नवी दिल्ली - "दिल्लीच्या अर्थसंकल्पात शिक्षण व आरोग्यासाठी जास्तीत जास्त तरतूद करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाच्या सरकार घेतला आहे,'' अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (बुधवार) दिली.
""गेल्या तीन वर्षांत आम्ही खूप काम केले आहे. त्यात आरोग्य व शिक्षण विभागाचे विस्तारीकरणासाठी मोठी गुंतवणूक करणे हे सर्वांत मोठे काम आहे. सुपरस्पेशालिटी आणि मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांचा विस्तार करण्यात आला आहे. आरोग्य विभागाची मोहल्ला दवाखाना, पॉलिक्लिनिक, सुपरस्पेशालिटी केंद्र अशी रचना आमच्या सरकारने तयार केली आहे,'' अशी माहिती त्यांनी दिली,
दिल्लीतील "आप' सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केजरीवाल बोलत होते. सरकारने तीन वर्षांक केलेल्या कामांचा आढावा त्यांनी या वेळी घेतला. आरोग्य क्षेत्राबाबत बोलताना ते म्हणाले, "" या वर्षाच्या अखेरीस दिल्लीतील सरकारी रुग्णालयात जादा तीन हजार खाटा उपलब्ध करून दिल्या जातील. पुढील वर्षी अडीच हजार खाटांची सोय करण्यात येईल.'' दिल्ली सरकार खासगी रुग्णालयांच्याविरोधात नाही, पण दिल्ली सरकारी रुग्णालयांची क्षमताही वाढाविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयांत जावे लागणार नाही. दिल्ली रुग्णालयांची गुणवत्ता सुधारण्यावर आमचा भर आहे, असे केजरीवाल म्हणाले.