शिवछत्रपती पुरस्कारासाठी २५ खेळाडूंचा कस
कोल्हापूर - शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी कोल्हापुरातील किमान २५ खेळाडूंचा कस लागेल, असे चित्र आहे. विविध क्रीडा प्रकारातील गाजलेल्या खेळाडूंनी, क्रीडा प्रशिक्षकांनी, क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज केले आहेत.
कोल्हापूर - शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी कोल्हापुरातील किमान २५ खेळाडूंचा कस लागेल, असे चित्र आहे. विविध क्रीडा प्रकारातील गाजलेल्या खेळाडूंनी, क्रीडा प्रशिक्षकांनी, क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज केले आहेत. तीन वर्षे हे पुरस्कार निकष व इतर तांत्रिक बाबीत रखडले होते. त्यामुळे या वर्षी पुरस्कारासाठी खेळाडूंची संख्या मोठी असणार आहे.
कोल्हापुरातील ७५ जणांनी पुरस्कारासाठी अर्ज केले आहेत. त्यातील खेळाडूंचा दर्जा पाहता किमान २५ जण या यादीत सन्मानाने असतील, अशी परिस्थिती आहे. एका वेळी २५ च्या आसपास खेळाडू पुरस्काराच्या यादीत आले, तर तो कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेचा मोठा गौरव ठरू शकणार आहे.
मुंबई-पुण्यानंतर कोल्हापूरचे नाव
कोल्हापुरात अलीकडच्या काही वर्षांत क्रीडा क्षेत्रात नवोदित खेळाडूंनी फार मोठी कामगिरी केली आहे. कबड्डी, फुटबॉल, कुस्ती या पारंपरिक खेळांबरोबरच जलतरण, स्केटिंग, नेमबाजी, वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, धनुर्विद्या अशा खेळातही कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबई-पुण्यानंतर कोल्हापूरचे नाव त्यामुळे आकाराला आले आहे.
शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंबरोबरच क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला व क्रीडा प्रशिक्षकाला देण्यात येतो. एक लाख रुपये, प्रशस्तीपत्र व जिरेटोपाचे शिल्प असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जीवन गौरव पुरस्कारासाठी तीन लाख रुपये व सन्मानपत्र आहे. हा पुरस्कार दिग्गज खेळाडू किंवा दिग्गज प्रशिक्षक, कार्यकर्त्याला दिला जातो. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची पोहोचपावती या पुरस्काराच्या निमित्ताने दिली जाते.
यापूर्वीही कोल्हापूरच्या खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कारावर आपले नाव जरूर नोंदवले आहे; पण गेली तीन वर्षे या पुरस्कारांची घोषणाच झाली नव्हती. पुरस्काराचे निकष काय असावेत, कसे असावेत या तांत्रिक अडचणीत हे पुरस्कार अडकले होते. अर्थात त्यामुळे पुरस्कारासाठी आलेले अर्जही प्रतीक्षेवर होते. कोल्हापुरात सादर झालेल्या अर्जांचा विचार करता किमान २५ जण या पुरस्कारावर आपली मोहोर उठवू शकतील या ताकदीचे आहेत. त्यामुळे या पुरस्काराच्या घोषणाकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.