समुद्रस्नानाने कुणकेश्‍वर यात्रेची सांगता 

संतोष कुळकर्णी
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

देवगड - असंख्य शिवभक्‍तांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथील यात्रेची आज पवित्र समजल्या जाणाऱ्या समुद्रस्नानाने सांगता झाली. जिल्हाभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या देवस्वाऱ्यांसह त्यांच्यासोबत असलेल्या मंडळीनी तसेच भाविकांनी समुद्रस्नान केले.

देवगड - असंख्य शिवभक्‍तांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथील यात्रेची आज पवित्र समजल्या जाणाऱ्या समुद्रस्नानाने सांगता झाली. जिल्हाभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या देवस्वाऱ्यांसह त्यांच्यासोबत असलेल्या मंडळीनी तसेच भाविकांनी समुद्रस्नान केले.

यावेळी समुद्रकिनारा गर्दीने फुलून गेला होता. समुद्रस्नानानंतर भाविकांची दर्शनासाठी रांग होती. दरम्यान, तीन दिवस चाललेल्या यात्रेत मोठी उलाढाल झाली. 

येथील महाशिवरात्रीला मंगळवारी (ता.13) यात्रेचा प्रारंभ झाला. त्यादिवशी रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठीची गर्दी कालच्या दुसऱ्या दिवशीही कायम होती. काल मध्यरात्रीपासून अमावस्या सुरू झाल्यामुळे यात्रेत समुद्रस्नानासाठी गर्दी वाढू लागली. आज रात्रीपर्यंत अमावस्या असल्याने पहाटेपासूनच समुद्रस्नानासाठी किनाऱ्यावर गर्दी उसळली. विविध ठिकाणच्या चार देवस्वाऱ्या कुणकेश्‍वर भेटीसाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत मोठा लवाजमा असल्यामुळे यात्रेत मोठी गर्दी झाली होती.

पहाटेपासूनच देवस्वाऱ्या समुद्रस्नानासाठी किनाऱ्यावर आल्या. देवस्वाऱ्यांसोबत आलेल्या मंडळींनीही समुद्रस्नान केले. लहान मुलांबरोबरच महिला व जेष्ठांनीही समुद्रस्नानाचा आनंद लुटला. समुद्रस्नान करताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात होती. समुद्राच्या पाण्यात खोलवर न जाण्याचा संदेश देण्यात येत होता. लहानमुलांना सांभाळण्याची सुचनाही केली जात होती. समुद्रस्नान करून देवस्वाऱ्या माघारी परतल्या. यात्रा कालावधीत विविध राजकीय नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांनी कुणकेश्‍वरचे दर्शन घेतले. 

विविध ठिकाणच्या भजनी मंडळींची मंदिरात भजने झाली. विविध गायकांचे मंदिरात गायनही झाले. आज समुद्रस्नान करून दर्शन घेण्यावर अनेकांचा भर होता. दुपारपर्यंत रस्त्यावर वर्दळ दिसत होती. एसटी गाड्यांची ये-जा सुरू होती. यात्रेत खाजा, विविध खाद्यपदार्थ, शेतीजन्य विविध अवजारे, कलिंगड, कपडे, भांडी, शोभिवंत वस्तू, प्लास्टीक साहित्य यांची मोठी उलाढाल झाली.

हॉटेल व्यावसायिकांनाही प्रतिसाद मिळाला. यात्रेत मनोरंजनाचे खेळ होते. महसूल व पंचायत समितीचा कक्ष कार्यरत होता. यात्रा मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ दिसत होती. खासगी, दुचाकी वाहनांची संख्याही मोठी होती. रात्री मंदिर परिसर, समुद्रकिनारा तसेच यात्रेचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. समुद्रकिनारच्या भेळ, आईस्क्रिम तसेच विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी दिसत होती. 

यंत्रणा रिलॅक्‍स्‌ ! 
समुद्रस्नानासाठी आलेल्या देवस्वाऱ्यांमुळे किनाऱ्यावरील वातावरण भक्‍तीमय बनले होते. समुद्रस्नानाने यात्रेची सांगता झाल्याने देवस्थान समिती, पोलीस, प्रशासन, सुरक्षा यंत्रणा काहीसे 'रिलॅक्‍स' झाल्यासारखे वावरत होते. यात्रेचा ताण कमी झाल्याचे जाणवत होते. 

Web Title: Sindhudurg News Kunkeshwar temple festival