जेव्हा जेव्हा अनरुल इस्लाम आपल्या शेतात कामाला जातात, त्यांना दोन राष्ट्रांमधली सीमा पार करावी लागते. त्या आधी त्यांना सुरक्षा तपासणीचे वेळखाऊ सोपस्कार पार पाडावे लागतात. स्वतःचं ओळखपत्र ठेवून जावं लागतं (ते मतदारपत्र सोबत ठेवतात), रजिस्टरवर सही करावी लागते आणि त्यांची झडती घेतली जाते. त्यांच्याकडे शेतीची काही अवजारं असली तर तीही तपासली जातात. आणि त्यांच्यासोबत गायी असल्या तर त्यांच्या फोटोच्या प्रिंट जमा कराव्या लागतात.

“[एका वेळी] दोनहून जास्त गायी नेता येत नाहीत,” अनरुल सांगतात. “परतताना सही केल्यानंतर माझी कागदपत्रं परत केली जातात. जर एखाद्याकडे ओळखपत्र नसेल तर त्याला पलिकडे जाता येत नाही.”

अनरुल इस्लाम – इथे त्यांना सगळे बाबुल म्हणतात – मेघालयच्या साउथ वेस्ट गारो जिल्ह्याच्या बगिचा गावात राहतात. भारत आणि बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय सीमा ४,१४० किलोमीटर लांब आहे आणि जी जगातली पाचवी सगळ्यात लांब सीमा आहे. यातला ४४३ किलोमीटर भाग मेघालयात येतो. या सीमाभागाला काटेरी तारा आणि काँक्रीटचं कुंपण घातलेलं आहे.

१९८० च्या सुमारास कुंपण उभारायला सुरुवात झाली. खरं तर किती तरी शतकं स्थलांतर या प्रदेशाची अर्थव्यवस्था आणि ग्रामीण भागातील उपजीविकांचा भाग होता. भारतीय उपखंडाची फाळणी आणि त्यानंतर बांगलादेशाची निर्मिती यामुळे ही ये-जा थांबली. दोन्ही देशांमधल्या कराराचा भाग म्हणून या कुंपणाच्या भोवतीचा १५० यार्डाचा प्रदेश बफर झोन म्हणून राखून ठेवला आहे.

४७ वर्षांच्या अनरुल इस्लाम यांना हा वारसा मिळालाय. सात वर्षांचे असताना त्यांनी वडलांना नांगरणीसाठी मदत करायला म्हणून शाळा सोडली. त्यांच्या तिन्ही भावांना जमीन मिळाली आहे. ते ती कसतात किंवा कसायला देतात (त्यांच्या चारही बहिणी गृहिणी आहेत).

PHOTO • Anjuman Ara Begum

साउथ वेस्ट गारो हिल्स मधील आपल्या घरासमोर अनरुल इस्लामः ‘माझे पूर्वज इथे रहायचे, आणि आता ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे’

शेती व्यतिरिक्त चरितार्थासाठी अनरुल अधून मधून पैसे कर्जाने देतात किंवा बांधकामावर मजुरी करतात. पण त्यांचं मन कशात असेल तर ते जमिनीमध्ये आहे. “ही माझ्या वडलांची जमीन आहे. आणि अगदी लहान असल्यापासून मी इथे येतोय,” ते म्हणतात. “माझ्यासाठी ती खास आहे. आज ती कसताना मला छान वाटतंय.”

त्यांच्या मालकीची सात बिघा (सुमारे २.५ एकर) जमीन आहे, अगदी सीमेवर, कुंपणाच्या पलिकडे. पण सीमाभागातल्या सुरक्षा व्यवस्थांमुळे बफर झोन मधल्या भागात जाणं सुलभ नाही. आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षात शेती करणं सोडून दिलं आहे. अनरुल मात्र आजही जमीन कसतात कारण एक तर त्यांची जमीन सीमा प्रवेशद्वारापासून फार लांब नाही आणि दुसरं म्हणजे त्यांना या जमिनीशी आपली नाळ जोडली गेलीये असं वाटतं. “माझे पूर्वज इथे रहायचे. आज ती आंतरराष्ट्रीय सीमा आहे,” ते म्हणतात.

त्यांचं घराण्याला पूर्वी इथे मान होता, आणि त्यांची वंशावळ ‘दफादर्स भिता’ (जमीन मालकाची मूळ जमीन) नावाने ओळखल्या जाणाऱ्या निवासी भागात पसरली होती. १९७० नंतर, युद्ध संपल्यावर सीमेच्या प्रदेशातल्या दरोडेखारांपासून कसलंच संरक्षण नसल्याने ते सांगतात की अनेक जण इतर गावांमध्ये स्थायिक झाले किंवी महेंद्रगंजच्या वेशीवर रहायला गेले. झिकझाक तालुक्यातली ही नगरपालिका. अरनुल यांचं बगिचा हे ६०० वस्तीचं गावही याच तालुक्यात आहे. कुंपण घातल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारने जाहीर केलेली असलेली तरी अनेकांना त्यांच्या वाट्याची रक्कम अजूनही मिळालेली नाही.

सीमेचं प्रवेशद्वार सकाळी ८ वाजता उघडतं आणि दुपारी ४ वाजता बंद होतं. उरलेला वेळ ते बंद असतं. शेतावर निघालेल्या शेतकऱ्यांना त्यांचं नाव आणि वैध ओळखपत्र, सही असं सगळं द्यावं लागतं. सीमा सुरक्षा दलाकडे एक रजिस्टर असून त्यात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद असते. “नियम अगदी कडक आहेत. ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळत नाही. तुम्ही जर तुमचं ओळखपत्र विसरलात, तर अख्खा दिवस वाया गेला म्हणून समजा,” अरनुल सांगतात.

ते शेतात जाताना जेवण सोबत घेऊन जातात, “भात किंवा रोटी, डाळ, भाजी, मच्छी, बीफ...” सगळे पदार्थ एका अल्युमिनियमच्या पातेल्यात एकत्र करतात, त्यावर एक ताटली झाकतात आणि गमच्यात बांधून घेतात. मझारच्या जवळ एक विहीर आहे, तिथनं पाणी घेतात. जर का पाणी संपलं तर दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांना तसंच रहावं लागतं नाही तर मग परत एकदा एन्ट्री-एक्झिटचा खेळ करावा लागतो. पण ते सांगतात की कधी कधी बीएसएफचे लोक त्यांना मदत करतात. “पाणी प्यायचं असलं तरीसुद्धा मला इथपर्यंत येऊन सगळे सोपस्कार पार पाडावे लागतात आणि कितीदा तर गेट उघडण्यासाठी खूप वेळ वाट पहावी लागते,” अनरुल सांगतात. “माझ्यासारख्या शेतकऱ्याला हे शक्य होईल का?”

PHOTO • Anjuman Ara Begum

भारत-बांगलादेशातल्या करारानुसार बफर झोन म्हणून राखीव ठेवण्यात आलेल्या या परिसरात अनरुल यांची जमीन आहे, तिथे जाण्यासाठी त्यांना सीमा पार करून जावं लागतं

सकाळी ८ ते दुपारी ४ इतकाच वेळ मिळाल्यामुळे पण अडचणी येतात. महेंद्रगंजचे शेतकरी पारंपरिक रितीनुसार पहाटे, सूर्योदयापूर्वी नांगरट करतात. “भाताची आंब किंवा रात्रीचं उरलंसुरलं खायचं आणि पहाटे चार वाजता शेतात काम सुरू करायचं. सूर्य माथ्यावर येईपर्यंत आम्ही आमचं काम उरकलेलं असायचं. पण इथे, गेट ८ वाजता उघडतं त्यामुळे मला भर उन्हात काम करावं लागतं. माझ्या तब्येतीवर परिणाम होतो,” अनरुल सांगतात.

ते वर्षभर सुरक्षेचे हे सगळे नियम पाळतात. प्रवेश देण्याआधी बीएसएफ सगळ्या गोष्टींची झडती घेतात. मोबाइल फोन नेण्याची परवानगी नाही. गेटवर तो जमा करायचा आणि जाताना परत घेऊन जायचा. शेतीची अवजारं आणि सोबतची प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली जाते. ट्रॅक्टर आणि नांगरणीची यंत्रं न्यायला परवानगी आहे. अनरुल कधी कधी ती घेऊन जातात पण जर एखादा वरिष्ठ अधिकारी सीमेवर येणार असेल तर तीही थांबवली जातात. कधी कधी तर गायींना पण अडवतात. आणि मग त्यांना दिवस भर कुठे तरी ठेवून शेतात काम करणं मुश्किल होतं, अनरुल सांगतात. त्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या तीन गायी विकल्या आणि एक गाय आणि तिचं वासरू दुसऱ्याला भाड्याने दिलंय. त्यामुळे आज काल ते भाड्याने गाय घेतात शेतात नेतात.

सीमेच्या गेटवर बियाणंसुद्धा तपासलं जातं. ताग आणि उसाचं बेणं न्यायला परवानगी नाही – तीन फुटांहून उंच वाढणाऱ्या कशालाही परवानगी नाही, कारण त्यामुळे टेहळणीत अडथळा निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे अनरुल हिवाळ्यात डाळी, पावसाळ्यात धान, पपई, मुळा, वांगी, मिरची, शेवगा आणि भोपळ्यासारख्या भाज्या लावतात आणि पालेभाजी वर्षभर पिकवतात. भाताच्या हंगामात, जुलै ते नोव्हेंबर दरम्यान अनरुल त्यांची थोडी जमीन खंडाने कसायला देतात आणि एरवी स्वतःच कसतात.

शेतातला माल आणणंसुद्धा दिव्यच असतं – भाताची कापणी काही आठवडे चालते आणि एकूण २५ क्विंटल भात होतो, बटाटा २५-३० क्विंटल. “मी माझ्या डोक्यावर माल लादून आणतो. दोन ते पाच खेपा होतात,” अनरुल सांगतात. आधी ते गेटपर्यंत त्यांचा माल आणतात, तिथून गेटच्या अलिकडे ढकलतात. तिथून रस्त्याच्या कडेपर्यंत आणतात. आणि मग गावातली गाडी करून घरी किंवा महेंद्रगंजच्या बाजारात माल जातो.

PHOTO • Anjuman Ara Begum

त्यांच्या परसबागेत, सुपारीची रोपं. सीमेवरील गेटवर बियाणंसुद्धा तपासलं जातं. ताग आणि उसाचं बेणं नेता येत नाही. तीन फुटांहून उंच वाढणाऱ्या कशालाच परवानगी नाही, कारण त्यामुळे टेहळणीत अडथळा येऊ शकतो.

कधी कधी गुरं सीमा ओलांडून इकडे तिकडे गेली किंवा गवताच्या गंजी चोरीला गेल्या की भांडणं लागतात. सीमारेषा नक्की कोणती यावरूनही वादावादी होते. “१० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी माझ्या शेतात काम करत होतो आणि काही बांगलादेशी लोकांशी माझी भांडणं झाली. मी माझ्याच जमिनीवरचा एक उमाट्याचा भाग सपाट करत होतो,” अनरुल सांगतात. “बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेशचे लोक लगोलग आले आणि मला काम थांबवायला सांगितलं. त्यांचं म्हणणं काय तर ही जमीन बांगलादेशच्या मालकीची आहे.” अनरुलने सीमा सुरक्षा दलाकडे तक्रार केली. स्थानिक लोक सांगतात की अनेक ध्वज बैठका झाल्या, भारत आणि बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलांमध्ये वादावादी झाली आणि अखेर बांबू लावून सीमारेषा नक्की करण्यात आली. लवकरच हे बांबू गायब झाले. अनरुल सांगतात की त्यांची दोन बिघा जमीन गेली. ती अजूनही परत मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना मिळालेल्या वडलोपार्जित सात बिघा जमिनीपैकी ते केवळ पाच बिघाच कसू शकतायत.

भारतीय आणि बांगलादेशी शेतकरी काही मीटरच्या अंतरावर शेतात काम करत असतात. मध्ये फक्त सीमारेषा असते, अनरुल म्हणतात. “मी त्यांच्याशी बोलायचं टाळतो कारण सुरक्षा दलाला ते आवडत नाही. त्यांना जरा जरी संशय आला तर मला शेतात जाणं बंद होईल. त्यामुळे मी फार काही बोलत नाही. त्यांनी काही विचारलं तरी मी गप्प राहतो.”

“चोरटे माझा भाजीपाला चोरून नेतात, पण माझी काही तक्रार नाही,” ते म्हणतात. “त्यांना इमान नाही, पण माझ्यावर अल्लाची कृपा आहे.” सीमाभाग गाईगुरांच्या तस्करीसाठी प्रसिद्ध आहे. महेंद्रगंजचे रहिवासी सांगतात की आजकाल अंमली पदार्थांची तस्करी देखील वाढली आहे. अनरुल यांनी एका २८ वर्षांच्या तरुणाला २०१८ साली ७०,००० रुपये कर्जाने दिले होते. वर २०,००० व्याजाचे मिळतील अशी त्यांना आशा होती. पण लवकरच तो तरुण अमंली पदार्थांच्या सेवनामुळे मरण पावला. लोक सांगतात की त्या गोळ्या सीमेपलिकडून आल्या होत्या. “अंमली पदार्थ सहज मिळतात,” अनरुल सांगतात. “कुंपणाच्या पलिकडून इकडे फेकायचे. तुमची फेक चांगली असेल तर तुम्ही इकडे ड्रग्ज सहज आणू शकता.” आपण दिलेल्या कर्जाची अनरुल यांना चिंता होती. मग ते त्या तरुणाच्या कुटुंबाशा बोलले. त्यांनी नंतर ५०,००० रुपये परत करायचं कबूल केलं.

पैशाच्या व्यवहारांबद्दल ते सांगतात की “आमच्या मोठ्या कुटुंबाचं सगळं भागवणं अवघड जात होतं. म्हणून जेव्हा केव्हा माझ्याकडे पैसा असायचा तेव्हा मी तो व्याजाने दुसऱ्यांना द्यायचो. त्यातून सुरू झालं.”

PHOTO • Anjuman Ara Begum
PHOTO • Anjuman Ara Begum

भारताच्या बाजूचा रस्ता आणि सीमेवरचं प्रवेशद्वार. कधी कधी कधी गुरं सीमा ओलांडून इकडे तिकडे गेली,  गवताच्या गंजी चोरीला गेल्या किंवा सीमारेषा नक्की कोणती यावरूनही वादावादी होते

या कुंपणामुळे सिंचन आणि पाण्याचा निचरा या दोन्हीला अडथळा होतोय. जुलै-ऑगस्टमध्ये जोराचा पाऊस झाला तर अनरुल यांच्या कोरडवाहू जमिनीत पाणी भरतं. पण त्या पाण्याला वाट काढून देता येत नाही. कडक नियम आणि चोरांच्या भीतीमुळे शेतावर पंप बसवता येत नाही. आणि मोठ्याची यंत्राची रोज नेआण करता येत नाही. जमिनीचं सपाटीकरण करायला जेसीबीसारखी मोठी यंत्रं आणायला परवानगी नाही. मग आपणहून एक दोन दिवसांत पाण्याचा निचरा होण्याची वाट पहावी लागते. मोठा पूर आला तर दोन आठवडेही लागू शकतात. त्याचा पिकांना फटका बसतो, पण अनरुल यांना हे नुकसान सहन करण्याशिवाय पर्याय नाही.

शेतात मजूर लावण्यातही अनेक अडचणी आहेत. ज्यांच्याकडे वैध ओळखपत्र आहे, अशांनाच ते कामावर ठेवू शकतात. शिवाय सगळ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणंही शक्य होत नाही. शेतात एकही मोठं झाड नाही त्यामुळे बसायला आडोसा नाही. “मजुरांना इतके सगळे नियम पाळणं जमत नाही,” ते सांगतात. रान कुठे सांगितलं की ते खळखळ करायला लागतात. त्यामुळे अनरुल यांना एकट्यानेच सगळं काम करावं लागतं. कधी कधी ते आपली बायको किंवा घरच्या कुणाला तरी मदतीला घेऊन जातात.

सीमाक्षेत्रातल्या शेतात काम करायचं तर बायकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. इथे संडास नाहीत. बफर झोनमध्ये लहान मुलांना प्रवेश नाही आणि कधी कधी मजुरीसाठी येणाऱ्या बाया आपली लेकरं सोबत घेऊन येतात, अनरुल सांगतात.

त्यांचा तिसरा व्यवसाय म्हणजे बांधकामावर मजुरी. तिथे त्यांना नियमित मजुरी मिळते असं अनरुल सांगतात. या परिसरात, किमान १५-२० किलोमीटरच्या परिघात अनेक सार्वजनिक आणि खाजगी बांधकामं सुरू आहेत आणि तिथे नियमित काम मिळतं. कधी कधी ते ८० किलोमीटरवरच्या तुरा या शहरात जातात. (पण कोविड-१९ आणि टाळेबंदीमुळे हे आता बंद आहे). तीन एक वर्षांपूर्वी अनरुल यांनी या कामातून तीन लाखांची कमाई केली होती आणि त्यातून एक जुनी मोटरसायकल आणि आपल्या मुलीच्या लग्नासाठी सोनं घेतलं होतं. एरवी त्यांना दिवसाला ७०० रुपये मजुरी मिळते आणि एका वर्षात बांधकामावर काम करून ते लाखभर रुपये कमवतात. “यात मला लगेच पैसा हातात पडतो. भातशेतीतून पैसा येण्यासाठी मला तीन महिने तरी थांबावं लागतं,” ते म्हणतात.

PHOTO • Anjuman Ara Begum
PHOTO • Anjuman Ara Begum

डावीकडेः अनरुल आणि त्यांच्या गावातले इतर काही जण त्यांच्यासाठी नित्याचा बनलेल्या सीमाप्रश्नाविषयी चर्चा करतायत. उजवीकडेः आपल्या नातीच्या जन्माचा सोहळा कुटुंबासोबत साजरा होतोय

अनरुल शिक्षणाला फार महत्त्व देतात. त्यांचे मोठे बंधू पूर्वी शाळेत शिक्षक होते. त्यांची मुलगी १५ वर्षांची शोभा बेगम आठवीत आहे आणि ११ वर्षांचा सद्दाम चौथीमध्ये. सहा वर्षांची सीमा बेगम तिसरीत शिकतीये. त्यांच्या थोरल्या तिघी मुली विवाहित आहेत. अनरुल यांच्या दोन बायका आहेत, जिप्सिला टी. संगमा आणि जकीदा बेगम, दोघी अंदाजे चाळिशीच्या आहेत.

ते म्हणतात की आपल्या मोठ्या मुलींनी पदवीपर्यंत शिकावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र, “टीव्ही, मोबाइल फोनचा त्यांच्यावर परिणाम झाला, त्या प्रेमात पडल्या आणि लग्न केलं. माझ्या मुलांना फार काही बनण्याची आस नाही आणि त्याचा मला त्रास होतो. ते मन लावून अभ्यास किंवा काम करत नाहीत. पण माझा नशिबावर विश्वास आहे आणि आशा करतो की त्यांच्या आयुष्यात त्यांचं नशीब चांगलं असेल.”

२०२० साली अनरुल काजूच्या धंद्यात पडायचा विचार करत होते. पण सीमा सुरक्षा दलाने जाहीर केलं की कोविडच्या प्रतिबंधासाठी सीमेवर प्रवेश दिला जाणार नाही आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाता येणार नाही. त्यामुळे अनरुल सांगतात की त्यांचं थोडं फार नुकसान झालं. पण सुपारीच्या रोपांमध्ये त्यांना थोडा नफा झाला.

गेल्या वर्षी २९ एप्रिलपर्यंत सीमेवरचं गेट पूर्ण बंद होतं. त्यानंतर शेतकऱ्यांना ३-४ तास कामाची परवानगी मिळाली. आणि हळू हळू नेहमीप्रमाणे वेळा सुरू झाल्या.

इतक्या वर्षांमध्ये अनरुल यांची बीएसएफच्या लोकांशी मैत्री झाली आहे. “कधी कधी मला त्यांच्यासाठी वाईट वाटतं. आपल्या कुटुंबापासून ते दूर राहतात आणि इथे आमच्या संरक्षणासाठी येऊन राहतात,” ते म्हणतात. कधी कधी ते ईदच्या सणाला त्यांना आपल्या घरी जेवायला बोलावतात. किंवा कधी तरी त्यांच्या साठी भात आणि मटणाचा रस्सा घेऊन जातात. आणि क्वचित कधी तेही अनरुल सीमेवरून इकडून तिकडे जात असताना त्यांना चहा देऊ करतात.

लेखिकेचं कुटुंब महेंद्रगंज येथील आहे.

अनुवादः मेधा काळे

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is also a translator for PARI.

Anjuman Ara Begum

Anjuman Ara Begum is a human rights researcher and freelance journalist based in Guwahati, Assam.

Other stories by Anjuman Ara Begum