डिझेल दरवाढीनुसार भाड्यातही वाढ व्हावी, या मागणीसह गुरुवारी (ता. 15) डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ निपाणी अर्थमुव्हर्स असोसिएशनतर्फे दिवसभर काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर येथील विशेष तहसीलदार कार्यालयात जावून उतहसीलदार एन. बी. गेज्जी यांना निवेदन दिले.
निपाणी - गेल्या काही महिन्यांपासून डिझेल दरात सातत्याने वाढ होत आहे. पण जेसीबीधारकांना देण्यात येणाऱ्या भाड्यामध्ये वाढ केली नसल्याने व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. लाखो रुपयांचे कर्ज काढून जेसीबीमध्ये गुंतवणूक केलेल्या व्यावसायिकांना डिझेल दरवाढीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी डिझेल दरवाढीनुसार भाड्यातही वाढ व्हावी, या मागणीसह गुरुवारी (ता. 15) डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ निपाणी अर्थमुव्हर्स असोसिएशनतर्फे दिवसभर काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर येथील विशेष तहसीलदार कार्यालयात जावून उतहसीलदार एन. बी. गेज्जी यांना निवेदन दिले.
सकाळी आठ वाजल्यापासूनच निपाणी शहर, परिसरातील सर्वच जेसीबी मशीनधारकांनी आपली मशीन बंद ठेवून निषेध व्यक्त केला. त्यानंतर येथील विशेष तहसीलदार कार्यालयाकडे जावून असोशिएनचे अध्यक्ष निलेश मातीवड्डर, उपाध्यक्ष मंजुनाथ हेगडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपतहसीलदार एन. बी. गेज्जी यांना निवेदन दिले.
निवेदनातील माहिती अशी, सध्या वारंवार डिझेल दरात वाढ होत आहे. तरीही जेसीबीधारकांना तासी 700 रुपयेच भाडे मिळत आहे. त्याऐवजी 850 रुपये तासाप्रमाणे भाडे मिळायला हवे. सध्या माती उकरण्यासाठी 100 रूपये ट्रॉली तर मुरुमसाठी 150 रूपये ट्रॉलीप्रमाणे मजुरी मिळत आहे. त्यामध्येही वाढ करून मजुरी मिळाली पाहिजे. शासनाने तात्काळ निवेदनाची दखल न घेतल्यास भविष्यात पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल.
यावेळी नेताजी पोवार, दिलीप फराळे, सागर जबडे, सुरेश पवार, वैभव नागराळे, अनिल मातीवड्डर, विकास रानमाळे, रवींद्र भाटले, मंजुनाथ गडकरी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.