भवानीनगर (जि. पुणे) - ज्या सुगम- दुर्गम भागातील बदल्यांवरून राज्यातील शिक्षकांमध्ये चर्चा आहेत, संघटनाही अस्वस्थ आहेत, त्यांना दिलासा देणारा निर्णय गुरुवारी ग्रामविकास खात्याने घेतला आहे. यातून शिक्षिकांची सुटका केली आहे. दुर्गम व प्रतिकूल भागात शिक्षिकांची बदली करता येणार नाही. आता नियुक्ती असेल तर मे 2018 मध्ये त्यांना बदली करून घेता येणार आहे.
ग्रामविकास विभागाचे सचिव प्रियदर्शन कांबळे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदांना आदेश दिला. सरकारच्या धोरणानुसार शिक्षकाच्या बदल्या केल्या जात असल्या, तरी दुर्गम व अतिदुर्गम भागात जिथे मुक्कामाच्याही सोयी नाहीत, तिथे शिक्षिकांना काम करावे लागते. लांबवर पायी चालून अथवा जंगलातून निर्जन ठिकाणावरून चालणे शिक्षिकांसाठी अत्यंत अवघड आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत बदल्या करताना जाण्या- येण्यासाठी गैरसोयीच्या असलेल्या शाळांमध्ये महिला शिक्षकांना नियुक्ती न देण्याचे धोरण सरकारने आखले आहे.
त्यानुसार ज्या शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित केल्या आहेत व त्या दुर्गम आहेत आणि तेथे महिलांना काम करण्यास प्रतिकूल स्थिती आहे, अशी ठिकाणे महिलांसाठी प्रतिकूल म्हणून घोषित केली जाणार आहेत. त्याचे अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा ठिकाणी शिक्षिकांना नियुक्ती दिली जाणार नाही, अशा ठिकाणी सध्या तिथे शिक्षिका कार्यरत असतील, तर त्यांना मे 2018 च्या बदली प्रक्रियेत बदलीचा अधिकार असेल, असेही सरकारने जाहीर केले आहे. या आदेशाची प्रत मिळताच शिक्षकांनीही सोशल मीडियावरून समाधान व्यक्त केले.