शिवस्मारकाच्या खर्चाचा ताळमेळ बसेना

सकाळ न्यूज नेटवर्क
05.51 AM

मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी लागण्यात आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. स्मारकासाठी काढण्यात आलेल्या निविदेत एल अँड टी या नामवंत कंपनीला काम दिले असून, कंपनीने दावा केलेला खर्च आणि राज्य सरकारने गृहीत धरलेल्या रकमेत तब्बल 1 हजार कोटींचा फरक आहे. त्यामुळे ही रक्‍कम कमी करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न असून, यासाठी मंत्रालयात बैठकीचा सिलसिला सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने 2800 कोटींचा खर्च गृहीत धरला आहे. मात्र, निविदेत पात्र ठरलेल्या एल अँड टी कंपनीने 3800 कोटींची निविदा भरली होती. यात कंपनीने प्रकल्पाची किंमत कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, समितीची बैठक 5 फेब्रुवारी रोजी पार पडली. या बैठकीत कंपनीच्या प्रतिनिधींना राज्य सरकारची भूमिका मांडण्यात आली असून, एल अँड टीने अद्याप प्रतिसाद दिला नाही. कदाचित हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवरच सुटू शकेल, असे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशभरातल्या 19 ठिकाणांवरील माती आणि विविध नद्यांचे पाणी आणले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे स्मारक गिरगाव चौपाटीपासून 3.6 किलोमीटरवर समुद्रात असलेल्या एका पाण्याखालच्या दगडावरील 15.86 हेक्‍टरवर उभारले जाणार आहे. जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या हातून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा साकारला जाणार आहे. या चौथऱ्यासहित या स्मारकाची उंची 210 मीटर उंच असून, पुतळा 126 मीटर, तर फक्त चौथरा 84 मीटरचा असणार आहे.

स्मारकाचे काम 19 फेब्रुवारी 2019 ला पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. महाराजांचे वास्तव्य असलेल्या शिवनेरी, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, राजगड, प्रतापगड या गडकिल्ल्यांसह शिखर शिंगणापूर, तुळजापूर, सिंदखेड राजा, कराड, जेजुरी, देहू आळंदी, रामटेक, वेरूळ, आग्रा, तंजावर आणि श्री शैलम या ठिकाणांवरून माती आणली जाणार आहे.

स्मारकाची वैशिष्ट्ये
जलदुर्गाशी साध्यर्म असणारी दगडातील समुद्र तटबंदी.
आई तुळजाभवानी मंदिर.
ग्रंथ व कला संग्रहालय, मत्स्यालय, ऍम्पिथिएटर / हेलिपॅड, ऑडिटोरीअम, लाइट व साउंड शो, विस्तीर्ण बाग बगीचे, रुग्णालय, सुरक्षारक्षक निवासस्थाने, आयमॅक्‍स सिनेमागृह, प्रकल्प स्थळ ठिकाणी 2 जेट्टी, चौथऱ्यामध्ये वेगवेगळ्या मजल्यावरून दृश्‍यावलोकनासाठी सोय, पर्यटकांना प्रकल्प स्थळाकडे जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया, नवी मुंबई व इतर ठिकाणांहून जाण्याची व्यवस्था, स्मारक ठिकाणी शिवकालीन वातावरणनिर्मिती.

Web Title: mumbai news shivsmarak expenditure