चिमुकल्या अंधांनी व्हॅलेंटाईनचा दिला डोळस संदेश

शेखर जोशी
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मिरज - माय-बापाच्या पायावर त्यांनी फूलं अर्पिली... निर्विकारपणे नमस्कार केला... देवा माझ्या आई-बाबांना खूप आनंद दे, सुख दे... अशी प्रार्थना केली. ते कधीच मायबापाचा चेहरा पाहू शकणार नाहीत आणि हे रंगबेरंगी जगसुध्दा, मात्र त्यांच्या पदस्पर्शात त्यांनी जीवनाची अनुभुती घेतली. डोळस माणसांच्या जगात प्रेम व्याख्या सोयीनुसार बदलत असेलही, मात्र काळाकुट्ट अंधार घेऊन जन्मलेल्या अंध मुलांसाठी त्याचं विश्‍व आई-बाबा आणि शिक्षक एवढंच!

मिरज - माय-बापाच्या पायावर त्यांनी फूलं अर्पिली... निर्विकारपणे नमस्कार केला... देवा माझ्या आई-बाबांना खूप आनंद दे, सुख दे... अशी प्रार्थना केली. ते कधीच मायबापाचा चेहरा पाहू शकणार नाहीत आणि हे रंगबेरंगी जगसुध्दा, मात्र त्यांच्या पदस्पर्शात त्यांनी जीवनाची अनुभुती घेतली. डोळस माणसांच्या जगात प्रेम व्याख्या सोयीनुसार बदलत असेलही, मात्र काळाकुट्ट अंधार घेऊन जन्मलेल्या अंध मुलांसाठी त्याचं विश्‍व आई-बाबा आणि शिक्षक एवढंच!

पण ही मुलं जन्मदात्यांचा "आधार' होतील का, याचं उत्तर नकोच आहे, इथं "आदर' भावना वाढीस लावणारा हा उपक्रम डोळस समाजाच्या डोळ्यातच अंजन घालणारा आहे. "बदलत्या समाजाची गरज' या गोंडस नावाखाली झपाट्याने वृद्धाश्रमाची संख्या वाढत असताना मातापित्याबद्दलची अंधांची ही डोळस प्रेम भावना संत व्हॅलेंटाईनच्या प्रेमाची व्याख्या विस्तारायला लावणारी ठरावी..!  मिरजेतील लायन्सच्या नॅब संचलित घोडावत निवासी अंधशाळेतील साठहून अधिक चिमुकल्यांनी आज हा अनोखा व्हॅलेंटाईन साजरा केला. पाल्यांसाठी त्यांचे माय-बाप गावाकडून आले होते. आरतीचं ताट सजलं होतं. फुलांचा सुंगध दरवळत होता. दिसत नसलं म्हणून काय झालं, नाक आणि कान या दोन गोष्टीं त्यांच्याकडे होत्याच. सुंगध हुंगत अंध मुलांनीच सुरू केलेल्या ऑर्केस्ट्राने संगीताचे सूर अंधाराचे जाळे दूर सारत मोकळं आकाश निर्माण करून गेल्या.

अर्जून वाघमारेची बोटं अंध असूनही ट्रमपेटवर अशी काही फिरली...अन्‌ सूरांची बहार छेडत सलमान शेखने ""मैं कभी बतलाता नही पर अंधेरेसे डरता हूँ मॉं...या गीताचे सूर हेलावून गेले. पुढचं दृश्‍य आम्हा सर्व डोळसांचे डोळे पानावणारे होते...चिमुकल्यांनी आपल्या आई बाबांच्या पायावर डोक ठेवून नमस्कार केला आणि आई-बाबांनी आनंद अश्रूंना वाट करत चिमुकल्या चोचीत पेढा भरवला...आज ज्यांनी हा दिन सुरू केला तेदेखील कृतार्थ झाले...एरव्ही फक्‍त प्रेमीकांना साद घालणारा तरुण-तरुणाईंच्या दंगामस्तीचा हा डे म्हणून अनेकांच्या टीकेचा लक्ष्य झालेला याला अंधांनीच असा डोळसपणा दिला...

नॅबचे अध्यक्ष डॉ. मुकुंद पाठक म्हणाले, ""आम्ही ही शाळा सरकारचे एक रुपयाही अनुदान नसताना लोकांच्या मदतीवर गेली 12 वर्षे चालविली आहे. संस्थेचे वसतिगृहही असून दहावीचा निकाल शंभर टक्‍के आहे. अंध असलेल्यांनीही 75 टक्‍यांपर्यंत गुण मिळवत बुध्दीची चमक दाखविली आहे.

प्रमुख पाहुणे व "सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी म्हणाले, 'अंधाच्या जीवनात प्रकाश वाट निर्माण करणाऱ्या या संस्थेस अुनदान मिळत नाही, ही शोकांतिका आहे. भविष्यात अनुदान मिळावे व समाजातून मोठी मदतही मिळावी यासाठी प्रयत्न करूया.'' डॉ. मनोहर कुरणे, विजय लेले उपस्थित होते. या शाळेसाठी कोणताही मोबदला न घेता काही निवृत्त शिक्षक आपले योगदान देत आहेत. मुख्याध्यापक जी. व्ही. कुचेकर, उज्ज्वला हिरेकुडी, अनिता गायकवाड, अर्चना बारसे, यांनी या कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले.

Web Title: miraj news western maharashtra news blind child valentine day message