'व्हॅलेंटाईन डे'ला मराठा-बौद्ध समाजात जुळले बंधूभावाचे नाते
खामगाव (बुलडाणा) : 'व्हॅलेन्टाईन्स डे' बुधवारी जभगर आपल्या प्रेमीजनांना शुभेच्छा देऊन साजरा झाला. बुलढाणा जिल्ह्यातील पंचाळा गावातही हा दिवस प्रेमाचा आणि बंधुभावाचा संदेश देऊन गेला. गेल्या महिना भरापासून गैरसमजातून व काही असामाजिक तत्वांमुळे बौध्द आणि मराठा समाजात निर्माण झालेली दुरी संपून दोन्ही समाजाचे मनोमिलन झाले.
खामगाव (बुलडाणा) : 'व्हॅलेन्टाईन्स डे' बुधवारी जभगर आपल्या प्रेमीजनांना शुभेच्छा देऊन साजरा झाला. बुलढाणा जिल्ह्यातील पंचाळा गावातही हा दिवस प्रेमाचा आणि बंधुभावाचा संदेश देऊन गेला. गेल्या महिना भरापासून गैरसमजातून व काही असामाजिक तत्वांमुळे बौध्द आणि मराठा समाजात निर्माण झालेली दुरी संपून दोन्ही समाजाचे मनोमिलन झाले.
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पंचाळा हे छोटेसे गाव आहे. या गावात बौद्ध आणि इतर समाजाची घरे असून सर्व गुण्यागोविंदाने राहत होती. मात्र भीमा कोरेगाव प्रकरण झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक जातीयवादी वातावरण तयार झाले. दरम्यान 26 जानेवारी रोजी पंचाळा येथील मराठी प्राथमिक शाळेत भीमगीतावरून मराठा , कुणबी आणि बौद्ध बांधव यांच्यात मतभेद झाले. यापूर्वी दोन्ही समाजात गेली कित्येक वर्ष कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता. या घटनेनंतर दोन्ही समाजात गेल्या काही दिवसापासून अबोला होता.
बौध्द बांधवाकडून आपल्यावर गावातील समाजाने बहिष्कार टाकला असा आरोप झाला त्यावरून काही जणांवर अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल झाले. दलितांवर बहिष्कार अशा पोस्ट व्हायरल झाल्या. त्यानंतर मराठा कुणबी समाजाने निवेदन देत गावात कोणताही बहिष्कार नाही आमची बदनामी थांबवा अशी मागणी केली. गेल्या काही दिवसापासून पंचाळा गाव चर्चेत होते. पोलीस आणि प्रशासनाने गावातील वाद सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला. यात काही सामजिक व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि बुधवारी व्हॅलेन्टाईन्सच्या प्रेमळ पर्वावर दोन्ही समाजाचे मनोमिलन घडून आले.
संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रवक्ता अभयसिंह मारोडे, रिपाई आठवले गटाचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष बाबूलाल इंगळे यांनी दोन्ही समाजात समेट घडवून आणली. उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीष बोबडे, तहसीलदार चव्हाण यांच्या उपस्थितीत पंचाळा गावातील बौद्ध व मराठा बांधव यांच्यातील सामंजस्याने हा वाद आपापसात मिटविण्यात आला. 'व्हॅलेन्टाईन्स डे' म्हणजेच प्रेमाचा दिवस होता आणि हा दिवस आमच्या कायम स्मरणात राहील. पंचाळा गावातील वाद प्रशासन सर्व समाजातील नागरिक यांच्या पुढाकाराने मिटला. हा राज्यात आदर्श पायंडा असून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा हा विजय आहे, असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ते अभयसिंह मारोडे यांनी सांगितले.