आहार हितकर - अहितकर
आहार हा जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक आहे. कारण जगण्यासाठी प्रत्येक जिवाला अन्नाची आवश्यकता असते. हितकर आहाराचे सेवन हे मनुष्याच्या वृद्धीला, पोषणाला कारणीभूत असते, तर अहितकर आहार हा रोगवृद्धीचे कारण असतो.
आरोग्य कशाने टिकते आणि रोग कशामुळे होतात हे एकदा कळले तर, जीवन जगणे सोपे होईल हे नक्की. आयुर्वेदात हे ठिकठिकाणी समजावलेले आहे. चरकसंहितेतील यञ्जपुरुषीय अध्यायात काशीराज वामकाच्या प्रश्नाला उत्तर देताना पुनर्वसु आत्रेय ऋषींनी म्हटले आहे,
आहार हा जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक आहे. कारण जगण्यासाठी प्रत्येक जिवाला अन्नाची आवश्यकता असते. हितकर आहाराचे सेवन हे मनुष्याच्या वृद्धीला, पोषणाला कारणीभूत असते, तर अहितकर आहार हा रोगवृद्धीचे कारण असतो.
आरोग्य कशाने टिकते आणि रोग कशामुळे होतात हे एकदा कळले तर, जीवन जगणे सोपे होईल हे नक्की. आयुर्वेदात हे ठिकठिकाणी समजावलेले आहे. चरकसंहितेतील यञ्जपुरुषीय अध्यायात काशीराज वामकाच्या प्रश्नाला उत्तर देताना पुनर्वसु आत्रेय ऋषींनी म्हटले आहे,
हिताहारोपयोग एक एव पुरुषवृद्धिकरो भवति ।
अहिताहारोपयोगः पुनर्व्याधिनिमित्तमिति ।।
हितकर आहाराचे सेवन हे मनुष्याच्या वृद्धीला, पोषणाला कारणीभूत असते, तर अहितकर आहार हा रोगवृद्धीचे कारण असतो. आहार हा जीवनाच्या तीन आधारस्तंभांपैकी एक आहे. कारण जगण्यासाठी प्रत्येक जिवाला अन्नाची आवश्यकता असते. मात्र अन्न फक्त पोट भरण्यासाठी खायचे नसते, तर आरोग्यवृद्धीसाठी, शरीरपोषणासाठी सेवन करायचे असते. या ठिकाणी हितकर आहार म्हणजे काय हे सुद्धा समजावलेले आहे,
समांश्चैव शरीरधातून् प्रकृतौ स्थापयति, विषमांश्च समीकरोति इति एतद् हितं विद्धि ।
जो आहार सम अवस्थेत असणाऱ्या शरीरधातूंना संतुलित ठेवतो आणि विषम म्हणजे बिघडलेल्या शरीरधातूंनासुद्धा संतुलनात आणतो, त्याला हितकर आहार म्हणतात.
हितकर आहार
मात्र ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायानुसार प्रत्येक व्यक्तीसाठीचा हितकर आहार वेगवेगळा असणार. फक्त प्रकृतीच नाही तर देश, काल, मात्रा, दोष वगैरे अनेक मुद्द्यांच्या अनुषंगानेही हितावहता बदलत राहते. मात्र स्वभावानेच हितकर आहाराची काही उदाहरणे चरकसंहितेत दिली आहेत, ती अशी,
लोहितशालयः शूकधान्यानाम् - धान्यांमध्ये रक्तसाळ म्हणजे तांबड्या रंगाचा तांदूळ
मुद्गाः शमीधान्यानाम् - कडधान्यांमध्ये मूग
आन्तरिक्षम् उदकानाम् - सर्व प्रकारच्या पाण्यांमध्ये आकाशातून पडलेले पावसाचे पाणी
सैन्धवं लवणानाम् - सर्व प्रकारच्या मिठांमध्ये सैंधव मीठ
जीवन्तीशाकं शाकानाम् - सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये जीवन्ती नावाची भाजी
ऐणेयं मृगमांसानाम् - प्राण्यांच्या मांसामध्ये ऐण जातीच्या हरणाचे मांस
लावः पक्षिणाम् - पक्ष्यांच्या मांसामध्ये लावा जातीच्या पक्ष्याचे मांस
गोधा बिलेशयानाम् - बिळात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये घोरपडीचे मांस
गव्यं सर्पिः - सर्व प्रकारच्या तुपांमध्ये गाईचे तूप
गोक्षीरं क्षीराणाम् - सर्व प्रकारच्या दुधांमध्ये गाईचे दूध.
तिलतैलं स्थावरजातानां स्नेहानाम् - सर्व प्रकारच्या वनस्पतीज स्नेहांमध्ये तिळाचे तेल
शृंगवेरं कन्दानाम् - सर्व कंदांमध्ये सुंठ
मद्वीका फलानाम् - सर्व प्रकारच्या फळांमध्ये द्राक्षे
शर्करा इक्षुविकाराणाम् - उसापासून बनविलेल्या पदार्थांमध्ये साखर
हे सर्व पदार्थ प्रकृती कोणतीही असो, हवामान काहीही असो, देश कोणताही असो, सर्वांसाठी अनुकूल असतात.
अहितकर आहार
हितकर आहारद्रव्यांप्रमाणेच अहितकर आहाराची यादीसुद्धा चरकसंहितेत दिलेली आहे.
यवकाः शूकधान्यानाम् - धान्यांमध्ये यवक (एक प्रकारचे क्षुद्रधान्य)
माषाः शमीधान्यानाम् - कडधान्यांमध्ये उडीद
वर्षानादेयमुदकानाम् - पाण्यांमध्ये पावसाळ्यातील नदीचे पाणी
औषरं लवणानाम् - मिठात उषर प्रकारचे मीठ
सर्षपशाकं शाकानाम् - भाज्यामध्ये मोहरीच्या पानांची भाजी
गोमांसं मृगमांसानाम् - प्राण्यांच्या मांसामध्ये गाईचे मांस
काणकपोतः पक्षिणाम् - पक्ष्यांच्या मांसामध्ये जंगली कबुतराचे मांस
भेको बिलेशयानाम् - बिळात राहणाऱ्या प्राण्यांच्या मांसामध्ये बेडकाचे मांस
आविकं सर्पिः - तुपांमध्ये मेंढीचे तूप
अविक्षीरं क्षीराणाम् -दुधांमध्ये मेंढीचे दूध
कुसुम्भस्नेहः स्थावरस्नेहानाम् - वनस्पतीज स्नेहांमध्ये करडईचे तेल
निकुचं फलानाम् - फळांमध्ये वडाचे फळ
इक्षुविकाराणाम् फाणितम् - उसाच्या पदार्थांमध्ये राब (काकवी).
हे सर्व पदार्थ कोणत्याही प्रकृतीसाठी अहितकर समजले जातात, म्हणून आरोग्याची इच्छा करणाऱ्याने या पदार्थांपासून दूर राहणे चांगले.