प्रदूषण रोखण्यासाठी बिर्ला कॉलेजचा 'नो व्हेईकल डे'!
कल्याण : कल्याणमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे प्रदूषण होत असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी बिर्ला कॉलेजने पुढाकार घेतला आहे. येत्या मंगळवारी (20 फेब्रुवारी) बिर्ला कॉलेजमध्ये 'नो व्हेईकल डे' साजरा केला जाणार आहे. यादिवशी 'केडीएमटी' विशेष बस सोडणार आहे.
कल्याण : कल्याणमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे प्रदूषण होत असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी बिर्ला कॉलेजने पुढाकार घेतला आहे. येत्या मंगळवारी (20 फेब्रुवारी) बिर्ला कॉलेजमध्ये 'नो व्हेईकल डे' साजरा केला जाणार आहे. यादिवशी 'केडीएमटी' विशेष बस सोडणार आहे.
कल्याण पश्चिममधील बिर्ला कॉलेजमध्ये 9,500 विद्यार्थी आणि 300 कर्मचारी, शिक्षक वर्ग आहे. ठाणे जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी येथे येतात. कॉलेज परिसरात रोज 1600 दुचाकी आणि 200 हून अधिक चारचाकी येथे येतात. इंधन बचत, पर्यावरण संरक्षण यासाठी 'नो व्हेईकल डे' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या मंगळवारी हा उपक्रम होणार असून त्यानिमित्त बिर्ला कॉलेजमध्ये छोटेखानी कार्यक्रम होणार आहे. यास प्राचार्य डॉ. नरेशचंद्र, वाहतूक पोलिस उपायुक्त अमित काळे, केडीएमटी परिवहन समिती सभापती संजय पावशे, परिवहन समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. या दिवशी विद्यार्थी सायकलने प्रवास करणार आहेत. शहराबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना कल्याण स्टेशन ते बिर्ला कॉलेज आणि कॉलेज ते स्टेशन अशी विशेष बस सोडण्यात येणार आहे.
सामाजिक बांधिलकी आणि प्रदूषणमुक्तीसाठी 'नो व्हेईकल डे' साजरा करण्यात येत आहे. शहरातील बॅंक, सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज यांनाही या उपक्रमात भाग घेण्यासाठी आवाहन करणार असल्याची माहिती बिर्ला कॉलेजचे प्राध्यापक नितीन बर्वे यांनी दिली.
'नो व्हेईकल डे' हा चांगला उपक्रम असून या दिवशी विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्यास त्रास होऊ नये, म्हणून केडीएमटीच्या विशेष बस सोडण्याची मागणी कॉलेजकडून झाली. त्यानुसार, आम्ही विशेष सेवा देणार असून त्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती केडीएमटी परिवहन समिती संजय पावशे यांनी दिली.