पीएमपी बसला आग
पिंपरी - निगडीवरून पुण्याच्या दिशेने चाललेल्या पीएमपीएमएलच्या बसला अचानक आग लागली. ही घटना पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर सोमवार (ता.१२) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
पिंपरी - निगडीवरून पुण्याच्या दिशेने चाललेल्या पीएमपीएमएलच्या बसला अचानक आग लागली. ही घटना पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर सोमवार (ता.१२) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीवरून पुण्याच्या दिशेने जाणारी बस मोरवाडी चौक येथे दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आली. त्या वेळी चालकाला बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे दिसले. चालक आणि वाहक यांनी बसमधील प्रवाशांना त्वरित खाली उतरण्यास सांगितले. तसेच, अग्निशामक दलास वर्दी दिली. काही मिनिटांतच बसच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला व बसला आगीच्या ज्वाळांनी वेढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अवघ्या काही मिनिटांत ही आग विझविण्यात आली.
आगीचे व धुराचे लोट बसमधून बाहेर येत असल्याने परिसरात पूर्ण धूर पसरला. धुराचे लोट प्रचंड असल्याने रस्त्यावरील वाहने दिसणे कठीण होते. त्यामुळे मोरवाडी चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे मोरवाडी ते चिंचवड स्टेशनदरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर येथील वाहतूक सुरू झाली.
अग्निशामक दलाचे जवान मनोज मोरे, सरोश फुंदे, सुशीलकुमार राणे, नवनाथ शिंदे, संदीप जगताप, प्रदीप भिलारे यांनी आग विझविण्यात पुढाकार घेतला होता.