अशुद्ध पाणीपुरवठा करणारे ‘मरण’ प्राधिकरण!
सातारा परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, या उद्देशाला काल (ता. १४) घडलेल्या प्रकाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गैरकारभाराने हरताळ फासला. जनतेला पुरेशा दाबाने व नियामित शुद्ध पाणी पुरविण्यात गेल्या काही वर्षांत प्राधिकरण पूर्णत: अपयशी ठरले आहे, हे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मान्यच करावे लागेल!
सातारा परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, या उद्देशाला काल (ता. १४) घडलेल्या प्रकाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गैरकारभाराने हरताळ फासला. जनतेला पुरेशा दाबाने व नियामित शुद्ध पाणी पुरविण्यात गेल्या काही वर्षांत प्राधिकरण पूर्णत: अपयशी ठरले आहे, हे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मान्यच करावे लागेल!
लष्कर पाणीपुरवठा केंद्रातील जलवाहिनीत आढळलेला मृत प्राणी किती दिवसांपासून साठवण टाकीत पडून होता, तो प्राणी अपघाताने टाकीत पडला की आणखी काही कारण आहे, असे अनेक प्रश्न प्राधिकरणाच्या आवारातच विचारले जात आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या इतिहासातील कालचा दिवस काळा धब्बा ठरला. पोवई नाक्यावर मुख्यालयाच्या ठिकाणी, लष्कर पाणीपुरवठा केंद्रात हा प्रकार घडला. एवढ्या महत्त्वाच्या व गर्दीच्या
ठिकाणी पिण्याच्या पाण्याबाबत सुरक्षितता रामभरोसे असल्याचे या प्रकारातून अधोरेखित झाले.
टाक्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
शहर व परिसरात प्राधिकरणाच्या १२ साठवण टाक्या आहेत. या सर्वच टाक्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित झाला आहे. शहराचा पूर्व भाग, तसेच गोडोली, विलासपूर, संभाजीनगर, खिंडवाडी, खेड, संगमनगर, शाहूपुरी या सुमारे दीड लाख लोकसंख्येला प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा होतो. संगम माहुली येथून पाणी उपसून विसावा शुद्धीकरण केंद्रामार्फत विविध उपनगरांना पाणी पुरविले जाते.
गळत्यांमुळे दूषित पाणीपुरवठा
सुमारे ४० वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या या योजनेच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी ‘पीव्हीसी’ पाइप्सचा वापर करण्यात आला आहे. अवजड वाहनांमुळे, ऊन-पावसामुळे अथवा दगड मारल्याने या पाइप्स फुटून त्यामध्ये दूषित पाण्याचा शिरकाव होतो. शाहूपुरीत किमान दोन डझनांहून अधिक ठिकाणी जलवाहिन्यांना गळत्या दाखवता येतील. धर्मवीर संभाजी कॉलनी, ज्ञानवर्धिनी शाळा, स्वामी समर्थ बेकरी, गेंडामाळ नाक्यावरील गजानन महाराज मंदिर, आझादनगर, समता पार्क, शिवराम मंदिर, स्वामी समर्थ मंदिर रस्ता, सारडा कॉलनी, दत्त दिगंबर कॉलनी, पवार कॉलनी, शिवम कॉलनी ही त्यातली काही उदाहरणं सांगता येतील. या गळत्यांमधून पाणी तर वाया जात आहेच. परंतु, इतर वेळी हवेच्या उलट्या दाबामुळे आजूबाजूचे सांडपाणी त्यामध्ये शिरते. हेच पाणी जलवाहिनीतील पाण्यात मिसळून नागरिकांना त्याचा पुरवठा केला जातो.
तक्रारींकडे कायम दुर्लक्षच!
शाहूपुरीत सध्या काविळीची साथ सुरू आहे. कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राने पाचपैकी चार नमुन्यांचे पाणी ‘पिण्यास अयोग्य पाणी’ असा दाखला देऊनही प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले. लष्कर पाणीपुरवठा केंद्रात आढळलेले मृत जनावर हेही प्राधिकरणाच्या गैरकारभाराचाच बळी आहे. सांडपाण्यातून गेलेल्या जलवाहिन्यांची गळती वेळीच काढली नाही. लोकांच्या दूषित पाण्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अहवालास केराची टोपली दाखवली गेली. या एकापाठोपाठ एक घडणाऱ्या बाबी शासकीय यंत्रणा कोडगेपणाच्या कोणत्या अवस्थेपर्यंत पोचली आहे, हेच दर्शवितात.
कार्यालय सुशोभीकरण महत्त्वाचे
प्राधिकरणाच्या यंत्रणेसाठी ही शोभादायक बाब राहिलेली नाही. प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या सुशोभीकरणावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या वरिष्ठांना लोकांच्या जीवन-मरणाशी निगडित असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाक्यांची सुरक्षितता महत्त्वाची कशी वाटली नाही. त्याला दुर्लक्ष म्हणायचे, बेफिकिरी, निष्काळजीपणा का कोडगेपणा! सर्वसामान्यांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तरही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीच द्यावे!!
‘मजिप्रा’बद्दलच्या तक्रारींचा पाढाच...
‘अपुरा कर्मचारी वर्ग’ या एका कारणामागे प्राधिकरणाचे अधिकारी वर्षानुवर्षे दडत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे अनेक किस्से उपनगरांत चर्चेत आहेत. वेळच्या वेळी गळत्या काढल्या जात नाहीत. ३०-३० वर्षे ग्राहक असलेल्या घरांतील नळांना पाणी नाही आणि नव्याने झालेल्या अपार्टमेंटला लगेच पाणी कनेक्शन दिले जाते. काही ग्राहकांना पाण्याची बिलेच दिली जात नाहीत. पाणी वितरणाचे पैसे मात्र महिन्या-महिन्याला ‘जमा’ केले जातात. असे काही ग्राहक चार-चार वर्षे अद्याप प्राधिकरणाच्या रेकॉर्डवरच नाहीत, या पापाचे धनी कोण? याचे उत्तर प्राधिकरणाच्या यंत्रणेला द्यावे लागेल.