लातूर: अहमदपूर तालुक्यात गारांचा पाऊस
आपल्या शेतात पडलेला गाराचा थर व त्यामुळे झालेल्या नुकसानीचे फोटो शेतकरी वॉटसअपवरून पाठवत होते. याबाबत अहमदपूरचे तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टी म्हणाले, की रात्री झालेली गारपीठचे नुकसान मोठे असून अहमदपूर तालुक्यात काही भागात ही गारपीठ झाली आहे.
हडोळती (जि. अहमदपूर) : या परिसरातील हडोळती, हिप्पळगाव, वळसंगी परीसरात मंगळवारी (ता. १३) रात्री दहा वाजता अर्धातास गारांचा पाऊस झाला. रात्री पडलेल्या गारांचा थर बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंत कायम होते. या तुफानी गारांमुळे गहू, हरभरा पिकांसह टोमॅटोचेही मोठे नुकसान झाले आहे.
रात्रीच्या गारपीटीनंतर शेतकऱ्यांनी सकाळी शेतात धाव घेतल्यानंतर झालेल्या नुकसानीची माहिती एकमेकांना दिली. त्यानंतर पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नियोजन केले असून ते रवाना झाले आहेत. रात्री दहाच्या सुमारास अर्धा तास गारांचा तडाख्यामुळे शेतीचे नुकसान प्रचंड झाले आहे. जीवीत हानीचा अंदाज अजूनपर्यंत मिळाला नाही. काढणीस आलेल्या रब्बी हंगामाचा तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. असा गारपिठीचा तडाका पहिल्यांदाच अनुभवल्याची चर्चा नागरिकातून व्यक्त होत आहे. टोमॅटो, हरभरा, गहू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मोहरांनी बहरलेले आंब्याचेही नुकसान झाले आहे. सकाळी गारांचा सहा इंचाचा थर जागोजागी दिसत होता.
आपल्या शेतात पडलेला गाराचा थर व त्यामुळे झालेल्या नुकसानीचे फोटो शेतकरी वॉटसअपवरून पाठवत होते. याबाबत अहमदपूरचे तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टी म्हणाले, की रात्री झालेली गारपीठचे नुकसान मोठे असून अहमदपूर तालुक्यात काही भागात ही गारपीठ झाली आहे. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी महसूल प्रशासनाचे कर्मचारी रवाना झाले असून तातडीने माहीती शासनाला देण्यात आली आहे. आपत्ती ला खचून न जाता शेतकऱ्यांनी हातबल होवू नये प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.