आळेकरांचे ‘महानिर्वाण’ पुन्हा रंगभूमीवर
‘महानिर्वाण’ हे नाटक नव्या पिढीच्या हातात देताना अतिशय आनंद होतोय. ही नवी पिढी या नाटकाकडे कसे पाहते आणि नव्या प्रेक्षकांना या नाटकाबद्दल काय वाटते, याची मला जास्त उत्सुकता आहे.
- सतीश आळेकर, नाटककार आणि दिग्दर्शक
पुणे - मराठी रंगभूमीवरील ‘माइलस्टोन’ समजल्या जाणाऱ्या काही नाटकांपैकी एक, ज्या नाटकाने रंगभूमीला नवा आयाम मिळवून दिला, रूढी-परंपरांचे आणि मानसिकतेचे भारतातील विविध भाषांतून दर्शन घडविले असे ‘महानिर्वाण’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. विशेष म्हणजे, नाटककार सतीश आळेकर यांनीच या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली असून, या नाटकासाठी पुण्यातील युवा रंगकर्मी आणि ‘नाटक कंपनी’ने पुढाकार घेतला आहे.
सुतकाचं कीर्तन आणि मृत्यू या विषयांभोवती रचलेले, अतिशय प्रभावी लेखन असलेले ‘महानिर्वाण’ हे नाटक अशा एका मृत व्यक्तीची कथा सांगते, ज्याला एका विशिष्ट प्रकारेच स्वतःचे अंत्यसंस्कार व्हावे असे वाटते. त्याप्रकारे अंत्यसंस्कार होईपर्यंत त्याचे पार्थिव तसेच ठेवले जाते.
त्यानंतरच्या अनेक घडामोडींतून हे नाटक पुढे जाते आणि समाजातील मानसिकतेचे दर्शन घडवते. आशय, भाषा, रचना या दृष्टीने हे नाटक अर्थपूर्ण आहे. त्यामुळे रंगभूमीच्या संदर्भात हे नाटक आजही महत्त्वाचा टप्पा मानले जाते.
आळेकर म्हणाले, ‘‘हे नाटक १९७४ मधले. तेव्हाच्या राज्य नाट्य स्पर्धेत ते प्रथम सादर झाले होते. ‘घाशीराम’सोबत अनेक वर्षे याचे प्रयोग झाले. जवळपास ३६ वर्षांनंतर याचे प्रयोग आम्ही वेगवेगळ्या कारणांमुळे थांबविले; पण इतक्या वर्षांनंतर हे नाटक पुन्हा नव्या पिढीला करावेसे वाटत आहे.
त्यामुळे नव्या ‘टीम’सह हे नाटक प्रेक्षकांसमोर आणत आहोत. संगीतकार आनंद मोडक यांनी संगीत दिलेले हे पहिले नाटक होते. त्यामुळे या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनाच आम्ही समर्पित करत आहोत.’’ विनोद दोशी नाट्य महोत्सव १९ ते २३ फेब्रुवारीदरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. त्यात सोमवारी (ता. १९) सायंकाळी साडेसात वाजता होणाऱ्या या नाटकात देवस्थळी, सायली फाटक, सिद्धार्थ महाशब्दे, भक्तिप्रसाद देशमाने यांच्यासह नव्या पिढीतील कलाकार आहेत.