नोटांची मोजदाद संपता संपेना!
नोटाबंदीचा लेखाजोखा
निर्णय : 8 नोव्हेंबर 2016
रद्द नोटा : पाचशे व एक हजार रुपये
पाचशेच्या नोटा : 1,716.5 कोटी
हजारच्या नोटा : 685.8 कोटी
एकूण मूल्य : 15.44 लाख कोटी रुपये
जमा नोटा : 15.28 लाख कोटी रुपये
जमा न झालेल्या नोटा : 16,050 कोटी रुपये
(स्रोत : रिझर्व्ह बॅंकेचा 2016-17 चा वार्षिक अहवाल)
नवी दिल्ली : नोटाबंदीला 15 महिने उलटल्यानंतरही रद्द झालेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांची मोजदाद करण्याची प्रक्रिया सुरूच असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. रद्द नोटांची अचूक आकडेवारी मिळविण्यात येत असल्याने याला विलंब लागत असल्याचे बॅंकेने नमूद केले आहे.
याबाबत माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बॅंकेकडे विचारणा करण्यात आली होती. बॅंकेने म्हटले आहे, की रद्द नोटांची अचूक आकडेवारी मिळावी यासाठी ताळेबंद पुन्हा तपासण्यात येत आहेत. ही सर्व प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिझर्व्ह बॅंकेकडे 30 जून 2017 पर्यंत 15.28 लाख कोटी रुपयांच्या पाचशे व एक हजारच्या रद्द नोटा जमा झालेल्या होत्या. जमा झालेल्या नोटांची आकडेवारी पुन्हा पडताळून पाहिली जात आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमा झालेल्या रद्द नोटांची आकडेवारी जाहीर करण्यात येईल.
नोटा मोजणीच्या प्रक्रियेची अंतिम मुदत कधी, अशी विचारणाही करण्यात आली होती. यावर बॅंकेने म्हटले आहे, की जलद गतीने नोटांची मोजणी सुरू आहे. सद्य:स्थितीत 59 "करन्सी व्हेरिफिकेशन ऍण्ड प्रोसेसिंग' (सीव्हीपीएस) यंत्रे यासाठी वापरण्यात येत आहेत. याचबरोबर खासगी बॅंकांकडे असलेल्या आठ "सीव्हीपीएस' यंत्रांचाही वापर करण्यात येत आहे. तसेच, सात "सीव्हीपीएस' यंत्रे भाडेतत्त्वावर घेण्यात आली असून, ती रिझर्व्ह बॅंकेच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये बसविण्यात आली आहेत.
केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. या नोटा बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी ठराविक कालावधी देण्यात आला होता. रिझर्व्ह बॅंकेने 2016-17 चा वार्षिक अहवाल गेल्या वर्षी 30 ऑगस्टला जाहीर केला होता. यात म्हटले होते की, 15.28 लाख कोटी रुपयांच्या रद्द नोटा बॅंकांकडे परत आल्या आहेत. म्हणजेच रद्द नोटांपैकी 99 टक्के नोटा परत आलेल्या आहेत. 30 जून 2017 पर्यंत केवळ 16 हजार 50 कोटी रुपयांच्या रद्द नोटा परत आलेल्या नाहीत. एकूण 15.44 लाख कोटी रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या.
नोटाबंदीचा लेखाजोखा
निर्णय : 8 नोव्हेंबर 2016
रद्द नोटा : पाचशे व एक हजार रुपये
पाचशेच्या नोटा : 1,716.5 कोटी
हजारच्या नोटा : 685.8 कोटी
एकूण मूल्य : 15.44 लाख कोटी रुपये
जमा नोटा : 15.28 लाख कोटी रुपये
जमा न झालेल्या नोटा : 16,050 कोटी रुपये
(स्रोत : रिझर्व्ह बॅंकेचा 2016-17 चा वार्षिक अहवाल)