पुरंदर विमानतळाबद्दल थेट लोकांशी बोलणार
पुरंदर विमानतळाबद्दल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी श्रीकृष्ण नेवसे यांनी केलेली बातचीत.
पुरंदर विमानतळाबद्दल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी श्रीकृष्ण नेवसे यांनी केलेली बातचीत.
प्रश्न - पुरंदरमधील नियोजित विमानतळास आपण सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक लोकांचा विरोध आहे. त्या संदर्भात आपली भूमिका काय राहील?
शरद पवार - या विमानतळामुळे पुरंदरकरांचे भाग्य उजळणार आहे, असे मी म्हटले होते. मात्र, काही लोकांच्या मनात शंका असतील, तर त्यांच्याशी चर्चा करता येईल. काही लोकांची नाळ गावाशी जोडलेली असते, काहींना प्रकल्प- जमिनीचा मिळणारा मोबदला याविषयी पुरेशी माहिती समजलेली नसते, तर काही जणांची मानसिकताच नसते. त्यांना सरकारच्या मोबदल्याबद्दल विश्वास वाटत नाही. त्यामुळे माझ्या हाती विमानतळाचा निश्चित आराखडा, नकाशे आल्यावर मी त्या गावांमध्ये जाऊन लोकांशी थेट बोलणार आहे. लोकांशी म्हणजे लोकांशीच. मधल्या लोकांशी नाही.
विमानतळ पुरंदरला होऊ शकते काय?
- मध्यंतरी पुरंदरची अंजीर परिषद उरकून वाघापूरमार्गे जाताना मला शेतीपेक्षा मोकळ्या जागा जास्त दिसल्या. अनेक ठिकाणी तारांचे कुंपण केलेले होते. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. तरीही शेतकऱ्यांचे म्हणणे लक्षात घेतले पाहिजे. त्यांचे महसुली रेकॉर्ड अद्ययावत झाले पाहिजे. त्यांच्या पदरात नक्की काय पडणार आहे, ते ‘पॅकेज’ पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन, महत्त्वाची स्थळे वाचवून विमानतळासाठी पडीक जमीन उपयोगात आणता येईल का, हेही पाहिले पाहिजे. आम्ही सत्तेत असताना भूसंपादनासाठी चारपट दर देण्याचा निर्णय घेतला. तो येथे लागू झाला पाहिजे. तरच त्यावर विचार करता येईल. मात्र, त्यासाठी सुसंवाद हवा. मी जिल्हाधिकाऱ्यांकडून तशी माहिती मागविली आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून गेल्या चार वर्षांत तुम्हाला कसे वाटले?
- मी प्रथम १९६७ मध्ये विधानसभेवर निवडून आलो, तेव्हापासून अनेक पंतप्रधान पाहिले. ते निवडणूकप्रक्रिया संपली की देशाचे पंतप्रधान म्हणून वागायचे. मोदी हे मात्र भाजपचे पंतप्रधान म्हणूनच वागतात. निवडणूक त्यांच्या डोक्यातून बाजूला जात नाही. परवा कर्नाटकात गेले आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांवर टीका करून आले. देशाच्या पंतप्रधानाने इतके लहान झालेले मी पाहिलेले नाही. ‘मी म्हणेल तसेच होईल’ या त्यांच्या नादात खाली टीम शिल्लक नाही. नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांचा थोडा अपवाद सोडला, तर केंद्रात मंत्री कोण आहेत, ते करतात काय, हे सामान्य माणसाला कळत नाही. ‘त्यांचे कृषिमंत्री कोण आहेत व त्यांनी काय केले’ असे मला अनेक लोक विचारतात. तुम्ही बारकाईने पाहा. महाराष्ट्रातील कर्जमाफीचे काय झाले? शेतीमालास योग्य भाव देण्याची हमी देऊनही हमीभाव मिळत नाही. केंद्र असो वा राज्य, या दोन्ही सरकारची धोरणे फसवी आहेत. यांचे काम कमी आणि जाहिराती जास्त! त्याचे आता अजीर्ण झाले आहे. त्यांचा सगळा कारभारच भरकटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सगळेच अस्वस्थ आहेत.