नगर - 'हे सरकार आहे' असा विश्वास लोकांना देण्याची सत्ताधाऱ्यांची कुवतच नाही. त्यामुळे शेतकरी, कामगार, तरुण, सामान्य नागरिक, महिला कोणीच समाधानी नाही. भ्रष्टाचारमुक्तीऐवजी मोठे लोक राजरोस बॅंका बुडवत आहेत. गैरव्यवहार होत आहेत, सीमेवर सैनिक मरत आहेत. मात्र, केंद्रातील कोणीच जबाबदार व्यक्ती बोलत नाही. सरकार लोकांची दिशाभूल करत आहे,'' असे आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवून, समविचारी पक्षांसोबत विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढविण्याची मानसिकता असल्याचेही यांनी स्पष्ट केले.
"हल्लाबोल' आंदोलनासाठी पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारच्या कारभारावर कडाडून टीका करताना पवार म्हणाले, ""केंद्रात शरद पवार कृषिमंत्री असताना दुष्काळ, गारपीट किंवा अन्य कोणत्याही संकटात शेतकऱ्यांना आधार दिला. त्यामुळे शेतकरी समाधानी होता. आता मात्र शेतकऱ्यांना जगणे महाग झालेय. सरकारची किमान आधारभूत दर देण्याची घोषणा निव्वळ दिशाभूल आहे. कर्जमाफी हे फक्त नाटक असून, त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. बोंड अळीच्या नुकसानीची मदत नाही, तुडतुड्यांमुळे धानाचे नुकसान झाले, त्यांना मदत न देता केवळ खोटी आश्वासने सरकारने दिली. सध्याची राज्याची आणि देशाची स्थिती गंभीर आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर देश आणि राज्य खूप मागे जाईल.''
जिल्हा विभाजन "चुनावी जुमला'
जिल्हा विभाजनाच्या चर्चेबाबत मत व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, ""आम्हीही सत्तेत होतो. नवीन जिल्हा तयार करण्याचे काम सोपे नाही. हे सरकार नगरसह कोणत्याच जिल्ह्याचे विभाजन करणार नाही. आतापर्यंत लोकांना दिलेले कोणतेही आश्वासन या सरकारने पाळले नाही, त्यामुळे हेही आश्वासन पाळले जाणार नाही. जिल्हा विभाजनाची चर्चा म्हणजे केवळ "चुनावी जुमला' आहे!''
|