ऋतुपर्ण
शहरातील टेकडी. नेहमीची. पायाखालची. तरीही रोज नवी. ऋतुचक्रानुसार बदलणारी. कधी ऋतुमतीसारखी, तर कधी ऋतुपर्ण. आपण फक्त न्याहाळायचे अन् डोलायचे.
स्थळ ः भांबुर्डा - वनविहार टेकडी, वनराई सहर्ष सादर करीत आहे - तीन अंकी नाटक - ऋतुपर्ण. अंक पहिला - तृणपाती, अंक दुसरा - पानगळ, अंक तिसरा - नवी पालवी. लेखक - निर्माता - दिग्दर्शक - निसर्ग. नेपथ्य ः दगडी खाण - साचलेले पाणी, प्रकाशयोजना ः सूर्य - चंद्र - चांदण्या - काजवे. संगीत संयोजन ः पाऊस वारा - समस्त पक्षी गाणे! वेशभूषा ः हिरव्या छटा, रंगभूषा ः मोरपीस, कलाकार ः हिरव्या जिवंत रंगभूमीवर अवतरणारे सर्व...
शहरातील टेकडी. नेहमीची. पायाखालची. तरीही रोज नवी. ऋतुचक्रानुसार बदलणारी. कधी ऋतुमतीसारखी, तर कधी ऋतुपर्ण. आपण फक्त न्याहाळायचे अन् डोलायचे.
स्थळ ः भांबुर्डा - वनविहार टेकडी, वनराई सहर्ष सादर करीत आहे - तीन अंकी नाटक - ऋतुपर्ण. अंक पहिला - तृणपाती, अंक दुसरा - पानगळ, अंक तिसरा - नवी पालवी. लेखक - निर्माता - दिग्दर्शक - निसर्ग. नेपथ्य ः दगडी खाण - साचलेले पाणी, प्रकाशयोजना ः सूर्य - चंद्र - चांदण्या - काजवे. संगीत संयोजन ः पाऊस वारा - समस्त पक्षी गाणे! वेशभूषा ः हिरव्या छटा, रंगभूषा ः मोरपीस, कलाकार ः हिरव्या जिवंत रंगभूमीवर अवतरणारे सर्व...
पावसाची सुरवात होते अन् चिंब भिजलेल्या मातीमधून तृणपाती डोकावू लागतात. हिरव्या पोपटी रंगाची, मऊशार रेशीम स्पर्शाची अशा या पाती अख्खी टेकडी आच्छादून टाकतात! पहाटेच्या वर्षाविहारात ती सुस्नात होऊन एक प्रकारचा तजेला, टवटवी घेऊन त्यांच्या टोकांवरती जणू मोत्यांची माळ घालून नटतात. अधूनमधून कोवळ्या उन्हाच्या किरणांच्या कवडशांमधून डोकावताना त्यांचे रूप खुलते चमकते. वाऱ्याची झुळूक येताच ती डोलत डोलत वाऱ्याचे गाणे गाऊ लागतात. त्यांच्या आवाजात आवाज मिसळण्यासाठी पक्ष्यांचे कुजून, भुंग्यांचे गुंजन, मोरांचे नर्तन, केकारवांचे आवर्तन सुरू होते. यांच्या संगतीने, साथीने सुंदर फुलपाखरे भिरभिरू लागतात. त्यांच्यासाठी नाजूक कोमल तृणपुष्पे उमलतात. त्या लयतालाने संगीताला माधुर्य येते. कालांतराने कडक उन्हाची तिरीप या सर्वांना कासावीस करते! कंबरेपर्यंत उंच झालेली पाती पिवळी पडून सुकतात-कोमेजतात.
तोपर्यंत टेकडीवरील मोठी झाडे, वृक्ष, वेली त्यांचे रूप लांबूनच बघत, न्याहाळत असतात...! एकादा जरठ पिंपळ, वड त्यांच्या जुनाट खोडांसकट वर्षानुवर्षे वावटळींना तोंड देत, जाळीमय पर्णसंभार लेवून, अनेक ऋतुसंहार होताना, आपली जीर्णशीर्ण काया सांभाळत, जीवनावर माया करत, त्यांच्या खोलवरच्या पाळ्यामुळ्यांसकट घट्ट तग धरून उभे असतात! त्यांच्या हिरव्या तरुणाईच्या भूतकाळाचे हृदय संस्मरण करताना एकीकडे डवरलेल्या फांद्यांचे, हिरव्याकंट देठांचे, सावली रूपातील पर्णभाराचे दिवस आठवतात. लय - उत्पत्ती - स्थिती यांची त्यांच्याकडे खिजगणती नसते. बाह्यरूप बदलले तरी, शुष्क पानांची गळती झाली तरी, ऋतुचक्रामध्ये अडकलेल्या व्यथांमध्ये ते स्वतःची पडछाया शोधत राहतात! स्वतःचे ते ओंगळ स्वरूप त्यांना व्यथित करते. तोपर्यंत टेकडीवरच्या वाटा, पाऊलवाटा, रस्ते अधिकच उघडे पडताना दिसतात. आपण चालत राहतो वाटांवरून सवयीने. वाटेशेजारची हिरवी लव पिवळी पडलेली असते एव्हाना. तरीही अजून सरड्यांची सरसर ऐकू येते. पाठोपाठ एखादी घार झेपावत येताना दिसते. आतापर्यंत कितीतरी उंचावर असलेली घार तीक्ष्ण बाणासारखी येते, पलीकडच्या झाडीत घुसते. दोन्ही पायांत सरड्याला पकडते आणि पुन्हा त्याच वेगाने आकाश गाठते.
आता पानांची सळसळ नसते, निष्पर्णतेने झाडांना मरगळ येऊ लागते. शांत थंड वेळेला टेकडीवरचे रान सुनसान होते. वारा बंड करून उठतो. आकाशाच्या साक्षीने एखादाच पक्षी उडताना दिसतो. आवाज नाही. पंखांची फडफडही ऐकू येत नाही. पालापाचोळ्याचा खच रस्त्यांच्या दोन्ही कडा जणू नक्षीदार करतो! ओंजळी भरभरून पानांचा सडा टाकून ही झाडे जणू नक्षीदार करतो! ओंजळी भरभरून पानांचा सडा टाकून ही झाडे जमिनीवर कधी कधी गालिचा पसरतात! त्यांचे अंथरुण किड्यामुंग्यांना अगदी सुखावते. कोरड्या रूक्ष डहाळ्या-फांद्या म्हणतात. हे काय भकास रितेपण जीवनातले! ही पानगळ आम्हाला विद्रूप करते अशा विराण्या गाऊ लागतात. अर्थात हेही दिवस पालटतील. ऋतुपालट होतच असतो. निराशा कायम टिकत नसते, आशेचे क्षण येतातच फिरून.
तरी नव्या नवतीच्या रूपरंगासाठी, आम्ही एका कायापालटासाठी कायमच प्रतीक्षेत असतो. योग्य वेळ येताच मग पुन्हा हिरवी रंगून जाताना पाने, दंग होतात. चराचरावर आनंदाची उधळण होताना दिसू लागते. नव्या पालवीने आकर्षक नखरे करताना जणू त्यांच्यामध्ये एक स्पर्धा-चढाओढ सुरू होते. नानाविध आकारांनी, हिरव्या छटांनी नटून-थटून ती पाने झाडांचे अंगप्रत्यंग खुलवू लागतात. पुन्हा पुन्हा आपले मोहक रूप पाण्यात वाकून बघत हसू लागतात. सृष्टीचे इतर घटक त्यांना वाकुल्या दावून चिडवू लागतात! पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र होतात.
पान पान गाई आता गीत ऋतूंचे,
बहर संपला तरी गाणे नव्या नवलाईचे...
प्रकाश पिवळा केशरी उमटे पानोपानी,
सूर मनीचा विरतो उजाड रानीवनी....
उमंग - उल्हास - उन्मेष नवा घेऊन,
आकांक्षेने ऊर भरतो पुन्हा फिरफिरूनी...
चैत्र पालवी तरारते हिरव्या रंगांनी,
रूप मोहरते वसुधेचे अंगांगानी...
या नाटकाचे प्रयोग पुढील संबंध वर्षासाठी हाउसफुल झाले आहेत, याची नोंद घ्यावी.
आपली विश्वासू टेकडी