प्यार...'ब्रेक'अप के बाद! 

सकाळ वृत्तसेवा
04.28 PM

"ब्रेक' आणि "ब्रेकअप'नंतर पुन्हा फुलतं प्रेम... दोन वेगवेगळ्या नावांपुढे आडनाव लागतं सेम..! कधी कधी प्रेमाच्या रंगतदार सफरीत एखादा "ब्रेक' किंवा "ब्रेकअप' येतो. अशाच "ट्विस्ट'नंतर पुन्हा ट्रॅकवर येणाऱ्या जोडप्यांचा शोध घेत "सकाळ'ने त्यांच्या कहाणीतील "व्हॅलेंटाइन' शोधण्याचा केलेला प्रयत्न...

कधी कुणाच्या लग्नात भिडते नजरेला नजर... कधी नाटकाच्या तालमीतून सुरू होते प्रेमाची सफर... तिला तो आवडतो, त्याला ती आवडते... भेटीगाठी, आणाभाका, एकमेकांसाठी वाट्टेल ते... पण, स्वप्नांच्या "हाय-वे'वरसुद्धा भरावा लागतो टोल... लपूनछपून भेटण्याचेही मोजावे लागते मोल... "ब्रेक' आणि "ब्रेकअप'नंतर पुन्हा फुलतं प्रेम... दोन वेगवेगळ्या नावांपुढे आडनाव लागतं सेम..! कधी कधी प्रेमाच्या रंगतदार सफरीत एखादा "ब्रेक' किंवा "ब्रेकअप' येतो. अशाच "ट्विस्ट'नंतर पुन्हा ट्रॅकवर येणाऱ्या जोडप्यांचा शोध घेत "सकाळ'ने त्यांच्या कहाणीतील "व्हॅलेंटाइन' शोधण्याचा केलेला प्रयत्न...

बिन तेरे... तेरे बिन! 
अनिल कांबळे 
दिघोरी परिसरात राहणारे डॉ. अमर मोंढे यांची नातेवाइकाच्या लग्नात राणीशी भेट झाली. कुटुंबीयांनी ओळख करून दिल्यानंतर दोघांमध्ये संवाद वाढला. तेव्हा अमर बारावी, तर राणी दहावीला होती. ओळख झाल्यानंतर राणी उन्हाळ्यात पाहुणी म्हणून काही दिवस अमरच्या घरी राहायला आली. तेव्हा त्यांच्यात मैत्री झाली आणि "ट्युनिंग'ही जुळले. संवाद आणि सहवासातून प्रेमाची भावना निर्माण झाली. फोनवरून संभाषण आणि भेटीसुद्धा सुरू झाल्या. लपूनछपून दोघांच्या भेटी होऊ लागल्या. शेवटी कुटुंबीयांपर्यंत बातमी गेलीच. त्यामुळे दोघांचीही पंचाईत झाली. दादाने अमरची समजूत घातली; तर राणीला तिच्या आईने समजावले. दोघेही एकदा शेवटची भेट म्हणून एकत्र आले. शिक्षणावर लक्ष देऊ, असा निर्णय घेऊन सामंजस्याने दूर झाले. आपण स्वतः ओढवून घेतलेला विरह किती वेदनादायी असतो, हे ज्याचे त्यालाच ठाऊक. राणीला शिक्षिका व्हायचे होते, तर अमरला डॉक्‍टर. तिने डीएडसाठी प्रवेश घेतला. अमर वैद्यकीय शिक्षणाकडे वळला. दोघांनीही शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर घरच्यांनी लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. मात्र, अमरचे मन राणीतच अडकले होते. याचदरम्यान अमरने राणीला फोन केला, तर राणीही अमरचाच विचार करीत होती. इसको बोलते "व्हेव्हलेंथ'. पुन्हा दोघांच्या भेटी वाढल्या. आता दोघेही स्वतःच्या पायावर उभे असल्यामुळे आत्मविश्‍वास होता. "विनोद दादा, अभय दादा, नितीन दादा आणि प्रियंका, अंजली व अश्‍विनी वहिनींनी पुढाकार घेऊन दोघांच्याही कुटुंबीयांची बैठक घडवून आणली. आता आनंदाने होकार मिळाला आणि आम्हा दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले,' असे अमर सांगतो. गेल्या वर्षी उन्हाळ्यात लग्न झाले आणि संसार सुरू झाला. ताटातूट आठवली की, आजही दोघांच्याही अंगावर काटा येतो. पण, विरहाच्या वेदनांवर उमललेल्या फुलाचाही सुगंधच दरवळत असतो, हेही तेवढेच खरे. 

अमर प्रेम 
नितीन नायगावकर 
योगेश राऊत हे नागपूरच्या रंगभूमीला परिचित आहेत. रंगभूमीने अनेकांच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरले, तसे योगेशच्याही. 1987 मध्ये एका व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत योगेश आणि ऊर्मिला सहभागी होते. याच कार्यशाळेचा एक भाग म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. छोट्याशा नाटिकेत योगेशकडे पुतळ्याची भूमिका आली आणि ऊर्मिलाच्या वाट्याला केळी विकणाऱ्या बाईची. या कार्यशाळेत योगेशला ऊर्मिला आवडली. काही दिवसांनी योगेशने एक संस्था स्थापन केली आणि नाटक बसवायला घेतले. या नाटकातील एका भूमिकेसाठी त्याने ऊर्मिलाला विचारले. सात-आठ प्रयोग झाले. भेटीगाठी वाढल्या. योगेश स्केटिंग करायचा आणि ऊर्मिला फुटबॉल व हॉकी खेळायची. तिला स्केटिंग शिकायचे असल्याने हिस्लॉप कॉलेजच्या जवळ पहाटे प्रॅक्‍टिस करायचे. ऊर्मिला सायकलने इंदोरावरून यायची. खूप प्रयत्न केला; पण ऊर्मिलाला प्रपोज करणेच त्याला जमत नव्हते. एक दिवस तो तिच्या मागे मागे गेला; तेव्हा ऊर्मिलाच्या लक्षात आले. मैत्रिणीच्या माध्यमातून प्रपोज केले. ऊर्मिलाच्याही मनात होतेच. काही वर्षे भेटीगाठी सुरू होत्या. सोबत नाटकांमध्ये काम केले. एकदा इंदोरातील ललित कला भवनात एका नाटकाची तालीम सुरू होती. अचानक ऊर्मिला नाटकातून बाहेर पडली. कारण सांगितले नाही. मैत्रिणीच्या हातून चिठ्ठी पाठवली- "आता पुढचा प्रवास तुझ्यासोबत करू शकणार नाही. मला आयुष्यात बरेच काही करायचे आहे'. योगेश अस्वस्थ झाला. दोन महिन्यांनी मुंबईला निघून गेला. तिथे पाच-सहा वर्षे संघर्ष केला. मालिकांमध्ये काम केले. डान्स ग्रुपसोबत शोज केले. 1997 ला नागपूरला परत आला. घरचे लोक लग्नासाठी मुली शोधायला लागले; पण योगेशच्या मनातून ऊर्मिला गेली नव्हती. घरी भावांसोबत व्यवसायात हातभार लावत असल्याने स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड तयार झाले होते. हेच व्हिजिटिंग कार्ड त्याने ऊर्मिलाच्या घरी नेऊन सोडले. दोन दिवसांनी सकाळी फोन आला- "हॅलो, मी ऊर्मिला बोलतेय'. बर्डीतील "अमरप्रेम'मध्ये भेटायचे ठरले. ऊर्मिलाच्या दूर जाण्याचे कारणही कळले. ती त्याला म्हणाली, "तू स्टेबल नव्हतास. शिवाय तुला मुंबईला जायचे होते. तुझ्या स्वप्नांमध्ये मी अडथळा ठरले असते; म्हणून तुझ्यापासून दूर गेले.' मधल्या काळात ऊर्मिलानेही कथ्थकचे शिक्षण पूर्ण केले. दोघांनीही लग्नासाठी घरी विचारायचे ठरवले. घरून होकार मिळाला आणि रीतसर कांदेपोहे वगैरे झाले. 1997 मध्ये लग्न झाले आणि "प्रेम अमर' झाले..! 

नजर ने किया है इशारा... 
मनीषा मोहोड-येरखेडे 
सचिन आणि दीक्षा एकाच परिसरात राहत असल्याने रोज नजरभेट व्हायची. शालेय वयातील आकर्षण आणि मग प्रेमाची कबुली. "एक दुजे के लिये... जिएंगे मरेंगे साथ साथ' वगैरे वगैरे अशी लव्हस्टोरी आकार घेऊ लागली. सचिनला वडील नसल्याने त्याने शिक्षण सोडून मिळेल ती नोकरी धरत कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. तर, दीक्षा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील अभ्यासू मुलगी. एकाच कॉलनीत राहत असल्याने दोघांचे प्रेम कुटुंबीयांच्याही नजरेत यायला वेळ लागला नाही. अभ्यास करण्याच्या वयात प्रेम म्हणजे घरून समज मिळणारच. तरीही "प्रेमासाठी वाट्टेल ते' म्हणत चोरून भेटी सुरू राहिल्या. कुटुंबीयांना विश्‍वासात घेऊच, असा निर्धार सचिनने केला होता आणि त्याच्या डोळ्यांतील खरेपणा दीक्षाला भावला होता. लग्न करणार तर सचिनशीच, असा निर्णय तिनेही घेतला. पुढे सात वर्षे सचिन-दीक्षाचे प्रेम फुलत गेले. याच काळात सचिनवर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढल्या. परंतु, शिक्षण कमी असल्याने नोकरीत स्थिरावता आले नाही. दीक्षाचे एमएससीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते. मुलगा केवळ बारावी आणि नोकरीची शाश्‍वती नाही. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या. लग्नानंतर येणाऱ्या आर्थिक अडचणी, दोघांतील वय, शिक्षणाचे आणि व्यावहारिक अंतर आडवे आले. "मला विसरून जा' असा निरोप दीक्षाने सचिनला पाठवला. सचिनला प्रेमावर विश्‍वास होता. विरहाचे काही दिवस सहनही करावे लागले. अखेर त्याने दीक्षाला विश्‍वासात घेतले. "जगात सर्व सोयीसुविधा मिळतील; पण खरे प्रेम विकत मिळणार नाही' हे सचिनने दीक्षाला पटवून दिले. "सचिनच्या डोळ्यांतील विश्‍वास आणि खरेपणा पाहूनच मी निर्णय बदलला आणि लग्नाला तयार झाले', असे दीक्षा सांगते. आपने नजर से नजर कब मिला दी... हमारी जिंदगी झूमकर मुस्कुरा दी..! 

प्रेमाचे असेही "मॉडेल' 
निखिल भुते 
रवी माणूसमारे आणि प्राजक्ता लांडे यांची एका लग्नात ओळख झाली. रवीच्या मनाला पहिल्याच क्षणाला त्याच्या स्वप्नातील अप्सरा सापडली. तिच्या रूपाने घायाळ झालेल्या रवीने प्राजक्ताशीच लग्न करायचे, असा मनोमन संकल्पही केला. मात्र, शिक्षणातील तफावतीमुळे त्याच्या मनात "इनफेरिअर कॉम्प्लेक्‍स' निर्माण झाला. इंजिनिअर झालेली प्राजक्ता आपल्याला भाव देणार का, असा प्रश्‍न आयटीआय करून फोटोग्राफी करणाऱ्या रवीच्या मनात निर्माण झाला. विचारांनी गोंधळ घातला आणि तिथेच लोच्या झाला. प्रेमाच्या मैदानात भिल्लासारखं लढायचं सोडून या दीनकराने सपशेल नांगी टाकली. मात्र, "भगवान के घर देर है पर अंधेर नहीं' असे म्हणतात ते काही खोटे नाही. रवीलादेखील त्याची प्रचिती आली. प्राजक्ता आणि रवीच्या नातेवाइकांनी आनंदवन येथे जाण्याचा प्लान केला. यानिमित्ताने दोघांची नव्याने ओळख झाली आणि शब्दांना वाचा फुटली. एकमेकांसोबत सुरू झालेल्या संवादाने मोबाईलच्या माध्यमातून "फोर जी'ची स्पीड पकडली. "हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे' म्हणत दोघांनीही आणाभाका घेतल्या. दरम्यानच्या काळात रवीने फोटो स्टुडिओ सुरू केला. व्यवसाय बऱ्यापैकी जोर पकडू लागल्यामुळे दोघांनी एकमेकांजवळ लग्नाचा विचार व्यक्त केला. घरी सांगितले आणि मुलगा पाहणीतलाच असल्याने होकारही मिळाला. लग्न जुळले. सारे काही सुरळीत सुरू होते; पण हाय रे नशीब! प्रेमाला जालीम दुनियेची नजर लागली. फोटोग्राफीच्या क्षेत्रात असल्यामुळे रवीला "मॉडेल फोटोग्राफी' करावी लागायची. अर्थातच, मुलींचे प्रमाण जास्त असणार. व्यवसायाच्या निमित्ताने होणारा संपर्क प्राजक्ताच्या मनात शंकेचे वादळ निर्माण करून गेला. "असला नवरा नको गं बाई' म्हणत लग्न मोडण्याचा निर्णय झाला. रवीला काही कळायला मार्ग नव्हता. मात्र, या परिस्थितीवरही स्वत:च्या नि:स्वार्थ प्रेमाने मात करण्याचे त्याने ठरवले होते. शाश्‍वत प्रेमाच्या जोरावर त्याने प्राजक्ता आणि तिच्या घरच्यांचा विश्‍वास पुन्हा मिळविला. काही महिन्यांचा विरह दोघांच्या प्रेमाला अधिक परिपक्व करून गेला. सोन्यालासुद्धा तापविल्याशिवाय झळाळी येत नाही. तसेच त्यांच्याही प्रेमाचे झाले. काही काळाचा दुरावा त्यांना अधिक जवळ घेऊन आला आणि साठा उत्तराची ही प्रेमकथा पाचा उत्तरी लग्न होऊन सफळ संपूर्ण झाली. 

आणि "ट्विस्ट' आला... 
नरेंद्र चोरे 
आठ वर्षांपूर्वीची कहाणी आहे. नागपुरात शासकीय नोकरी करणारा अभिषेक शनिवारे आणि उच्च शिक्षित सारिका वर्धा येथील एका मित्राच्या लग्नात पहिल्यांदा भेटले. छोट्याशा मुलाखतीत दोघे नकळत एकमेकांकडे आकर्षित झाले. त्यांच्यात मैत्री झाली. फोन नंबर एक्‍स्चेंज झाले आणि "लव्ह स्टोरी' सुरू झाली. घरच्यांच्या नजरेआड अभिषेक व सारिकाचे नियमितपणे फोनवर बोलणे सुरू झाले. अभिषेक नागपुरात नोकरी करीत होता; तर सारिका वर्धा येथे शिक्षण घेत होती. साप्ताहिक सुटीच्या दिवशी वेळात वेळ काढून अभिषेक हमखास सारिकाच्या भेटीला जायचा. दोघांमध्ये तासन्‌तास प्रेमाच्या गप्पा रंगायच्या. मात्र, हे सगळे घरच्यांच्या चोरून सुरू होते. हा सिलसिला काही वर्षे सुरू राहिला. "जियेंगे तो साथ में'प्रमाणे त्यांची प्रेमकहाणी फुलू लागली. लपूनछपून भेटण्याऐवजी प्रेमाच्या नात्याला कायमचे विवाहबंधनात रूपांतरित करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. परंतु, प्रत्येक प्रेमकहाणीत काहीतरी ट्‌विस्ट येतो, तसे यांच्याही बाबतीत झाले आणि दोघांची ताटातूट झाली. अभिषेक-सारिकाचे फोनवर बोलणे बंद झाले अन्‌ भेटीगाठीही थांबल्या. दरम्यान, सारिकाने आपले शिक्षण पूर्ण केले. तिकडे अभिषेकचेही प्रमोशन झाले. जवळपास सहा महिन्यांचा "ब्रेक' झाल्यावर अभिषेक-सारिकाचे पुन्हा फोनवर बोलणे सुरू झाले. "यंदा लग्नाचा बार उडवायचाच' असा पक्‍का निर्धार करीत दोघांनीही घरच्यांना विश्‍वासात घेण्याची तयारी केली. पाच वर्षांपूर्वी हा आंतरजातीय विवाहसोहळा थाटात पार पडला आणि सुखी संसार सुरू झाला. आप दौलत के तराजू में दिलों को तौलें... हम मोहब्बत से मोहब्बत का सिला देते हैं..!

Web Title: Nagpur valentine story