पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीचा विळखा
इचलकरंजी - पंचगंगा नदी पात्रातील दूषित पाण्याची तीव्रता ठळकपणे पुढे आली आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात या पात्राला जलपर्णीचा विळखा बसण्याची सूचना आतापासूनच मिळू लागली आहे. रुई (ता. हातकणंगले) येथील नदी पात्रात एक इंचही जागा जलपर्णीविना रिकामी नाही. त्यामुळे पंचगंगा नदी पात्राची अवस्था खेळपट्टीवरील हिरवळीप्रमाणे दिसू लागली आहे.

दरवर्षी जानेवारी ते मे या महिन्यात पंचगंगा नदी पात्राला प्रदूषणाचा विळखा पडतो. पाणी वाहते राहिले तर प्रदूषणाची तीव्रता कमी प्रमाणात जाणवते. मात्र ठिकठिकाणच्या बंधाऱ्यावर पाणी आडवून ठेवल्यास प्रदूषणाची तीव्रता अधिक वाढते. बंधाऱ्याला फळ्या घातल्याने पाणी अधिक दूषित होते, हे वास्तव असले तरी फळ्या काढल्यानंतर पाणी पुढे गेल्यावर त्या परिसराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. याचबरोबर या वर्षी धरणातील पाणी कमी प्रमाणात सोडण्याचे नियोजनामुळे वेळोवेळी येणारे पाणी ठिकठिकाणी अडविले जात आहे.
नदी पात्रातील पाण्यात मोठ्या प्रमाणात मैलाचे प्रमाण असल्यास जलपर्णी अधिक गतीने वाढते असे यापूर्वीच आढळून आले आहे. कोल्हापूरपासून रुई बंधाऱ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात मैलायुक्त पाणी नदीत मिसळल्यामुळेच सध्या पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. सध्या या जलपर्णीची वाढ गतीने होऊ लागली आहे. एक दोन इंचाच्या आकाराचेच पानाची वाढ येत्या काही दिवसात होणार आहे, मात्र तत्पूर्वीच पात्र खेळाच्या मैदानावरील हिरवळीसारखे बनले आहे.
सध्या नदी पात्राच्या या स्थितीला पाणी प्रवाहित ठेवणे हा एकमेव उपाय आहे. मात्र धरणातील साठवणूक क्षमतेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे या वर्षी उन्हाळ्यात पंचगंगा नदी प्रवाहित होण्याची धुसर शक्यता आहे. परिणामी हे पाणी या वर्षी अधिकच दूषित होणार असल्याचे आतापासूनच दिसू लागले आहे.
पाणीटंचाईचा धोका
नदी पात्रात दूषित पाणी आल्यानंतर अनेक नळपाणी योजना बंद ठेवल्या जातात. या वर्षी या योजना दीर्घ कालावधीसाठी बंद राहणार असल्याचे संकेत आतापासूनच दिसत आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यात हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.