इस्लामपुरात जवळ कोणती निवडणूक नाही, आता सर्व राज्याबरोबरच विधानसभेचा सामना येथे रंगेल तो २०१९ सालीच; पण तत्पूर्वी तीन महिन्यांतच सांगली महापालिकेचे मैदान असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पुन:पुन्हा इस्लामपूरवरच्या मैदानातच खडाखडी करत आहेत. अर्थात निशाना आहे तो माजी मंत्री जयंत पाटलांसह खासदार राजू शेट्टींवरच!
इस्लामपुरात जवळ कोणती निवडणूक नाही, आता सर्व राज्याबरोबरच विधानसभेचा सामना येथे रंगेल तो २०१९ सालीच; पण तत्पूर्वी तीन महिन्यांतच सांगली महापालिकेचे मैदान असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पुन:पुन्हा इस्लामपूरवरच्या मैदानातच खडाखडी करत आहेत. अर्थात निशाना आहे तो माजी मंत्री जयंत पाटलांसह खासदार राजू शेट्टींवरच!
फडणवीसांनी दिलेल्या निधीचा ताळेबंद मांडला आहे. एवढेच नाही तर पूर्वीचे सरकार साखर एजंटांचे आणि टॅंकर माफियांचे होते, असा घायाळ करणारा वारही त्यांनी केला आहे. जयंतरावांनी नऊ वर्षे राज्याची तिजोरी आणि ३१ वर्षे नगरपालिका ताब्यात असताना दीडशे कोटी विकासासाठी आणले आणि फडणवीसांनी ११ महिन्यांत १०७ कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या भाषेत सांगायचे तर ‘मी येथे कोरडी चक्कर मारत नाही.’ यावर लोक म्हणाले असतील, अहो ही चक्कर कसली? आकडे ऐकून माजी कारभाऱ्यांनाच ‘चक्कर’ मारायला लागली आहे!
निधीचे आकडे आणि विकासाची स्वप्ने पेरत फडणवीसांनी इस्लामपुरातला सदाभाऊंचा बिग बजेट फड मारला आहे. गेल्या वेळी हुतात्मा कारखान्यासाठी ‘कार्यक्रम’ घेऊन वैभव नायकवडींना बळ देत जयंतरावांच्या सर्व विरोधकांची मोट बांधून गेले होते. तेव्हा जयंतरावांनी ‘माझ्या नादाला लागू नका’, असा दमही फडणवीसांना दिला होता. मात्र असे असूनही दीड महिन्यांतच आपल्या लाडक्या सदाभाऊंसाठी इस्लामपूरला ‘चक्कर’ मारून कृषी प्रदर्शनाच्या फडातून जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात पुन्हा फडणवीसांनी हलगी तापवली आहे.
अर्थात त्यांच्या सदाभाऊ प्रेमामुळे भाजपमधील अन्य सुभेदार मात्र काळजीत असल्याची चर्चा आहे. खरे तर कृषी प्रदर्शन इस्लामपूरऐवजी सांगलीत झाले असते तर मोठा शेतकरी मेळावा घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्तेच रिचार्ज करता आले असते, असा सूर काही नेत्यांचा होता; पण सदाभाऊंनी अनेक योजना इस्लामपूरला नेल्या, तसा शेतकरी मेळावाही आपल्या मतदारसंघात पळवून पक्षांतर्गत विरोधकांवर मात करतानाच जयंतरावांनाही पुन्हा अस्वस्थ करण्याची आणि त्यांचे जुने मित्र खासदार राजू शेट्टींना डिवचण्याची संधी कॅश केली आहे.
सांगली आणि इस्लामपूरचे पाणी...
एका बाजूला भाजप नेते तिजोरी रिकामी आहे, असे म्हणत असताना आणि फडणवीस विदर्भवादी असल्याने पश्चिम महाराष्ट्राला देताना कंजुषी करतात, अशी टीका होत असताना सांगली जिल्ह्याला निधी देताना थोडा हात ढिला सोडला आहे. कारण इस्लामपूरला भुयारी गटारसाठी ६० कोटी आधीच मंजूर केलेत आणि आता २४ तास पाण्यासाठी पुन्हा ४० कोटी देऊन निशिकांत दादांनाही खूश केले आहे. म्हणजे निधीचा आकडा आता १४७ कोटींवर जाणार! खरे तर या निमित्ताने इस्लामपूरबाहेरील लोकांना प्रथमच कळले की, इस्लामपुरात सकाळी आणि सायंकाळी मिळून वट्टात एक तासच पाणी मिळते.
जयंतरावांनी तर २००८ मध्ये सांगली महापालिका प्रचारातही सांगलीकरांना २४ तास पाणी आणि ते देखील बिसलरीसारखे दर्जेदार दिले जाईल, अशी जाहिरात केली होती. (पण त्यावेळी इस्लामपुरात किती तास पाणी होते?) त्याची आठवण फडणवीसांच्या इस्लामपुरातील घोषणेमुळे सांगलीकरांना झाली आहे. अर्थात सहा महिन्यांत डासांपासून मुक्ती असो की मिनरलसारखे पाणी असो, हे सांगली, मिरज व कुपवाडच्या नागरिकांसाठी अधुरे स्वप्नच राहिले आहे. बिचारे अजून शेरीनालामिश्रित गटारीचे पाणी पिताहेत.
गेल्या सहा महिन्यांत विविध रोगांनी सांगलीकर एवढे आजारी पडले की, एका डॉक्टरने खासगीत सांगितले, गेल्या काही वर्षांत जेवढा डॉक्टरांनी पैसा मिळवला नाही, तेवढा या सहा महिन्यांत मिळवला! आता अशी परिस्थिती सांगलीची आहे; पण जयंतरावांच्या राष्ट्रवादीने यासाठी एक मोर्चादेखील काढलेला नाही. मात्र, आरोग्य शिबिर घेऊन दूषित पाण्याने सतत आजारी पडणाऱ्यांना दिलासा तेवढा दिला. सांगलीकरांनी महापालिका क्षेत्रातून दोन आमदार भाजपला दिले आहेत. फक्त मोदी लाटेच्या आधी निवडणूक झाल्याने महापालिका तेवढीच भाजपकडे नाही. त्यामुळे असेल; पण अजून तरी कोणत्याही मोठ्या घोषणा महापालिकेसाठी फडणवीसांनी केलेल्या नाहीत; पण आगामी दोन महिन्यांत येथेही घोषणांचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पण सदाभाऊंनी राजू शेट्टींशी द्रोह करून भाजपशी गट्टी केल्याचा लाभ इस्लामपूरच्या विकासासाठी फलदायी ठरल्याचे तेथील आकडे पाहिले की स्पष्ट होते. त्यामुळे फडणवीसांच्या कृपेने सदाभाऊ तुपाशी आहेत; मात्र भाजपमधील अन्य नेते उपाशी राहताहेत, याची खदखदही व्यक्त होत असते.
नाही म्हणायला मुख्यमंत्री निधीतून सांगली शहरासाठी ३३ कोटी तर मिरजेसाठी २० असे ५३ कोटींचे रस्ते होत आहेत. सिंचन योजनांसाठी काही कोटींचे निधी जाहीर झाल्याचे सांगलीकर ऐकताहेत. अर्थात ही कामे सरकारकडून होत आहेत ते जनतेपर्यंत पोहोचविण्यात भाजप कितपत यशस्वी होते आहे, ते आगामी निवडणुकीतच कळेल. कारण काका विरुद्ध बाबा असो की दादा विरुद्ध भाऊ असो, हे कमी काय म्हणून पक्षातील नवे-जुने कार्यकर्ते असे वाद रंगले आहेत. सत्तेच्या शेवटच्या काही ओव्हर्स शिल्लक असतानाही गटबाजीला उधाण आल्याचे चित्र दिसू लागले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस याबाबत काही भाष्य करतील असे वाटले होते. मात्र ते सांगलीत आलेसुद्धा नाहीत. नुकतेच त्यांनी सोलापुरातील दोन देशमुखांतील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केली; पण ज्या अर्थी पालकमंत्री सुभाष देशमुख सांगलीसाठी वेळ देत नाहीत, त्या अर्थी सोलापूरचा वाद मिटलेला नाही. उर्वरित वर्षभरात अन्य कोणाला मंत्रिपद आता मिळेल असे वाटत नसल्याने सांगलीचा बॅकलॉग तसाच राहणार याची हुरहुर शिवाजीरावांना, विलासरावांना असणार तशीच सुरेश खाडेंनाही लागून राहणार आहे.
चंद्रकांतदादा असे का बोलतात?
मंत्रिमंडळातील दोन नंबरचे खाते ज्यांच्याकडे आहे, असे भाजपचे दिग्गज नेते महसूलमंत्री चंद्रकांतदादा बोलतात ते प्रत्येक वाक्य भाजपसाठी ‘वादग्रस्ततेचा शिलालेख’ का होते...? परवा कर्नाटकातच पुढचा जन्म मिळावा म्हणून वाद ओढवून घेणाऱ्या दादांनी सांगलीत ‘घरोघरी गिफ्ट वाटा’ असा जाहीर मेसेज देऊन ‘पार्टी विथ डिफ्रंट’ या आपल्या पक्षाच्या घोषवाक्यालाच तिलांजली दिली आहे.
एरव्ही ज्यांनी या सवयी लावल्या, त्या पक्षांनीही या निमित्ताने भाजपची जी टर उडवली आहे, ती न भूतो न भविष्यती अशीच आहे. एकूणच दादा असे का बोलतात, हा एक संशोधनाचाच विषय आहे. त्यांना महापालिका घ्यायची आहे की नुसतीच नुरा कुस्ती करायची आहे? त्यातच त्यांनी महापालिकेची धुराही सुधीर गाडगीळांकडे सोपवली, अशी आणखी एक घोषणा करून खाडे व खासदार संजय पाटील यांनाही अप्रत्यक्ष नाराज केले. अर्थात गाडगीळ महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष आहेत, अशी सारवासारव करत खाडे आणि संजयकाका यांच्याकडे संयुक्तपणे जबाबदारी असेल, असा खुलासासुद्धा पटकन भाजपवाले करू शकले नाहीत.
एकूणच अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे कोल्हापूरपेक्षा कैकपटीने सांगलीकरांनी भाजपला दिले; पण काही नेते सांगलीला बेदखल करतात, असाच अनुभव असतो. आता राजकीय डावपेचासाठी आणि सदाभाऊ हट्टासाठी फडणवीसांचे इस्लामूर प्रेम वाढले आहे. चंद्रकांतदादांना सांगलीत फार रस नसावा आणि सुभाष देशमुखांना सोलापूरचीच काळजी सतावत असावी. अशा वेळी वर्षावर येऊन ठेपलेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि तत्पूर्वी महापालिकेसाठी तीन महिन्यातच ‘करो या मरो’ची लढाई भाजपपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.
फडणवीसांपुढे मुळातच राज्यापुढची मोठी आव्हाने असताना त्यात प्रशासनातील अधिकारी ढिम्म असताना ते सांगली, सोलापूरचे वाद कधी सोडविणार हा प्रश्नच आहे. बाकीचे मंत्री आले किंवा गेले तरी काही चर्चाच होत नाही. त्यामुळे आगामी महापालिकेसाठीही फडणवीसांनाच येथे पॅड बांधून फलंदाजीसाठी उतरावे लागणार आहे. अर्थात येथेही त्यांना जयंतराव व पतंगरावांशी सामना करताना राज्यातील स्टार नेते असलेल्या अजितदादांसह धनंजय मुंडे आदींशी सामना करावा लागणार आहे. त्याची व्यूहरचना मात्र भाजपकडून नेटकी होते आहे, असे सध्याचे तरी चित्र नाही. नेत्यांअभावी काँग्रेस डळमळीत असतानाही भाजपला महापालिका क्षेत्रात कसलाच सूर सापडेना तर फडणवीस तरी काय करणार?