कऱ्हाडकर कल्याणीचा स्वकर्तृत्वाचा ‘स्मॅश’!
व्हॉलिबॉल म्हणजे एक पॅशन म्हणून त्याकडे पाहिले. त्यात करिअर आहे, ते खेळत गेल्यावर कळले. आता सर्वोच्च स्पर्धा खेळण्यासाठीची माझी तयारी सुरू आहे. त्यासाठी अनेकांचे मार्गदर्शन मिळत आहे.
- कल्याणी वरेकर, राष्ट्रीय व्हॉलिबॉलपटू, कऱ्हाड
कऱ्हाड - पाचपेक्षा जास्त राज्यांत खेळताना तिने नेहमीच आपला वेगळा बाज जपला. राज्याच्या संघाने कमावलेल्या सुवर्णपदक, तीन रौप्यपदकांतही तिच्या कामगिरीचा सिंहाचा वाटा होता. कल्याणी संजय वरेकर असे त्या उमद्या व्हॉलिबॉलपटूचे नाव. कऱ्हाडच्या क्रीडा क्षेत्रात नवा चमकता ताराच कल्याणीच्या रूपाने पुढे सरकत आहे.
कल्याणीचे कुटुंब तसे सामान्यच. वडील नोकरी करतात. रोजच्या दैनंदिन जीवनातील त्यांचा क्रम नेहमीचाच आहे. मात्र, कल्याणीने त्या सगळ्यांपलीकडे हटके असा खेळ निवडला. पाचवीपासून ती खेळते.
व्हॉलीबॉल आता तिचा पॅशनच बनला आहे. कोणताही प्रशिक्षक नसतानाही तिने व्हॉलीबॉल खेळ मनापासून जपला, आत्मसातही केला. महाराष्ट्राच्या कर्णधारपदापर्यंत तिने घेतलेली उडी तिच्या कष्टाचीच प्रचिती देते. शाळेत मोठ्या मुली खेळायच्या. त्यावेळी ती पाहायची. मधली सुटी झाली की, तिची पावले व्हॉलीबॉल मैदानाकडे वळायची. एकदा मुलींनी तिला खेळात सहभागी करून घेतले. त्यावेळी तिने हातात घेतलेला व्हॉलीबॉल पुन्हा कधी खाली ठेवलाच नाही. अत्यंत जिद्दीने तिने व्हॉलिबॉलमधील कौशल्ये विकसित केली. विठामाता विद्यालयानेही तिला बळ दिले. क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांनीही तिला प्रोत्साहन दिले. कोल्हापूरचे व्हॉलिबॉलपटू अजित पाटील यांचेही तिला मार्गदर्शन मिळाले.
सातवीत तिने राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या. राज्याच्या संघात तिची निवडही झाली. त्यात राज्यसंघाने रौप्यपदक पटकावले. त्यात कल्याणीची कामगिरी अव्वल होती. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली. बंगळूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही तिने चमकदार कामगिरी केली. त्यातून पुन्हा दुसऱ्या राष्ट्रीय स्पेर्धेसाठी तिची निवड झाली. त्या स्पर्धा तेलंगणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याच्या संघाने सुवर्णपदक पटकावले.
त्यात कल्याणीचा वाटा मोठा होता. राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा तिचा सिलसिला कायम आहे.
आंध्र प्रदेशात झालेल्या स्पर्धेत विशेष कामगिरीबाबत तिला गौरवण्यात आले. ‘खेलो इंडिया’साठी महाराष्ट्राचा संघ पात्र ठरला. त्या संघाच्या कर्णधारपद कल्याणीकडे आले. राज्याचे नेतृत्व करताना अत्यंत दिमाखदार खेळी करणाऱ्या कल्याणीच्या संघाने राज्यासाठी रौप्यपदक आणले. तिचा शाळेनेही गावातून मिरवणूक काढून गौरव केला. या एकूणच कामगिरीतून कल्याणीच्या रूपाने कऱ्हाडला क्रीडा क्षेत्रातील एक नवीन तारा मिळाला आहे.