माझे पाकिस्तानवरही प्रेम : मणिशंकर अय्यर
''भारतावर माझे जेवढे प्रेम आहे, तेवढेच प्रेम पाकिस्तानवरही आहे.''
- मणिशंकर अय्यर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर काँग्रेसने निलंबित केलेले नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ''भारतावर माझे जेवढे प्रेम आहे, तेवढेच प्रेम पाकिस्तानवरही आहे,'' असे वक्तव्य अय्यर यांनी केले आहे.
कराची येथे एका कार्यक्रमात अय्यर बोलत होते. ते म्हणाले, ''कोणत्याही अटी-शर्तीविना चर्चा करत राहणे. हाच भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारण्याचा एकमेव पर्याय आहे. चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न योग्यच आहे. पण नवी दिल्लीकडे हे धोरण नाही,'' अशी टीकाही अय्यर यांनी केली. तसेच ''भारत-पाकिस्तानने एकत्र बसून चर्चेद्वारे प्रश्न सोडविणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारायचे असेल तर दोन्ही देशांत चर्चा व्हायला पाहिजे, असे सांगतानाच दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुकही केले.