मुंबई - शिवसेना आणि भाजपच्या "ब्रेकअप' चर्चांना अर्धविराम मिळत ते "इन-रिलेशन' असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या (ता. 15) भेट होणार आहे. भाजप आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये रंगणारा सामना "नुरा कुस्ती' आहे काय, असा प्रश्न पडलेला असतानाच उद्धव स्वत: "वर्षा'वर जाणार आहेत. रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचा विरोध निदर्शनास आणण्यासाठी ही भेट असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेने आधी समर्थन दिले आणि नंतर विरोध सुरू केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा विरोधाभास लक्षात आणून दिला. त्यानंतर शिवसेनेला मान्य असलेल्या बाबी कायम ठेवाव्यात आणि वादग्रस्त प्रस्ताव मागे टाकावेत, अशी चर्चा शिवसेना-भाजपमध्ये सुरू आहे. देशातील बदलते राजकीय वातावरण लक्षात घेता भाजपने शिवसेनेशी मैत्रीचे धोरण स्वीकारले आहे. नवी दिल्ली येथे अर्थमंत्री अरुण जेटली आणि खासदार अनिल देसाई, औरंगाबादमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात; तर मुंबईत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव यांचे खास पक्षसचिव दर्जा मिळालेले मिलिंद नार्वेकर यांच्यात अनौपचारिक चर्चा सुरू आहे. या चर्चांनी काही पार्श्वभूमी तयार केलेली असताना फडणवीस आणि उद्धव यांची उद्या होणारी भेट म्हणजे "बीलेटेड व्हॅलेंटाइन' असल्याचे मानले जात आहे. आम्हाला न्याय मिळेल या भावनेने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात आहोत, असे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले. "सबका विकास, सबका साथ' मिळत असेल तर ते उत्तमच आहे, असे राजकीय उत्तर भाजपच्या नेत्याने दिले.