सिडनी : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर ऍरॉन फिंच 'इंडियन प्रीमिअर लीग'च्या (आयपीएल) आगामी अकराव्या मोसमातील सुरवातीच्या सामन्यास मुकणार आहे. फिंचसह ऑस्ट्रेलियाचाच ग्लेन मॅक्सवेलही पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळणार नाही. 'आयपीएल'ला सात एप्रिलपासून सुरवात होत आहे आणि फिंच याच दिवशी विवाहबंधनात अडकणार आहे.

विशेष म्हणजे, फिंचच्या विवाह सोहळ्यात मॅक्सवेल 'मास्टर ऑफ सेरेमनीज' असणार आहे. त्यामुळे तोदेखील 'आयपीएल'साठी उपलब्ध नसेल. अभिनेत्री प्रीति झिंटाच्या 'किंग्ज इलेव्हन पंजाब' या संघात फिंचचा समावेश आहे. गेल्या महिन्यात झालेल्या खेळाडूंच्या लिलावात फिंचला पंजाबच्या संघाने 6.2 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. ग्लेन मॅक्सवेल 'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या संघात आहे. त्याला तब्बल नऊ कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आले होते. किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीचा सामना दिल्ली डेअरडेव्हिल्सशीच होणार आहे.
ऑस्ट्रेलियाकडून खेळणारे मॅक्सवेल आणि फिंच दोघेही मैदानाबाहेरही चांगले मित्र आहेत. 'आयपीएल'मधील त्यांच्या संघांचे प्रशिक्षकही ऑस्ट्रेलियन आहेत. मॅक्सवेलच्या संघाचे प्रशिक्षक रिकी पॉंटिंग आहेत, तर फिंचच्या संघाचे प्रशिक्षक ब्रॅड हॉज आहेत. पंजाबची पहिली लढत 8 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे या लढतीसाठी फिंच उपलब्ध नसेल. पंजाबची दुसरी लढत 13 एप्रिलला होणार आहे. त्या सामन्यापूर्वी फिंच पंजाबच्या संघात दाखल होण्याची शक्यता आहे.