मुंबई - नाट्य परिषदेच्या निवडणुकीत माजी नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी मोहन जोशी पॅनेलला पाठिंबा दिल्याचा संदेश वॉट्सऍपवर फिरत आहे. त्या संदर्भात गंगाराम गवाणकर यांनी थेट पत्रकच काढून दोन्ही पॅनेलला पाठिंबा आणि शुभेच्छा असल्याचे म्हटले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी 4 मार्चला मतदान होणार आहे. परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांचा अर्ज बाद झाला असला, तरी दीपक करंजीकर व सहकारी हे मोहन जोशी पॅनेल नावानेच निवडणूक लढवत आहेत. या प्रचाराच्या रणधुमाळीत दोन दिवसांपासून मोहन जोशी यांच्या पॅनेलला माजी संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी पाठिंबा दिला असल्याचा संदेश फिरत आहे.
अध्यक्षपदाचे उमेदवार प्रसाद कांबळी हे मच्छिंद्र कांबळी यांचे पुत्र आहेत. गंगाराम गवाणकरांनी लिहिलेल्या आणि मच्छिंद्र कांबळी यांची निर्मिती असलेल्या "वस्त्रहरण' या नाटकाने अनेक विक्रम केले होते. त्यामुळेच वॉट्सऍपवर गवाणकर यांचा जोशी पॅनेलला पाठिंबा अशा आशयाचा संदेश फिरू लागल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
नाट्यनिर्माता संघाच्या अध्यक्षपदावरूनही वाद? प्रसाद कांबळी व भरत जाधव हे नाट्यनिर्माता संघाचे सदस्य नसल्यामुळे त्यांचे अर्जच बाद व्हायला हवे होते. मात्र तसे न होता प्रसाद कांबळी हे थेट अध्यक्षपदी विराजमान झाले. संबंधित वाद हा धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणीसाठी गेला असल्याचे पत्र वॉट्सऍपच्या माध्यमातून विविध ग्रुपवर प्रसारित झाले आहे. नेमके निवडणुकीच्याच तोंडावर हे पत्र का प्रसारित झाले, अशी चर्चा सध्या नाट्यकर्मींमध्ये रंगली आहे.