ऐतिहासिक चंद्रगिरी डोंगर - पुरातन वास्तूंचे संकुल
श्रवणबेळगोळ येथील विंध्यगिरी आणि चंद्रगिरी या दोन्ही डोंगरांना मोठा इतिहास आहे. दोन डोंगरापैकी चंद्रगिरी डोंगराचा इतिहास थोडा जुना आहे. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून ही तपोभूमी समाधीस्थळही बनली.
विंध्यगिरीच्या मानाने चंद्रगिरी हा छोटा डोंगर आहे. चंद्रगिरीला कन्नडमध्ये ‘चिक्कबेट्ट’ (छोटा डोंगर) असेही म्हणतात. त्याशिवाय ‘समाधी बेट्ट’, ‘कटवप्र’ अशीही नावे आहेत. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून ते इ. स. बाराव्या शतकापर्यंत या डोंगराचे मोठे महत्त्व होते. जैन धर्मीयांच्या दृष्टीने ते धर्माचे केंद्र बनून राहिले होते. येथे उपलब्ध असलेल्या सहाव्या शतकातील शिलालेखात सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि आचार्य भद्रबाहू यांनी येथे आगमन केल्याचा उल्लेख आहे. त्याशिवाय चंद्रगुप्त बसदीच्या सभामंडपात सम्राट चंद्रगुप्त आणि गुरूंच्या आगमनाची चित्रे दगडात कोरली आहेत.
चंद्रगुप्त मौर्य आणि आचार्य भद्रबाहू हे ज्या वेळी येथे आले, त्या वेळी तेथे कोणीही राहत नव्हते. पूर्ण डोंगर निर्मनुष्य होता. डोंगर आणि परिसराला घनदाट जंगलाने वेढले होते. आजही तेथे अशी काही ठिकाणी आहेत. सातव्या शतकात या डोंगराचे रूपांतर समाधीस्थळ किंवा इच्छामरण स्थळांत झाले. अनेक साधू, साध्वींनी येथे तप करत सल्लेखना घेतली. त्यामुळेच तब्बल ९२ ऐतिहासिक वास्तू येथे दिसून येतात. तसेच नवव्या-दहाव्या शतकात तर हा डोंगरच श्राविकांचे केंद्र बनून राहिला.
एका दृष्टिक्षेपात
- सहाव्या शतकातील कन्नडमधील शिलालेख
- आचार्य भद्रबाहू यांनी तपस्या केलेली गुहा
- १३ व्या शतकानंतर कोणतेही बांधकाम नाही
- बाहुबलींचे मोठे बंधू भरत यांची दुर्मिळ मूर्ती
त्याचबरोबर याचवेळी म्हणजे इ. स. ९८० ला चामुंडराय बसदी (चामुंडरायांचे मंदिर) बांधले. तसेच आता जी मंदिरे आणि इतर वास्तू दिसतात, त्यांचे बांधकाम १२ व्या शतकात झाले आहे. त्याशिवाय गंग राजे, त्यांचे नातेवाईक, नृत्यांगना शांतलादेवी, तिची आई, दरबारी आणि व्यापाऱ्यांनी येथे मंदिरे आणि निशिधी बांधल्या. येथे येऊन सल्लेखना घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. डोंगरभर बसदी विखुरल्या; मात्र १३ व्या शतकानंतर येथे कोणतेही बांधकाम झाल्याचे दिसत नाही.
डोंगरावर भद्रबाहूंची गुहा आहे. ते महत्त्वाचे आकर्षण आहे. येथील अनेक शिलालेखावत्रून ते येथे आल्याचा उल्लेख आहे. येथे एकूण बारा महत्त्वाच्या बसदी आहेत. त्याशिवाय मरसिन्हांचा मानस्तंभ, महानवमी मंटप, गजराज मंटप, निशिधी मंटप आणि भद्रबाहूंचा शिलालेख आदी अनमोल आणि पुरातन वास्तू आढळून येतात.