कुणकेश्वरला उसळला भक्तिसागर
देवगड - श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथील यात्रेला महाशिवरात्रीदिवशी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मध्यरात्री मंदिरात विधिवत पूजा होऊन यात्रेला सुरुवात झाली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. ‘हर हर महादेव....’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला. सायंकाळी देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीसाठी आल्या. गुरुवारी (ता. १५) समुद्रस्नानाने यात्रेची सांगता होईल.
देवगड - श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथील यात्रेला महाशिवरात्रीदिवशी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मध्यरात्री मंदिरात विधिवत पूजा होऊन यात्रेला सुरुवात झाली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. ‘हर हर महादेव....’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला. सायंकाळी देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीसाठी आल्या. गुरुवारी (ता. १५) समुद्रस्नानाने यात्रेची सांगता होईल.
विधिवत पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिर फुलांनी सुशोभित करण्यात आले होते. पिंडीभोवती फुलांनी सजावट करण्यात आली होती. पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पहाटे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुणकेश्वरचे दर्शन घेतले.
देवस्वाऱ्यांमुळे परिसर भक्तिमय
यात्रेत सायंकाळी देवस्वाऱ्या दाखल झाल्यामुळे सोबत असलेल्या ढोल-ताशांच्या गजराने परिसर भक्तिमय बनला होता. रोषणाईमुळे मंदिराच्या आकर्षतेत अधिकच भर पडली होती. मंदिरात भजने सुरू होती.
या वेळी माजी आमदार ॲड. अजित गोगटे, देवस्थान समितीचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मंदिर परिसरातील दर्शन रांगा भरून भक्तनिवास परिसरात रांग पोचली होती. भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते. देवस्थान समितीची मंडळी यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सतत कार्यरत असल्याचे दिसत होते. मंदिरात भजनाच्या माध्यमातून हरिनामाचा गजर सुरू होता. दिवसभरात आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, तहसीलदार वैशाली माने, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्यासह अन्य
मान्यवरांनी कुणकेश्वराचे दर्शन घेतले. दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांचा देवस्थानतर्फे सन्मान करण्यात आला. प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला देखावा यात्रेकरूंचे लक्ष वेधून घेत होता. मंदिर परिसर तसेच यात्रा परिसरात विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईने मंदिर उजळून निघाले होते. भाविकांना देवस्थानतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. समुद्रकिनारी भेल, आइस्क्रिम तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. समुद्रकिनारी बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी उंटावरील सफर सुरू होती. सायंकाळी यात्रेबरोबरच समुद्रकिनारी गर्दीत वाढ झाली होती. मंदिराच्या आवारातही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेत खाजा, खेळणी, विविध वस्तूंची दुकाने, शेती अवजारे, शेती साहित्याच्या व्यावसायिकांनीही दुकाने थाटली होती. कलिंगड विक्रेत्यांनीही दुकाने मांडली होती. मुलांच्या मनोरंजनासाठी पाळणेही आले होते. तसेच फिरते व्यापारी यात्रेत दिसत होते. सायंकाळी कुणकेश्वर भेटीसाठी देवस्वाऱ्या दाखल झाल्या होत्या.
देवस्वाऱ्या आल्या त्यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवस्वाऱ्यांसोबतच्या मंडळींमुळे यात्रेतील गर्दीत वाढ झाली. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण ठेवले जात होते. पोलिसांची गस्तही सुरू होती.