माझं पहिलं प्रेम...
प्रेम कुणावरही करावं? ही प्रेमाची व्यापकता सांगणारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची कविता आपल्याला ठाऊक आहे. अशाच प्रेमाच्या व्याप्तीत निसर्ग आणि त्याच्याशी निगडित घटकांवर "पहिलं प्रेम' जडल्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे नाशिकमधील विविध व्यक्तिमत्त्वांनी. पशू-पक्षी-बिबट्यांपासून ते पसरबाग अन् भ्रमंतीवर त्यांचे प्रेम जडलेय. व्हॅलेंटाइन डे निमित्त यासंदर्भातील विचार
प्रेम कुणावरही करावं? ही प्रेमाची व्यापकता सांगणारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची कविता आपल्याला ठाऊक आहे. अशाच प्रेमाच्या व्याप्तीत निसर्ग आणि त्याच्याशी निगडित घटकांवर "पहिलं प्रेम' जडल्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे नाशिकमधील विविध व्यक्तिमत्त्वांनी. पशू-पक्षी-बिबट्यांपासून ते पसरबाग अन् भ्रमंतीवर त्यांचे प्रेम जडलेय. व्हॅलेंटाइन डे निमित्त यासंदर्भातील विचार
माझं पहिलं प्रेम जखमी पक्ष्यांवर उपचारासाठीचे असते. शेकडो पक्षी, वन्यप्राणी, सर्प आदींवर उपचार केलेत. मुक्या जीवांवर उपचार करताना त्यांच्या डोळ्यातील भाव माझ्याशी बोलू लागतो. घुबडाची चार दिवसांची सात पिले उडून जाईस्तोवर मी त्यांचा आई-बाबा बनलो होतो. त्यांना हाताने मांसाहार खाऊ घातला होता.
-डॉ. संजय गायकवाड, पशुवैद्यकीयचे सहउपायुक्त
---
ज्याला बघून घाम फुटतो, तो शहरात घुसणारा वन्यप्राणी बिबट्या हे माझं पहिलं प्रेम. आजपर्यंत जिल्ह्यात 120 बिबट्यांना मी "रेस्क्यू' केले. प्रत्येक बिबट्याला जिवंत पकडून त्याच्या अधिवासात सोडल्यावर मला खूप बरे वाटते. एका ठिकाणी बिबट्या "रेस्क्यू' करण्यासाठी गेलो होतो, तिथे प्रचंड गर्दी होती. गर्दीमुळे घाबरून बिबट्या माणसावर धावून येत होता. त्याला जंगलात जायचे होते पण बघे त्याला अडथळा निर्माण करीत होते. अशा वेळी तो चक्क माझ्यावर धावून आला. तो माझ्यावर चाल करणार असे वाटत असतानाच तीन फुटांवरून मला काहीही इजा न पोचविता जंगलात निघून गेला. हे केवळ त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळेच.
- सुनील वाडेकर, "लेपर्ड मॅन' तथा वनपाल
---
माझं पहिलं प्रेम विभागून आहे. ते म्हणजे, पत्नी अनुराधा आणि माझ्या जखमी पक्ष्यांतील गरुडावर. दीड वर्षापूर्वी वादळच्या तडाख्यात झाड पडले. त्यावरील गरुडाची दोन पिल्ले घरट्यासह खाली पडली. नाइलाजास्तव मी त्यांना घरी घेऊन आलो. त्यांच्यावर उपचार केले. दोन्ही पिल्ले मस्ती करत माझ्या घरात राहिलो, त्यांना माझा लळा लागला. माझ्या हातानेच ते खायचे. त्यांना बरे करून पुन्हा जंगलात सोडले.
-चंद्रकांत दुसाने, पक्षीमित्र
---
शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यावर माझं पहिलं प्रेम परसबागेवर जडले. परसबागेत तीनशे प्रजातींच्या वनस्पती लावल्या. त्यात निम्म्या वनौषधी आहेत. भाजीपालाही मी टेरेसमध्ये तयार करते. वनस्पतींवर प्रेम केल्यास त्यादेखील तुमच्याशी बोलतात.
-प्रमिला पाटील, परसबागप्रेमी
---
व्यवसायाने मी जरी वकील असलो, तरी निसर्गात भ्रमंती करणे हेच माझं पहिलं प्रेम. आजपर्यंत मी देशातील जवळपास सर्व अभयारण्ये पाहिली आहेत. जगाला वळसा घालून आलोय. त्यावर पुस्तकेदेखील लिहिलीत. शिवाय डॉ. प्रकाश आमटे यांचे कामदेखील माझं पहिलं प्रेम आहे. भटकंतीतून खूप शिकायला मिळाले. आरोग्य उत्तम राहण्याचा हा राजमार्ग गवसला.
-रमेश वैद्य, भ्रमंतीकार
---
दुर्मिळ होत चालेल्या चिमण्या हे माझं पहिलं प्रेम. मी लहान होतो, त्या वेळी घराजवळ पाच-पन्नास चिमण्या हमखास दिसत. पूर्वी गृहिणी अंगणात धान्य साफ करत, त्या वेळी चिमण्या जवळ येऊन किलबिलाट करीत असत. पण आज वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे त्यांना राहण्यास जागा उरली नाही. त्यामुळे चिमण्यांची संख्या कमी झाली आहे. मी आजपर्यंत त्यांना दाणा-पाण्याची व्यवस्था माझ्या घरी करीत आहे. चिमण्यांमुळे मी एक पक्षी अभ्यासक बनलो व लोकांनी मला पक्षीमित्र पदवी बहाल केली.
-दिगंबर गाडगीळ, ज्येष्ठ पक्षीमित्र