ये फार मागणी असायची. (वाचा - कुस्तीः धर्माच्या पल्याड आणि समन्वय साधत )

“१० वर्षांपूर्वी जुने पारगावात किमान १०० पैलवान असतील. आता तीच संख्या ५५ वर आलीये. लोकांकडे तालमीसाठी पैसाच नाही हो,” माने सांगतात. ते धनगर समाजाचे आहेत आणि पैलवानांची त्यांच्या कुटुंबाची ही दुसरी पिढी आहे. ते कसलेही पैसे न घेता पैलवानांना प्रशिक्षण देतात. घुनकी, किणी, निळेवाडी, पारगाव आणि जुने पारगाव या गावातले मुलं त्यांच्याकडे तालमीसाठी येतात.

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

‘यंदाचा [२०२१] पूर २०१९ पेक्षा वाईट होता,’ बजरंग सांगतो. जुने पारगावात या वर्षी परत एकदा पुराच्या पाण्याने थैमान घातलं

त्यांनी जिंकलेल्या कुस्त्यांची पदकं आणि चिन्हं तालमीत पुराच्या पाण्यापासून सुरक्षित उंचावरच्या फळीवर मांडून ठेवली आहेत. या महापुराबद्दल बोलताना ते म्हणतात, “२३ जुलैच्या [२०२१] रात्री मध्यरात्री २ वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो आणि जवळच्या शेतात गेलो. पाणी इतकं झपाट्याने वाढलं, एका दिवसात गाव पाण्याखाली गेलं.” माने कुटुंबियांनी त्यांची ६ शेरडं आणि म्हैस सुखरूप बाहेर काढली. पण २५ कोंबड्या मात्र पाण्यात वाहून गेल्या. २८ जुलैला पाणी ओसरू लागल्यावर माने आणि त्यांच्याबरोबर २० पैलवान सर्वात आधी तालमीवर पोचले. सगळी नासधूस झाली होती.

तरुण पैलवानांवर याचा काय परिणाम होणार आहे याचाच त्यांना घोर लागून राहिला आहे. सांगलीमध्ये बीएचं शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय मयूर बागडीने दोन वर्षांत [२०१८-१९] १० कुस्त्या जिंकल्या होत्या. “आणखी शिकून वेगवेगळ्या ठिकाणी जायचं मनात होतं पण या टाळेबंदीने सगळंच हिरावून घेतलं,” तो म्हणतो. दोन वर्षांपासून तो आपल्या घरच्या दोन म्हशीचं दूध काढायचं आणि शेतातलं काम करतोय.

फेब्रुवारी २०२० मध्ये तो घुनकीत कुस्ती खेळला ती शेवटची. तेव्हा त्याने २००० रुपये कमावले होते. “विजेत्या पैलवानाला पुरस्काराच्या ८० टक्के आणि उपविजेत्याला २० टक्के रक्कम मिळते,” सचिन पाटील सांगतो. त्यामुळे प्रत्येक कुस्तीत काही ना काही कमाई होतेच.

यंदाचा पूर येण्याआधी निळेवाडीचा मयूर आणि इतर तिघं पैलवान चार किलोमीटर प्रवास करून जुने पारगावात तालमीसाठी यायचे. “आमच्या गावात तालीम नाही ना,” तो म्हणतो.

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः २००५ आणि २०१९च्या पुरात पैलवान सचिन पाटील याच्या घराचं नुकसान झालं. उजवीकडेः निळेवाडीच्या मयूर बागडीने दोन वर्षांत १० कुस्त्या मारल्या होत्या

गेल्या महिन्यात आलेल्या पुराबद्दल तो सांगतो, “आम्ही एक अख्खा दिवस तीन फूट पाण्यात होतो. आमची सुटका झाली तेव्हा अंगात ताप भरला होता.” पारगावमधल्या एका खाजगी शाळेत बागडी कुटुंब एक आठवडाभर राहिलं. “आमचं पूर्ण घर पाण्यात गेलं, १० गुंठा रान होतं, तेही,” मयूर सांगतो. २० टन उसाचे ६०,००० रुपये तर येतील असा त्यांचा अंदाज होता. घरी साठवलेला ७० किलो मका, गहू आणि तांदूळदेखील पाण्यात गेला. “सगळं गेलंय,” मयूर म्हणतो.

पूर ओसरल्यावर मयूरने आपल्या आईवडलांसोबत घर सफाईला लागला. हे दोघंही शेती करतात आणि शेतात मजुरीला जातात. “वासच जाईना गेलाय, पण इथंच रहायचंय अन् इथंच खायचंय,” तो म्हणतो.

पुराची तीव्रता वाढत चाललीये, बजरंग म्हणतो. “२००५ पेक्षा २०१९ चा पूर वाईट होता. आणि २०१९ मध्ये तर आम्हाला एक पैसा नुकसान भरपाई मिळाली नाही. यंदाचा पूर २०१९ पेक्षा बेकार होता,” तो म्हणतो. “शासन आयपीएलचा इतका विचार करतं, अगदी दुसऱ्या देशात हलवायला तयार असतं, तर मग कुस्तीसाठी काहीच का करू शकत नाही?”

“काही पण होऊ द्या, मी कुठल्याही पैलवानाशी लढू शकतो,” सचिन म्हणतो. “पण कोविड आणि पुराशी दोन हात करणं मात्र शक्य नाही.”

Sanket Jain

Sanket Jain is a journalist based in Kolhapur, Maharashtra, and a 2019 PARI Fellow.

Other stories by Sanket Jain
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale