मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वाधिक 22 गुन्हे
29 राज्य सरकार आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक 22 गुन्हे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल झाल्याची बाब एका सर्वेक्षणातून उघडकीस आली आहे. 29 राज्य सरकार आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक 22 गुन्हे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् (आयडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच' या संस्थेने यासाठी सर्वेक्षण केले होते. त्यानंतर ही बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर 22 गुन्हे दाखल झाले असून, यातील 3 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यांच्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावर 11 तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
यातील 26 टक्के मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी खटले दाखल झाल्याचे सांगितले. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, फसवणूक आणि मालमत्ता गैरव्यवहार यांसारखे गुन्हे दाखल आहेत.