प्रियाच्या गाण्याने भावना दुखावल्या, गाण्याविरूद्ध पोलिसात तक्रार
चित्रपटातील दोन व्हिडीओ रीलीज झाल्यामुळे या गाण्यांना नेटकऱ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. पण हे गाणे वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे पुढे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष असेल.
हैदराबाद : गेले काही दिवस इंटरनेटवर व्हायरल होणारी प्रिया वारियर आता काही कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ज्या गाण्यामुळे ती काही दिवसातच प्रसिद्धिच्या शिखरावर पोहोचली त्याच गाण्यावर नवीन वाद चालू झाले आहेत. या गाण्यातील काही शब्दांवर आक्षेप घेतला गेला आहे. यामुळे हैदराबादमध्ये तक्रार करण्यात आली आहे.
ही तक्रार प्रियाविरूद्ध नसून त्या गाण्याविरूद्ध करण्यात आली आहे. या गाण्यातील 'माणिक्य मलाराया पूवी' हे बोल मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे आहेत अशी तक्रार हैदराबादमधील फारूखनगर येथे राहणाऱ्या एका तरूणाने केली आहे. पोलिसांची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर हे प्रकरण सायबर क्राईम विभागाकडे सोपवण्यात येईल.
'ओरू अदार लव्ह' या आगामी मल्याळम् चित्रपटातील हे गाणे असून, यामुळे प्रिया आणि तिच्या दिलखेचक आदा सगळीकडे लोकप्रिय झाल्या होत्या. 'व्हेलेंटाईन डे'च्या आठवड्यात या चित्रपटातील दोन व्हिडीओ रीलीज झाल्यामुळे या गाण्यांना नेटकऱ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. पण हे गाणे वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे पुढे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष असेल.