द बॉस! (ढिंग टांग!)
बेटा : (सॉल्लिड एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...आय ऍम बॅक, मम्मा!
मम्मामॅडम : (खुर्चीतून ताडकन उठून उभं राहात) येस, येस बॉस! गुड मॉर्निंग, बॉस!
बेटा : (हुकमत गाजवत) व्हेरी गुड मॉर्निंग!! आय होप थिंग्ज आर ऍब्सोल्युटली इन प्लेस...व्हाइल आय वॉज अवे!!
मम्मामॅडम : (गोंधळून) अं?
बेटा : (खांदे उडवत) कळलं नाही? सगळं ठीकठाक आहे ना?
बेटा : (सॉल्लिड एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...आय ऍम बॅक, मम्मा!
मम्मामॅडम : (खुर्चीतून ताडकन उठून उभं राहात) येस, येस बॉस! गुड मॉर्निंग, बॉस!
बेटा : (हुकमत गाजवत) व्हेरी गुड मॉर्निंग!! आय होप थिंग्ज आर ऍब्सोल्युटली इन प्लेस...व्हाइल आय वॉज अवे!!
मम्मामॅडम : (गोंधळून) अं?
बेटा : (खांदे उडवत) कळलं नाही? सगळं ठीकठाक आहे ना?
मम्मामॅडम : (उजळलेल्या चेहऱ्यानं) काहीही ठीक नाहीए! बेरोजगारी प्रचंड वाढली आहे! महागाईनं कळस गाठला आहे! शेतकऱ्यांची अवस्था करुण आहे! गरीब मजदूरांच्या हालास पारावार उरलेला नाही! समाजा-समाजात तेढ वाढीस लागली आहे आणि सरकार थापा मारण्यात दंग आहे!! एव्हरीथिंग इज अ बिग मेस, बॉस!!
बेटा : (खचून जात) बाप रे!! एव्हरीथिंग अ बिग मेस?
मम्मामॅडम : (कौतुकानं) येस...पण त्याचं क्रेडिट तुम्हालाच आहे, बॉस!!
बेटा : (गोंधळून) मला क्रेडिट?
मम्मामॅडम : (खिडकीपाशी जाऊन एक दीर्घ श्वास घेत) मला पुन्हा एकदा लोकशाहीचा सुगंध येतो आहे, बॉस! वारे वाहू लागले आहेत...बॉस!
बेटा : (नाकपुड्या फेंदारत) ओव्हनमध्ये पिझ्झा जळतोय बहुतेक! मला त्याचाच वास येतोय!!
मम्मामॅडम : (छद्मी हसत) हा पिझ्झा जळल्याचा वास नसून नतद्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या जळकू राजकारणाचा दर्प आहे, बॉस!!
बेटा : (वैतागून) सारखं सारखं बॉस काय म्हणतेस?
मम्मामॅडम : (जावळातून हात फिरवत) बिकॉज यू आर द बॉस! माझ्यासाठीसुध्दा!! मी आता चूक सुधारली आहे!!
बेटा : (कुतुहलानं) कुठली?
मम्मामॅडम : (निर्धारानं) मी तुला बेटा म्हणत होते, म्हणून सगळेच तुला बेटा समजत होते!! आता मी तुला बॉस म्हणणार, म्हंजे सगळे तुला बॉस समजतील!!
बेटा : (खुशीखुशीत) आहेच मी बॉस!! काल अहमद अंकलसुध्दा मला बॉस म्हणाले!! मला पहिल्यांदा कळलंच नाही! मी मागे वळून पाहायला लागलो!! तर म्हणाले, ""बेटा, तुम्हेंही मैं बॉस कह रहा हूं!!'' हाहा!! अशी गंमत!!
मम्मामॅडम : (हाताची घडी घालत) आता तुला सवय करायला हवी...बॉस म्हणवून घेण्याची!!
बेटा : (स्वप्नाळू आवाजात)...म्हंजे मी खरंच आता पीएम होणार?
मम्मामॅडम : (जावळातून प्रेमाने हात फिरवत) येस बॉस!! ही काळ्या दगडावरची रेघ!! पण त्यासाठी बरंच काम करायला हवंय!!
बेटा : (निरागसपणे) म्हंजे नेमकं काय करायचं मम्मा?
मम्मामॅडम : (राजकारणी सुरात)...जनता त्रस्त झालेली असतानाच आपण हल्ला करणं गरजेचं आहे!! चला, कार्यकर्त्यांची फळी तयार करा!! कामाला लागा!!
बेटा : (चक्रावून) कार्यकर्त्यांची फळी करायची म्हंजे? आपल्या पार्टीत तर फक्त नेतेच उरले आहेत असं म्हणत होतीस ना?
मम्मामॅडम : (दुर्लक्ष करत)...पहिली लढाई कर्नाटकची!! सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधण्याचं काम मी करीन!! एकदा कर्नाटक हातात आलं की पुढचं रणमैदान सोपं जाणार आहे!! गुजराथपेक्षाही मोठं यश मिळायला हवं!!
बेटा : (स्फुरण चढत) ते माझ्यावर सोड मम्मा!! माझा गेम प्लान तयार आहे!!
मम्मामॅडम : (कौतुकानं) ह्याला म्हणतात खरा बॉस!! काय आहे गेम प्लान?
बेटा : (निर्धारयुक्त सुरात) गुजराथेत मी सव्वीस देवळं हिंडलो!! कर्नाटकात तर देवळंच देवळं आहेत!! ही बघ, मी यादीच तयार केली आहे...गोकर्ण महाबळेश्वर किंवा दक्षिण काशी, मुकांबिका मंदिर, उडपीचं श्रीकृष्ण मंदिर, मंजुनाथ मंदिर, मुर्डेश्वर, सुब्रमण्यम, दुर्गापरमेश्वरी...सो ऑन! ऍम आय राइट मम्मा?
मम्मामॅडम : (खुर्चीत मटकन बसत) यू आर द बॉस!