पणुंब्रे, जिंती परिसरात गव्यांचा कळप
इस्लामपुर - सांगली व सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील पणुंब्रे (ता. शिराळा) व जिंती (ता. कऱ्हाड) या गावांच्या डोंगरावर आज सकाळी सात जंगली गव्यांचा कळप शेतकऱ्यांना दिसला.
इस्लामपुर - सांगली व सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील पणुंब्रे (ता. शिराळा) व जिंती (ता. कऱ्हाड) या गावांच्या डोंगरावर आज सकाळी सात जंगली गव्यांचा कळप शेतकऱ्यांना दिसला. मुख्यतः चांदोली, आंबा घाट परिसरातील जंगलात गव्यांचे वास्तव्य असते. या परिसरात ते क्वचितच पहायला मिळतात. पण कळपाने गवे दिसल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबतची माहिती, दोन्ही गावातील ग्रामस्थांसह आसपासच्या गावातील नागरिकांना समजतात पणुंब्रे, गिरजवडे, जिंती, बोत्रेवाडी, शेवाळेवाडी या गावामधील ग्रामस्थ व युवकांनी डोंगराकडे धाव घेतली. पीराचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असणारा हा डोंगर सांगली व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. सकाळी गव्याची माहीती जिंती (ता. कऱ्हाड) येथील ग्रामस्थांना समजताच त्या परिसरातील युवकांनी गवे सांगली जिल्ह्याच्या बाजुला डोंगराकडे पिटाळले आहेत. गव्यांच्या या कळपामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे गवे चांदोली अभयारण्या मधुन आले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.