मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज "वर्षा' निवासस्थानी बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत शिवसेनेने पालघर पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती शिवसेनेला केली असल्याचे समजते. लोकसभेच्या पुढील चार पोटनिवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
ठाकरे आणि फडणवीस यांची आज नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावर भेट झाली. या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस या दोघांमध्येच बंद दाराआड 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. यात पालघर येथील भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार देऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याचे समजते. लोकसभेत भाजपला 282 जागा मिळाल्याने स्पष्ट बहुमत आहे; मात्र राजस्थानमध्ये दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा विजय झाल्याने भाजपला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत; अजून चार जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यातील एक जागा पालघरची आहे. ही जागा भाजपसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे शिवसेनेने या ठिकाणी उमेदवार दिल्यास मतविभाजन होऊन विरोधकांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.