e-Paper गुरुवार, फेब्रुवारी 15, 2018

तरुणाईवर पोलिसांची करडी नजर,  व्हॅलेंटाइन डे फीव्हर साध्या वेशात पोलिसांची गस्ती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

नाशिक, : "व्हॅलेंटाइन डे'चा फीव्हर तरुणाईवर चांगलाच भिनला असण्याचे गृहीत धरून अतिउत्साहाच्या भरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. अर्थात, तरुणाईच्या प्रेमात अडथळा म्हणून नव्हे, तर अतिउत्साहींना आवर घालण्यासाठी साध्या वेशात पोलिस गस्तीवर असतील. याशिवाय पोलिसांचे निर्भया पथक, पर्यटन व्हॅन, दामिनी पथकही शहरातील प्रेमीयुगुलांच्या प्रमुख ठिकाणांसह महाविद्यालयांत दक्ष राहणार आहे. 

नाशिकमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. 14) तरुणाईमध्ये "प्रेमाचा फीव्हर' चढलेला असेल. शहरातील महाविद्यालयांसह प्रेमीयुगुलांची सोमेश्‍वर, गंगापूर धरण, सुयोजित व्हेरिडियन गार्डन यांसह मल्टिप्लेक्‍स, पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी काही प्रेमीयुगुल एकांत जागीही जातील. अशा वेळी काही अतिउत्साही वा उपद्रवी तरुणांकडून प्रेमीयुगुलांच्या आनंदाला गालबोट लागून अप्रिय घटना घडण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून नियमित नाकाबंदीसह पोलिस बंदोबस्तही सज्ज असेल.

साध्या वेशातील पुरुष व महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून गस्त घातली जाणार आहे. टवाळखोरांकडून उपद्रवी कृत्यांची शक्‍यता असल्याने महाविद्यालयांच्या परिसरातील गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून फेरफटका मारला जाणार आहे. यासाठी महिला पोलिसांचे निर्भया, दामिनी पथकही गस्तीवर राहील. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पोलिसांच्या पर्यटन व्हॅनमार्फत गस्त घालून करडी नजर ठेवली जाणार आहे. काही ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी केली जाईल. 

व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्‍वभूमीवर कोणतीही छेडछाडीसारखी अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त चोख राहील. तरुणाईनेही अतिउत्साहाच्या भरात वाहतुकीचे नियम मोडू नयेत. प्रेमीयुगुलांना पोलिसांकडून त्रास होणार नाही; परंतु त्यांनीही सभ्यतेचे पालन करीत व्हॅलेंटाइन डे साजरा करावा. 
- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त, नाशिक

Web Title: marathi news valentine day