मुलासह आईची विहिरीत आत्महत्या
नागाव - कासारवाडी (ता. हातकणंगले) येथे आईने मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्रियांका उमेश माने (वय २५) व पार्थ उमेश माने (६) अशी त्यांची नावे आहेत. हा प्रकार रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
नागाव - कासारवाडी (ता. हातकणंगले) येथे आईने मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्रियांका उमेश माने (वय २५) व पार्थ उमेश माने (६) अशी त्यांची नावे आहेत. हा प्रकार रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
दुपारी अडीचच्या सुमारास प्रियांका माने यांचा मृतदेह मिळाला. मात्र, अंधार पडताच पाणबुड्यांनी शोधमोहीम थांबविल्याने पार्थचा मृतदेह शोधण्यास थोडा विलंब झाला. रात्री आठच्या सुमारास पार्थचाही मृतदेह मिळाला.
याबाबत पोलिस व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी - प्रियांकाचे सासर व माहेर कासारवाडीच आहे. सात वर्षांपूर्वी प्रियांकाचा उमेश यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर वर्षाच्या आत उमेश यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर प्रियांका आपल्या माहेरच्या घरी पार्थसह स्वतंत्र राहत होत्या.
आज दुपारी त्या पार्थला घेऊन घरातून बाहेर पडल्या.
धरणाचा माळ येथे शेतातील विहिरीत त्यांनी पार्थसह उडी घेऊन आत्महत्या केली. विहिरीशेजारील शेतात शाळू खुडत असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याचा आवाज ऐकून विहिरीकडे धाव घेतली. दरम्यान, पाण्यात उडी घेणाऱ्या प्रियांकाच असल्याची खात्री ग्रामस्थांना झाली. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिस आल्यानंतर मृतदेह शोधण्यास सुरवात झाली. प्रियांकाच्या घरी त्यांची आई एकटीच राहते. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवास पोवार तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक सूरज गुरव यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पार्थचा मृतदेह शोधण्यासाठी जीवनरक्षक दिनकर कांबळे यांना बोलावले.