पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार पाचशे कोटींचा गैरव्यवहार
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेत 11 हजार पाचशे कोटींचा कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील शाखेत 11 हजार पाचशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. पीएनबीने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, पीएनबीच्या मुंबईतील एका शाखेमध्ये 1.8 अब्ज डॉलर म्हणजेच 11 हजार पाचशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पीएनबीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत रिझर्व्ह बँकेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पीएनबीने दिलेल्या माहितीनुसार, बँकेतील काही ठराविक खात्यांच्या माध्यमातून फसवे आणि अनधिकृत व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही निवडक खातेधारकांच्या फायद्यासाठी हेतूपुरस्सर अनधिकृत व्यवहार झालेत. बँकेकडून चौकशी सुरु करण्यात आली असून लवकरच माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
बँकांमध्ये बुडीत कर्जाचे प्रमाण वाढले असताना आता 11 हजार पाचशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षीच सुनील मेहता यांनी पीएनबीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यासमोर आता नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.
पीएनबीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराचे पडसाद शेअर बाजारात देखील उमटले आहेत. आज इंट्राडे व्यवहारात पीएनबीच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअरने 149 रुपयांची नीचांकी पातळी गाठली आहे. सध्या पीएनबीचा शेअर 6.99 टक्क्यांनी म्हणजेच 11.30 रुपयांची घसरण झाली असून शेअर 150.35 रुपयांवर व्यवहार करतो आहे.