पक्ष्यांसाठीही मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा
पुणे - नदीकाठच्या परिसरात, मोकळ्या जागांवर, टेकडीवर, इमारतीच्या गच्चीवर पतंग उडविण्याची हौस पक्ष्यांसाठीही मृत्यूचा सापळा ठरत आहे. दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यांच्या कालावधीत जवळपास हजारहून अधिक पक्षी जखमी होतात, तर दोनशेहून अधिक पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे.
पुणे - नदीकाठच्या परिसरात, मोकळ्या जागांवर, टेकडीवर, इमारतीच्या गच्चीवर पतंग उडविण्याची हौस पक्ष्यांसाठीही मृत्यूचा सापळा ठरत आहे. दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यांच्या कालावधीत जवळपास हजारहून अधिक पक्षी जखमी होतात, तर दोनशेहून अधिक पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे.
मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा गेल्या काही वर्षांत वाढली आहे. जानेवारीपासून मार्च-एप्रिलपर्यंत जागोजागी पतंग उडविणारे दिसून येतात. मुंबई-पुण्यासह अनेक शहरांमध्ये पतंग उडविण्याची ‘क्रेझ’ दिवसेंदिवस वाढत आहे. पतंग उडविण्याचा काहींचा आनंद इतरांसाठी मात्र जीवघेणा ठरत असल्याचे निदर्शनास येते. चिनी नायलॉन मांजावर बंदी असली, तरीही या मांजाची सर्रास विक्री होत असून, त्यामुळे पक्ष्यांचा जीव जाण्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही. हा मांजा तुटण्यासाठी कठीण असल्याने तो पंखात अडकला की पक्ष्यांना तो चोचीने तोडता येत नाही. अनेकदा विजेच्या तारांमध्ये अडकलेल्या या दोऱ्यांमध्ये अडकून तडफडून पक्ष्यांचा मृत्यू होतो, तर काही वेळेस पक्षी गंभीर जखमी होतात.
जानेवारी ते मार्च या कालावधीत कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील प्राणी अनाथालयामध्ये मांजामुळे जखमी झालेले जवळपास तीनशेहून अधिक पक्षी दाखल होतात. यामध्ये कावळे, घुबड, कबुतरे, घारी यांचे प्रमाण तुलनेने अधिक असते.
चायनीज मांजावर बंदी असल्याने नागरिकांनी पतंग उडविण्यासाठी पारंपरिक मांजा वापरावा, असे आवाहन पक्षी अभ्यासकांनी केले आहे.
दरवर्षी एक हजाराहून अधिक पक्षी होतात जखमी
त्यातील जवळपास दोनशे पक्षी गमावतात जीव
जानेवारी ते एप्रिल महिन्यांत घटनांमध्ये वाढ
घुबड, कावळा, पारवा, घार अशा पक्ष्यांची संख्या तुलनेने अधिक
मांजामुळे शहरात दरवर्षी जवळपास एक हजारांहून अधिक पक्षी जखमी होतात. त्यातील तीनशे पक्षी अनाथालयात नागरिकांमार्फत दाखल केले जातात. दरवर्षी दोनशेहून अधिक पक्ष्यांचा या कारणामुळे मृत्यू होतो. पक्ष्यांच्या चोचीने चिनी नायलॉन मांजा तुटत नसल्यामुळे तो जीवघेणा ठरत आहे. मांजामध्ये अडकलेल्या पक्ष्यांचे पाय, पंख कापले जातात, परिणामी काही पक्ष्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येते. पक्ष्यांच्या मानेभोवती मांजा अडकल्याने त्यांच्या मानेलाही गंभीर दुखापत होत आहे. अनाथालयाबरोबरच पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांकडेही नागरिक जखमी पक्ष्यांना घेऊन जातात. ही संख्याही लक्षणीय आहे.
- डॉ. अंकुश दुबे, पशुवैद्यकीय अधिकारी, कात्रज प्राणीपक्षी अनाथालय