१ मे. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गोंदियातल्या महिला कामगारांच्या सन्मानार्थ आज आम्ही हा लेख पुनःप्रकाशित करत आहोत. २७ जानेवारी २००७ रोजी पहिल्यांदा द हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या या लेखातल्या स्त्रियांची परिस्थिती आजही फारशी सुधारलेली नाही.

रेवंताबाई कांबळे किती तरी महिने झाले तिच्या सहा वर्षाच्या लेकाशी बोललीच नाहीये. ते दोघंही तिरोड्याला एकाच घरात राहतात. बुरीबाई नागपुरेंचीही तीच गत आहे. त्या किमान त्यांच्या मोठ्या मुलाला जागेपणी कधी तरी पाहतात तरी. महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात या दोघींसारख्या अशा शेकडो स्त्रिया आहेत ज्या स्वतःच्या घरी दिवसातले फक्त चार तास असतात आणि दिवसाला ३० रुपयांचा रोजगार कमवण्यासाठी दर आठवड्याला १,००० किलोमीटरहून जास्त प्रवास करतात.

सकाळचे ६ वाजलेत. आम्ही या बायांसोबत त्यांच्या घरून रेल्वे स्टेशनवर येतो. त्या आधी दोन तास सगळ्या जणी जाग्या झाल्या होत्या. “स्वयंपाक, धुणी भांडी, सगळं उरकलंय,” बुरीबाई खुशीत सांगतात. “आता बोला.” आम्ही आलो तेव्हा त्यांच्या घरचं कुणीही जागं नव्हतं. “बिचारी थकून गेलीयेत,” बुरीबाई म्हणतात. पण बुरीबाई स्वतः दमल्या नाहीयेत का? “होय. पण करणार काय? दुसरा काहीच मार्ग नाही ना.”

स्टेशनवर अशा ‘दुसरा काहीच मार्ग नसलेल्या’ अनेक जणी होत्या. त्यांचं वेगळेपण म्हणजे, त्या काही गावातून शहरात येणाऱ्या कामगार नाहीत. त्या शहरातल्या अशा मिळेल ते काम करणाऱ्या, गावात रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या कामगार आहेत. आणि मग अशाच शोधात त्या तिरोड्यासारख्या तालुक्याच्या गावाहून दररोज आसपासच्या गावात जाऊन, तिथे शेतात राबतात. दररोज २० तास घरापासून लांब. साप्ताहिक सुट्टी वगैरे नसतेच आणि तिरोऱ्यात तर काही कामं पण नाहीयेत. “विडी उद्योग बंद झाला, आणि तेव्हापासून त्यांना काम मिळणं दुरापास्त झालंय,” गोंदियाचे किसान सभेचे जिल्हा सचिव महेंद्र वाल्दे सांगतात.

PHOTO • P. Sainath
PHOTO • P. Sainath

फलाटावर आणि रेल्वेत बुरीबाई नागपुरे (डावीकडे) आणि शकुंतलाबाई आगाशे (उजवीकडे) यांच्यासारख्या अनेक जणी आहेत. चेहऱ्यावर चिंता, भुकेल्या आणि पेंगुळलेल्या

यातल्या अनेक जणी स्टेशनपासून चार ते पाच किलोमीटर दूर राहतात. “त्यामुळे आम्हाला पहाटे ४ वाजताच उठावं लागतं,” पन्नाशीला टेकलेल्या बुरीबाई सांगतात. “आम्ही आमची कामं उरकतो आणि ७ वाजेपर्यंत पायी पायी स्टेशनला पोचतो.” तितक्यात गाडी येते आणि आम्ही नागपूरच्या साळव्याला जाणाऱ्या या घोळक्याबरोबर गाडीत शिरतो. ७६ किलोमीटरच्या या प्रवासाला २ तास लागतात. फलाटावर आणि रेल्वेत अनेक जणी आहेत. चेहऱ्यावर चिंता, भुकेल्या आणि पेंगुळलेल्या. बहुतेक जणी खचाखच भरलेल्या गाडीत खाली बसकण मारतात. जरा कडेला टेकून आपलं स्टेशन येण्याआधी मिळालीच तर डुलकी काढतात. नागपूरच्या मौदा तालुक्यातलं साळवा हे केवळ १०५ उंबऱ्याचं, ५०० रहिवासी असलेलं गाव आहे.

“आम्ही रात्री ११ वाजता घरी पोचू,” विशी पार केलेली रेवंताबाई म्हणते. “झोपायलाच मध्यरात्र होते. त्यानंतर परत पहाटे ४ ला उठायचं. मी माझ्या सहा वर्षाच्या लेकाला जागं पाहून किती दिवस झालेत.” मग ती हसते. “लहानी लेकरं तर आईला पाहिलं तर ओळखायची नाहीत.” त्यांच्या मुलांनी परवडत नाही म्हणून शाळा सोडली आहे. जात असली तर शिक्षणात त्यांना फारशी गती नाही. “त्यांच्याकडे लक्ष द्यायला, अभ्यास घ्यायला कुणीच नाही,” बुरीबाई सांगतात. आणि काही काही मुलं तर स्वतःच मिळेल ती कामं करतायत.

“अर्थात, शाळेत त्यांना काहीच धड येत नाही,” तिरोड्याच्या शिक्षिका लता पापनकर सांगतात. “त्यांचा काय दोष?” पण महाराष्ट्र शासनाच्या मते ते दोषी आहेत. त्यांच्या अधोगतीचा फटका शाळेला बसणार, आणि शाळेला मिळणारा निधीसुद्धा शाळांना गमवावा लागू शकतो. अगदी या मुलांना मदत करणारे शिक्षकही दोषीच ठरवले जाणार बरं. निकाल चांगला लागला नाही तर त्यांनाही दंड केला जाऊ शकतो. असं धोरण असेल तर ते शाळेपासून चार पावलं लांब राहणंच पसंत करतील, नाही?

गाडीत खाली बसलेल्या साधारणपणे पन्नाशीच्या असलेल्या शकुंतलाबाई आगाशे सांगतात की गेली १५ वर्षं त्यांचा हाच दिनक्रम आहे. सुट्टी फक्त सणावाराला आणि पावसाळ्यात. “थोडी फार कामं असतात ज्याचे ५० रुपये मिळतात. जास्ती करून २५-३०.” त्यांच्या शहरात काही कामंच नाहीत, या बाया सांगतात.

PHOTO • P. Sainath
PHOTO • P. Sainath

रेवंताबाई कांबळे (लाल साडीत, डावीकडे), शकुंतलाबाई आणि बुरीबाई (उजवीकडे) केवळ चार तास घरी असतात आणि थोड्याशा पैशासाठी आठवड्याला १,००० किलोमीटरचा प्रवास करतात

जो काही पैसा होता तो आता शहरांकडे वळालाय. तिथले उद्योग बंद पडलेत. त्यामुळे या अशा दूरवरच्या शहरांना अवकळा आलीये. पूर्वी यातल्या जवळपास सगळ्या जणींना बिड्या वळायचं काम मिळायचं. “ते थांबलं, आणि आम्ही बुडालो,” बुरीबाई सांगतात. “बिडी उद्योगाला कसले निर्बंध नाहीत. या उद्योगाला स्वस्त श्रम पाहिजेत,” या क्षेत्राचा अभ्यास केलेले मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजचे के. नागराज म्हणतात. “हा उद्योग आज इथे तर उद्या तिथे असा आहे. पण याचे त्यात काम करणाऱ्या माणसांवर फार भयंकर परिणाम होतात. गेल्या १५ वर्षांत त्यात प्रचंड वाढ झाली आहे.” बिड्यांचं बरचसं काम “गोंदियातून उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडला गेलंय,” किसान सभेचे प्रदीप पापनकर सांगतात.

“छे. गाडीचं तिकिट आम्ही कधीच काढत नाही,” या बाया सांगतात. “येऊन जाऊन तिकिट आम्ही कमावतो त्या ३० रुपयांपेक्षा जास्त होईल. आम्ही सोपा उपाय शोधलाय. आम्हाला पकडलंच, तर आम्ही चेकरला ५ रुपये लाच देतो.” तिकिट वसुलीचं काम खाजगी क्षेत्राताला दिलंय. “आम्हाला तिकिटं परवडत नाहीत त्यांना माहितीये, त्यामुळे ते आमच्याकडून पैसे काढतातच.”

“माझा थोरला मला कधी कधी सायकलवर स्टेशनला आणून सोडतो,” बुरीबाई सांगतात. “मग तो तिथेच काही काम मिळतंय का ते पाहतो. पैसे किती का मिळेना. माझी पोरगी घरी स्वयंपाक करते आणि धाकटा थोरल्यासाठी डबा घेऊन येतो.” थोडक्यात काय तर “एकाच्या मजुरीत तिघं काम करतायत,” वाल्दे म्हणतात. “पण घरातले सगळे, पाचही जण मिळून, नवऱ्याला धरून, दिवसाला १०० रुपये सुद्धा कमावू शकत नाहीत. कधी कधी एक दोघांची काहीच कमाई होत नाही. आणि त्यांच्याकडे बीपीएलचं रेशन कार्डही नाही.”

स्टेशनवर वाटेतच मुकादम थांबलेले असतात, स्वस्तात मजूर मिळण्याची वाट बघत.

सकाळी ९ वाजता आम्ही साळव्याला पोचलो. एक किलोमीटर चालत गावात आलो आणि जमीनमालक प्रभाकर वंजारे यांच्या घरी क्षणभर थांबून तीन किलोमीटर चालत शेतात पोचलो. हा शेवटचा टप्पा बुरीबाईंनी डोक्यावर पाण्याचा मोठा हंडा घेतला होता. तरी आम्हाला सगळ्यांना मागे टाकून त्या पुढे गेल्या.

PHOTO • P. Sainath
PHOTO • P. Sainath

शकुंतलाबाई आणि बुरीबाईः या दोघी घरी पोचतात तेव्हा त्यांच्या घरचे सगळे झोपी गेलेले असतात आणि त्या पहाटे निघतात तेव्हा झोपेतून जागे व्हायचे असतात

त्या ज्यांच्या शेतात अगदी कवडीमोलाने काम करतात, त्यांचा पायही खोलातच आहे. कृषीसंकटाचा वंजारेंनाही फटका बसलेला आहे. त्यांच्या मालकीची तीन  एकर जमीन आहे आणि जास्तीची १० एकर त्यांनी करायला घेतलीये. “भाव विचारूच नका. आमची कसलीच कमाई होत नाही,” ते तक्रार सांगतात. त्यामुळे गावातले मजूर कामाच्या शोधात दुसरीकडे निघून गेलेत. आणि म्हणून या बाया इथे येऊन राबतायत.

हा पूर्व विदर्भाचा भाग आहे. संकटात सापडलेल्या कपाशीच्या पट्ट्यापासून बराच दूर. वंजारे धान, मिरची आणि इतर पिकं घेतात. सध्या त्यांना शेताची तण वेचायच्या कामासाठी बायांची गरज आहे. त्या संध्याकाळी ५.३० पर्यंत काम करतात आणि त्यानंतर तासभरात स्टेशनला पोचतात.

“पण गाडी थेट ८ वाजता येते,” बुरीबाई सांगतात. “त्यामुळे तिरोड्याला पोचायला १० वाजून जाणार.” त्या घरी पोचतात तोवर त्यांच्या घरचे झोपी गेलेले असतात. आणि सकाळी या बाहेर पडतात तेव्हा अजून झोपेतून जागे झाले नसतात. “संसार तरी कसला म्हणायचा?” रेवंताबाई विचारते.

त्या घरी परततात तोपर्यंत त्यांनी १७० किलोमीटरहून जास्त प्रवास केलेला असतो. आणि त्या ३० रुपयांसाठी त्या आठवड्यात दररोज हाच प्रवास करणार आहेत. “आम्ही ११ वाजता घरी पोचू,” बुरीबाई सांगतात, “जेवायचं, निजायचं.” त्यानंतर चारच तासांनी त्या उठतील आणि परत एकदा तेच रहाट गाडगं सुरू होईल.

अनुवादः मेधा काळे

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is also a translator for PARI.

P. Sainath is Founder Editor of the People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought'.

Other stories by P. Sainath