72 तासांनंतरही पंचनामे का झाले नाहीत?: शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
03.53 PM

गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात होत असलेल्या वादळीवाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग, धुळे जिल्ह्यातील भाग बाधित झाला आहे. काही ठिकाणी गारपिटीचे प्रमाण कमी असले तरी अवकाळी पावसामुळे पिकांची प्रत खराब होऊन दर कमी होण्याची शक्‍यता आहे

मुंबई - "सरकारने गारपिटीने झालेल्या नुकसानीचे 48 तासांत पंचनामे करण्याचे जाहीर केले होते; मात्र 72 तास उलटले अजूनही पंचनामे सुरु झालेले नाहीत. नैसर्गिक आपत्तीत सरकारी मदतीसाठी सरकारने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करायला लावू नये. या नुकसानीचे सर्वेक्षण करून तात्काळ मदत द्यावी,' अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज (बुधवार) केली. शेतकरी गारपिटीमुळे हवालदिल झाल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली आहे.

""कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर गारपिटीने नवीन संकट उभे केले आहे. आधीच कापसाच्या बोंडअळीची दमडीसुद्धा मिळालेली नाही. शेतकऱ्यांचा आधार रब्बी पिकावर असतो. हातातोंडाशी आलेले पीक गारांसह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातून गेले. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात होत असलेल्या वादळीवाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग, धुळे जिल्ह्यातील भाग बाधित झाला आहे. काही ठिकाणी गारपिटीचे प्रमाण कमी असले तरी अवकाळी पावसामुळे पिकांची प्रत खराब होऊन दर कमी होण्याची शक्‍यता आहे,'' असे पवार यांनी म्हटले आहे.

विदर्भ, मराठवाड्यामधील शेतीस गारपिटीमुळे मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना सरकारी मदतीची अपेक्षा असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी केलेले हे आवाहन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
 

Web Title: sharad pawar farmers maharashtra