व्हालेंटाइन पत्रे! (ढिंग टांग)
ती. मा. श्री. वाघसाहेब यांसी, दाशी कमळाबाईचा शतप्रतिशत शि. सा. न. विनंती विशेष. तुम्ही निघून गेल्यापासून अतिशय वायट वाटते आहे. एकलीच बसून दु:ख करीत आहे. त्यात आज आपला दिवस! दर व्हालेंटाइन डेला तुमच्याकडून गुलाबाचे फूल कधी चुकले नाही, आमच्याकडून स्वारीला कमळाचे देठ हुकले नाही!! पण औंदाचा व्हालेंटाइन डे कोरडाच जाणार, म्हणून ऱ्हुदयास वेदना होत आहेत.
तुम्हावरे केहेली मी मरजी बहाऽऽल, नक्का सोडुनी जावु रंगु महाऽऽल...ही लावणी मी जाहीर म्हणायला तयार आहे. पण तुम्ही प्लीज परत या, आमची साथ सोडू नका!!
ती. मा. श्री. वाघसाहेब यांसी, दाशी कमळाबाईचा शतप्रतिशत शि. सा. न. विनंती विशेष. तुम्ही निघून गेल्यापासून अतिशय वायट वाटते आहे. एकलीच बसून दु:ख करीत आहे. त्यात आज आपला दिवस! दर व्हालेंटाइन डेला तुमच्याकडून गुलाबाचे फूल कधी चुकले नाही, आमच्याकडून स्वारीला कमळाचे देठ हुकले नाही!! पण औंदाचा व्हालेंटाइन डे कोरडाच जाणार, म्हणून ऱ्हुदयास वेदना होत आहेत.
तुम्हावरे केहेली मी मरजी बहाऽऽल, नक्का सोडुनी जावु रंगु महाऽऽल...ही लावणी मी जाहीर म्हणायला तयार आहे. पण तुम्ही प्लीज परत या, आमची साथ सोडू नका!!
बंडल निमित्त काढून ह्यावेळी तुम्ही रुसून घर सोडले. हे काही चांगले झाले नाही. फोटोग्राफीच्या मोहिमेवर जातावेळी दह्याची कवडी हातावर ठेवली नाही, हे काय निमित्त झाले का? पण तुम्ही रागावलात!! आहो, पण मी तरी काय करू? त्या दिवशी नेमके मी दहीवडे केले आणि घरातले दही संपून गेले. कवडीपुरतेही शिल्लक राहिले नाही! शेवटी प्रतीक म्हणून मी तुमच्या तळहातावर फुटकी कवडी ठेवली!! पण तुम्ही रागावून निघून गेलात. जाऊ दे. झाले गेले, मिठी नदीला मिळाले...
व्हालेंटाइन डेच्या शुभेच्छा तरी घ्याल ना? घ्या...थॅंक्यू. वाट पाहाते. फक्त तुमचीच. कमळाबाई.
ता. क. : मी व्हालंटाइन डेचा आवळा पाठवत आहे, तुम्ही कोहळा पाठवाल ना? थॅंक्यू! कमळी.
* * *
कमळेऽऽ....तोंड सांभाळून बोल... आणि लिही!! वाघसाहेब असं कोणाला चिडवतेस? होय, आहोतच आम्ही वाघ!! मऱ्हाटी दौलतीचा अपमान करणाऱ्या मस्तवाल स्त्रिये, आमची अवहेलना करणाऱ्याचे काय होते, ते कळेलच आता!! आमच्या तळहातावर फुटकी कवडी देता? अरे, ज्या हातांना फक्त देण्याची सवय आहे, ज्या हातांनी मऱ्हाटी रयतेला कायम भरभरून दिले, त्यांच्या हातावर फुटकी कवडी? फूट!!
कितीही दु:खाचे कढ काढलेस तरी आम्ही आता परतणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ! आता एकच बळ-स्वबळ, स्वबळ, स्वबळ!! व्हालेंटाइन दिनाचे हवाले देत कितीही मखलाशी केलीस तरी आम्ही आता बधणार नाही. तुझ्या व्हालेंटाइन शुभेच्छाही नकोत! जा, जा, कमळे, जा!! आपला संबंध संपला!! यापुढे कधीच तुझा न होणारा. सह्याद्रीचा ढाण्या वाघ.
ता.क. : कोहळा? ठेंगा!
* * *
माझ्या वाघा, स्वारीने असे काही मर्दानगीचे लिहिले की माझा जीव थाऱ्यावर राहत नाही. तुम्ही माझ्यावर भयंकर रागावलात तरी मला किती आणंद होतो म्हणून सांगू? दह्याच्या कवडीचे तुम्ही फार मनाला लावून घेतले आहे असे दिसते. आत्ताच्या आत्ता घरी या, एक किलो चक्काच टांगून ठेवला आहे, तोच तुमच्या हातावर ठेवते!!
आहो, आपली जोडी ही किती आदर्श जोडी आहे, ह्याचा तरी विचार करा! अवघ्या देशात आपल्या जोडीचे उदाहरण देऊन कितीतरी राजकीय युती झाल्या. देशभराचे सोडा, आपल्या महाराष्ट्रात ‘घड्याळ’वाले आणि ‘हात’वाले पुन्हा एकत्र नांदायच्या वाटाघाटी करत आहेत. त्यांचे स्फूर्तीस्थान आपणच आहोत, हे तरी लक्षात घ्या. तुम्हीच डोक्यात राख घालून गेलात तर महाराष्ट्राचे कसे होणार? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो. तेव्हा व्हालेंटाइन डेच्या निमित्ताने पुनर्विचार करावा ही विनंती. कळावे. सदैव तुमचीच. कमळाबाई.
ता. क. : कोहळ्याऐवजी कोहळ्याचा पेठा पाठवलात ना? तुमच्या सरदारांनी क्याबिनेट मीटिंगला आणून दिला. मिळाला! थॅंक्यू.
* * *
कमळे, कमळे...हा काय चावटपणा आहे? आम्ही कशाला तुला पेठा पाठवू? तो पेठा आमचा नाहीएऽऽ...ह्याच्यापेक्षा तुझा चक्का स्वीकारला असता तर बरे झाले असते!! जगदंब जगदंब. जय महाराष्ट्र.