प्रकाशाच्या दिशेने जाण्यासाठी महाशिवरात्र
गव्हाचा एक दाणा पेरल्यानंतर त्यातून तयार होतात अनेक गहू. "पेरावेसे वाटणे' या क्रियेमुळे गहू तयार होत असले, तरी त्या दाण्यामध्ये (बीजामध्ये) असलेल्या गुणप्रवृत्तीमुळे, सध्याच्या भाषेत बोलायचे झाले तर त्यात असलेल्या प्रोग्रॅममुळे अनेक गहू तयार होतात, विस्तार होतो. तसे या परमात्मा परमपुरुष बीजाचा विस्तार झाला व विश्व तयार झाले. गव्हाचे पीठ झाले व नंतर पिठाच्या पोळ्या, पराठा, पुऱ्या, फुलका झाला तरी या सर्व गोष्टी गव्हापासून झाल्या असे म्हणता येते. या सर्व गोष्टींचा माय-बाप असतो एक गव्हाचा दाणा.
सूर्यास्तानंतर अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग शोधण्याची क्रिया करण्यासाठी महाशिवरात्र हा उत्सव किंवा व्रत सांगितलेले आहे. शिवोपासनेने भटकणाऱ्या मनाला शांत करता येते. शिवशक्तीचा उपयोग करून घेता यावा, याकरिता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवोपासनेला सुरवात करावी अशी कल्पना आहे.
शिव म्हणजे शुद्धता, शिव म्हणजे संपूर्ण मांगल्य आणि शिव म्हणजे पूर्ण कल्याण. "शव' हे जडाचे निदर्शक आणि "इ' हा शक्तीचा निदर्शक ध्वनी. या दोन्हींचे मिलन होते तेव्हा तयार होतो अवतारस्वरूप शिव-शंकर-महादेव म्हणजे तेव्हा जीवन सुरू होते. "ऱ्हीं', "क्लीं' अशा मंत्रामध्ये टाकलेला "इ' हे शक्तीचे रूप असते. शक्तीची अनेक रूपे असतात. शिव-शक्तीचे मिलन ही महाशिवरात्र. यातील "महा' शब्द शिवासाठी उपयोगात आणलेला आहे की रात्रीसाठी उपयोगात आणला आहे, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शिव-शंकर-महादेव व त्यावरचे रुद्र-सदाशिव व सरतेशेवटी परमात्मा-महाशिव-महारुद्र या सर्व परमात्म शिव-शक्तीच्या पातळ्या किंवा प्रकटीकरणाच्या वेगवेगळ्या अवस्था होत.
गव्हाचा एक दाणा पेरल्यानंतर त्यातून तयार होतात अनेक गहू. "पेरावेसे वाटणे' या क्रियेमुळे गहू तयार होत असले, तरी त्या दाण्यामध्ये (बीजामध्ये) असलेल्या गुणप्रवृत्तीमुळे, सध्याच्या भाषेत बोलायचे झाले तर त्यात असलेल्या प्रोग्रॅममुळे अनेक गहू तयार होतात, विस्तार होतो. तसे या परमात्मा परमपुरुष बीजाचा विस्तार झाला व विश्व तयार झाले. गव्हाचे पीठ झाले व नंतर पिठाच्या पोळ्या, पराठा, पुऱ्या, फुलका झाला तरी या सर्व गोष्टी गव्हापासून झाल्या असे म्हणता येते. या सर्व गोष्टींचा माय-बाप असतो एक गव्हाचा दाणा.
ही कल्पना लक्षात घेऊन भारतीयांनी प्रत्यक्ष अभ्यासातून व अनुभवातून असे शोधून काढले की मूळ परमात्मा (बीज) एक आहे व या बीजापासून सर्व विश्वाची उत्पत्ती झालेली आहे. या उत्पत्तीतून वेगवेगळ्या गोष्टी तयार झाल्या. माणूसही यातूनच तयार झाला. जसे गव्हाच्या पिठात तेल, तूप, पाणी वगैरे मिसळून वेगवेगळ्या पाककृती बनवता येतात, तसे पंचमहाभूतांच्या माध्यमातून सृष्टीत वेगवेगळी अस्तित्वे तयार होतात. या सर्व योजनेचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे आनंदप्राप्ती. कोणाला पोळ्या खाऊन आनंद होतो तर कोणाला पुऱ्या खाऊन आनंद होतो. "आनंद होणे' हेच सर्वांचे ध्येय असते व आनंद सगळ्यांना मिळणे अभिप्रेत असते. तसेच प्रकटलेले सर्व विश्व आनंदासाठी आहे. बीज जमिनीत जाते व दिसेनासे होते, त्या एका बीजातून अनेक पोती गहू निर्माण होतो, पण बीज कुठे असते? तसेच या विश्वाच्या बीजाचे आहे, ही गोष्ट समजून घ्यावी लागते. पंचमहाभूतांपासून तयार झालेली सृष्टी ही इंद्रियांना गोचर असलेली सृष्टी होय.
जो मानवाच्या, निसर्गाच्या भल्यासाठी काम करतो व जो प्रत्येकाला जीवन जगण्याचे स्फुरण देतो, जो अनेक प्रकारे देणारा असतो, त्याला आपण देव म्हणतो. हा देव कशातही असू शकतो. तो विशिष्ट आकारात किंवा विशिष्ट गुणांचा असेल असे नसते. मासा, कासव, नरसिंह, पूर्ण पुरुषोत्तम अशा सगळ्यांतून तोच प्रकट झालेला आहे.
सध्या आपण संगणकाच्या युगात असल्यामुळे आपल्याला असा विचार करणे सोपे होऊ शकेल, की कोणीतरी एक प्रोग्रॅम लिहिलेला असतो, तो प्रोग्रॅम आपल्याला समजू शकत नाही. परंतु, त्याची स्पंदने उपग्रहामार्फत टॉवरपर्यंत येतात व नंतर ही स्पंदने घरात असलेल्या संगणकापर्यंत, मोबाईलपर्यंत प्रकट होतात. ही योजना लक्षात घेतली तर देवतांची कल्पना लक्षात येईल.
स्वयंभू देवता सदाशिव ही निर्गुण, निराकार, न समजणारी देवता आहे. याच्या एक पायरी खाली आले तर तेथे शिव-शंकर-महादेव असतात. याच्याही खाली आले तर आपल्या शरीरात हीच संकल्पना असते. आपल्याला टॉवरपर्यंतची कल्पना समजू शकते, त्याच्या पलीकडे असलेल्या तरंगांची कल्पना आपल्याला येत नाही; तसे शिव-शंकर-महादेव यांच्यापलीकडे असलेले आपल्याला समजू शकत नाही. शिवाचा अवतार असलेला भैरोबा, भैरव, काळभैरव वगैरे देवता पृथ्वीवर प्रकट होऊन कार्य करून गेलेल्या आढळतात. पण रुद्र-सदाशिव या देवता स्वयंभू आहेत. यांच्या कथाही स्वयंभू आहेत. या कथा म्हणजे आपल्याला देवतांचे अस्तित्व समजवण्यासाठी घेतलेली उदाहरणे आहेत. या कथांचे विपरीत अर्थ लावून आपल्या विचारांची व उपासनेची भटकंती होऊ नये यासाठी ही योजना समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक महिन्यात एक शिवरात्र असते. या दिवशी मनुष्याला त्या संकल्पनेत विलीन व्हायची संधी असते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी उपलब्ध असलेली संपूर्ण विश्वाच्या रेडिएशनमधून निघालेली शक्ती या संकल्पनेपर्यंत पोचण्यासाठी पुरेशी पडत नाही. आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रयत्न केला तर साधक महाशिवांपर्यंत पोचण्याची शक्यता उत्पन्न होते.
शिव हा मूळ शब्द स्वच्छतेचा, पवित्रतेचा निदर्शक आहे. ही पवित्रता कशाची? भौतिक अपवित्रता सहजपणे काढून टाकता येते. पण मनाची व आत्म्याची अपवित्रता (प्रोग्रॅममध्ये असलेला व्हायरस) काढून टाकणे अवघड असते. शंकरांनी सगळ्यात जहाल विष पचवले, त्या विषाचा परिणाम होऊ दिला नाही, त्यातील चांगला भाग तेवढा घेतला. यामुळे शंकरांना नीलकंठ नाव पडले हे आपल्याला माहीत आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी भांगेसारखा पदार्थ दुधाबरोबर घेण्याची पद्धत रूढ झालेली दिसते. आयुर्वेदानुसार धोत्रा विषारी समजला जातो, त्याचा उपयोगही आयुर्वेदात चांगल्या प्रकारे केलेला आढळतो. या विषारी झाडाचे फूल वा बीज शंकरांना वाहण्याची प्रथा आहे. भांग दुधाबरोबर काही तास उकळल्याने भांगेची शुद्धी होते. स्तंभनाची, शांत होण्याची क्रिया भांगेमुळे होते. त्यामुळे जुलाब वगैरे त्रासांवर भांगेचा उपयोग होतो असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.
शुद्धी ही या उपासनेची पहिली पायरी समजायला हरकत नाही. पंचकर्म आदींद्वारा भौतिक शरीराची शुद्धी करता येते. भटकणाऱ्या मनाला शांत करण्याचे इलाज महत्त्वाचे. यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवोपासनेला सुरवात करावी अशी कल्पना आहे, ज्यामुळे या शिवशक्तीचा उपयोग करून घेता येईल.
शक्तीच्या तीन पातळ्या असतात. शिव ही नाशक शक्ती नसून ती मदतीचा हात देऊन मनुष्याला पुढच्या पातळीवर नेते. भौतिक पातळीवर शरीराचे क्षरण होत असते. आतील जिवाला उत्क्रांतीकडे घेऊन जाण्यासाठी, शरीर सुटल्यावर त्याला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेणारी शिव ही देवता. त्यामुळे शिव स्मशानात आधार देण्यासाठी वेशीवर (बॉर्डरवर) उभे असतात, जेथे भौतिकाची पहिली पायरी सुटते व दुसरी पायरी सुरू होते. येथे जिवाला हात देऊन पुढे नेतात.
शरीराची सर्व प्रकारची चलनवलन शक्ती म्हणजे स्पंदने दोन प्रकारची असतात. या दोन स्पंदनांमुळे शरीर जिवंत असते. कुठल्याही कर्मासाठी इंद्रियांना हलविण्याचा विचार मेरुदंडाच्या वरच्या टोकावर असलेल्या पॉन्स या ग्रंथीत संतुलित होतो. या ग्रंथीच्या आत काहाही हलनचलन होत नसते, तेथे फक्त येणाऱ्या सर्व शक्तींचे व येणाऱ्या संवेदनांचे नियोजन केले जाते व त्या शक्ती वा संवेदना हव्या त्या ठिकाणी पोचविल्या जातात. अशा स्थानाला "लिंग' असे नाव दिलेले आहे. लिंगस्वरूप म्हणजे बाण, एक छोटीसी गोळी, या लिंगाच्या आत काही हालचाल नसते. परंतु, त्याचा सगळ्यावर अंकुश असतो. या लिंगाचा संबंध अनेकांनी मनुष्यलिंगाशी जोडलेला दिसतो. परंतु, शिव व मनुष्यजननेंद्रिय यांचा काहीही संबंध नाही. शिवाचा आकार किंवा स्वरूप हे लिंगस्वरूप म्हणजे मनुष्याच्या लिंगस्वरूप आहे असे मुळीच नाही. परंतु, अनेकांनी या कुठून तरी आलेल्या विचाराचा, न विचार करता प्रचार करून शिवाचे पावित्र्य घालवले आहे.
आपल्याला लक्षात घ्यायला हवे की शिवग्रंथी शरीरात आहे व या ग्रंथीला प्रसन्न करण्यासाठी, तिला उपयोगात आणून शिवस्वरूप होण्यासाठी उपासना करता येते. यासाठी वेगवेगळे मंत्र आहेत. सोप्यात सोपा मंत्र "ॐ नमः शिवाय'. या मंत्राच्या ध्वनींनी उपासना करता येते, किंवा शरीराच्या विशिष्ट हालचाली करून शिवग्रंथीच्या ठिकाणी स्पंदने देता येतात. अशी स्पंदने दिल्यावर ग्रंथी उत्तेजित होऊन प्रतिक्रिया मिळतात. या दृष्टीने शिव हा नटेश्वर आहे. भुवया, चेहऱ्याच्या स्नायूंच्या, हातापायाच्या विशिष्ट हालचाली साधण्यासाठी नृत्याची कल्पना केलेली आहे. यामुळेही शिवग्रंथीला प्रसन्न करून शिवाची उपासना केली जाते. शक्तीचे मिलन वरच्या पातळीवर असणाऱ्या महाशिवाशी मिलन तेव्हाच होऊ शकते जेव्हा खालच्या पातळीवर मेरुदंडाच्या वरच्या टोकावर (मेरुशिखरावर) असणाऱ्या कैलासावर असणारे सदाशिव स्थिर असतील. या सदाशिवांचे शरीरात असलेल्या नाड्यांवर नियंत्रण आले तर वरून येणाऱ्या वैश्विक शक्तीचे व सदाशिवाचे मिलन होऊ शकते. त्यामुळे सुषुम्ना नाडी मध्यमार्गाने वर येते असे समजले जाते. इडा, पिंगला फिरत राहिल्या तर समुद्रमंथन होते म्हणजे मेंदूत असलेले मेंदूजल ढवळले जाते. मेरुदंड ही रवी आणि इडा-पिंगला या घुसळण्यासाठी लागणाऱ्या दोऱ्या यांच्या मदतीने समुद्रमंथन झाले की एका बाजूने हलाहल, तर दुसऱ्या बाजूने अमृत उत्पन्न होऊ शकते. हलाहल हे विष, जे मनुष्याला भटकवते व अमृत मनुष्याला शांत करते.
सर्व संवेदना असतात आणि त्या पॉन्स या ग्रंथीच्या अधिपत्याखाली मेरुदंडात उतरतात. शिवलिंगावर दुधाच्या अभिषेकाचा संबंध हा मेंदूतील मेंदूजल व मेरुदंडाच्या वरच्या भागात असलेल्या चौथ्या नंबरच्या खाचेशी (फोर्थ व्हेंट्रिकल) लावता येतो. जननेंद्रियाशी त्याचा संबंध कसा लावणार? मेंदू म्हणजे शरीराचा वरचा तिसरा स्वर्गासारखा भाग. त्यातील गंगाजल मेरुदंडाद्वारा पॉन्स या ग्रंथीमागून शिवजटेतून बाहेर पडून पृथ्वीवर येते, तेव्हा शरीरातील सर्व पेशी व इंद्रिये कार्यरत होतात. हीच ती भगिरथाची कथा. हीच प्रक्रिया श्री शंकरांच्या जटेतील गंगा या रुपकाच्या स्वरूपात समजावलेली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उगाच नशापाणी करणे, रात्रभर वेडावाकडा धिंगाणा करणे अपेक्षित नाही. सूर्यास्तानंतर अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग शोधण्याची क्रिया करण्यासाठी महाशिवरात्र हा उत्सव किंवा व्रत सांगितलेले आहे. आजपर्यंत या व्रताद्वारे अनेकांनी लाभ मिळविलेला आहे. या व्रतातून त्यांना झालेल्या दिव्य अनुभवांचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते. सांगितलेल्या रूपकांचा, सांगितलेल्या उपमांचा विपर्यास केला व नुसते एके ठिकाणी दिवा लावून, फुले वाहून आपल्याला हवे तसे वागत राहिलो तर चित्त शांत होणार नाही, मेरुशिखरावर शक्तीचे स्तंभन होणार नाही. यौनाशी किंवा स्त्री-पुरुषसंबंधाशी शिवाचा संबंध जोडून उगाच उच्छृंखल क्रिया करण्याने काहीही साध्य होणार नाही.
आपल्या भौतिक पातळीवर शिव-पार्वती म्हणजे शिव-शक्ती या देवस्वरूप व्यक्तिरेखा. त्यांच्या उपासना, पूजन, ध्यान यांच्या द्वारे संतुलन, समाधी साधणे ही महाशिवरात्रीची साधना. शिव-शक्तीची संकल्पना नीट समजून घेतली तर होणाऱ्या आनंदातून वेगळी अनुभूती येऊ शकते. त्यातून एक लक्षात येते की शिव कैलासावर समाधीत मग्न असतात म्हणजे त्यांची वृत्ती स्थिर असते, ते कशानेही विचलित होत नाहीत, अगदी कामदेवाच्या बाणवर्षावानेही. सगळ्याचा त्याग करून, आपल्याकडे असलेले सर्वांना वाटून टाकण्यात आनंद मानता आला तर ही पातळी साधणे शक्य आहे. देण्यातील आनंदाचा संबंध या देवतेशी जोडलेला आहे. मनुष्यमात्राची सेवा करणे, दान देणे, अन्नदान करणे यातून मिळणारे समाधान आपल्याला या ठिकाणी स्थिर करून शिव-शक्तीचा अनुभव देऊन परमात्म्यापर्यंत पोचवून एक वेगळी अनभूती येऊ शकते.