हुतात्म्यांना कोणताही धर्म नसतो, आम्हीदेखील बलिदानास धार्मिक रंग देत नाहीत. दहशतवाद्यांना सीमेवर यश मिळत नसल्याने त्यांनी लष्कराच्या छावण्यांना लक्ष्य करायला सुरवात केली आहे. "हिज्बुल मुजाहिदीन', "जैशे महंमद' आणि "लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटना काश्मीर खोऱ्यामध्ये सक्रिय आहेत
नवी दिल्ली - जम्मूतील सुंजवा लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करू पाहणारे "एमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना आज (बुधवार) लष्कराने चांगलेच फटकारले. हुतात्म्यांच्या बलिदानास धार्मिक रंग देऊ नका, जी मंडळी अशा प्रकारची विधाने करत आहेत, त्यांना लष्कराची कार्यपद्धतीच ठाऊक नाही, असे लष्कराच्या उत्तरविभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अनबू यांनी म्हटले आहे.
लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये पाच जवान हुतात्मा झाले होते, विशेष म्हणजे ते सर्व मुस्लिम आहेत. त्यामुळे मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये जायला सांगणाऱ्यांनी यापासून बोध घ्यावा, असे विधान ओवेसी यांनी केले होते.
अनबू म्हणाले की, ""हुतात्म्यांना कोणताही धर्म नसतो, आम्हीदेखील बलिदानास धार्मिक रंग देत नाहीत. दहशतवाद्यांना सीमेवर यश मिळत नसल्याने त्यांनी लष्कराच्या छावण्यांना लक्ष्य करायला सुरवात केली आहे. "हिज्बुल मुजाहिदीन', "जैशे महंमद' आणि "लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटना काश्मीर खोऱ्यामध्ये सक्रिय आहेत. देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेत शस्त्रे हाती घेणारे हे दहशतवादी असून, त्यांना त्याच पद्धतीने वागणूक दिली जाईल. अनेक तरुण मंडळी दहशतवादी संघटनांमध्ये भरती होत असून, मागील वर्षभरापासून आम्ही या आव्हानास सामोरे जात आहोत. सोशल मीडियामुळेही दहशतवादी कारवायांना ऊत आला असून, यामुळेच तरुण मंडळी दहशतवादाकडे वळत आहेत. आम्हाला या बाबींवर विशेष लक्ष द्यावे लागेल.''
राष्ट्र उभारणीत अन्य धर्मीयांप्रमाणेच मुस्लिमांचेही मोठे योगदान आहे. काही संघटना मुस्लिमांना राष्ट्रविरोधी ठरवू पाहत आहेत.
- संदीप दीक्षित, कॉंग्रेस नेते
काश्मीरमध्ये शोध मोहीम
श्रीनगर : सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या "जैशे महंमद'च्या तीन फरार दहशतवाद्यांना पकडण्यासाठी काश्मीर पोलिसांनी मोहीम सुरू केली असून यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात तपासपथके पाठविण्यात आहेत. मागील वर्षी काश्मीर खोऱ्यामध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या एका पथकाने सुरक्षा दलांवर हल्ले करण्याचा कट आखला होता. या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणांवर छापे घातल्याचे समजते.