जानवलीतील रामेश्वरनगरात घरफोड्या
कणकवली - जानवली येथील रामेश्वरनगरात रविवारी (ता. ११) पहाटे दोन कॉम्प्लेक्ससह दोन बंद बंगल्यांत चोरी करून दोघा संशयितांनी रोख रक्कम, सोन्याचे दागने मिळून एक लाख रुपयांचा ऐवज पळविला. पहाटे २ ते ३ च्या सुमारास ही चोरी झाली.
कणकवली - जानवली येथील रामेश्वरनगरात रविवारी (ता. ११) पहाटे दोन कॉम्प्लेक्ससह दोन बंद बंगल्यांत चोरी करून दोघा संशयितांनी रोख रक्कम, सोन्याचे दागने मिळून एक लाख रुपयांचा ऐवज पळविला. पहाटे २ ते ३ च्या सुमारास ही चोरी झाली.
दोघे संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून जाताना दिसल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांनी सांगितले. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनी तपासणी केली; मात्र पोलिसांच्या हाती काही सापडले नाही. परराज्यातील संशयितांनी हे कृत्य केले असावे, असा संशय पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी व्यक्त केला आहे.
रामेश्वरनगरातील जयभवानी निवासी संकुलाच्या पहिल्या मजल्यावर प्रशांत जयंत रसाळ (वय २९) यांच्या बंद खोलीच्या दरवाजाचा कडीकोयंडा कापून संशयितांनी आत प्रवेश केला. खोलीच्या कपाटातील २५ हजार रोख, ४८ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच त्यांच्या लगतच्या सुरेश मालवीद यांच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप कापून त्यांच्या घरातील कपाटातील ११ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत.
त्याच परिसरातील ऋग्वेद अपार्टमेंटमधील कांचन मांजरेकर यांच्या खोलीच्या दरवाजाचा कडीकोयंडा कापून संशयितांनी कपाटातील काही दागिने आणि रोख रक्कम पळविली. त्याच इमारतीमधील विष्णू बालटकर आणि सुधीर साळवी यांच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप फोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे. हा चोरीचा प्रकार पहाटेच्या सुमारास झाला. चोरट्यांच्या हालचालीने अनेकजण बाहेर आले. मात्र चोरट्यांनी पलायन केले.
चोरीची माहिती प्रशांत रसाळ यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांच्या पथकाने पंचनामा केला. दुपारी बाराच्या सुमारास श्वानपथक दाखल झाले, ते रस्त्यावर येऊन घुटमळले. याच परिसरात गेल्या डिसेंबरमध्ये दिवसा गजानन सावंत यांच्या घरातील दागिन्यांची चोरी झाली होती. या प्रकारानंतर रहिवाशांनी आता सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. खोत यांनी सांगितले. चोरीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून सुरक्षारक्षक नेमावेत, सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे, असेही मत श्री. खोत यांनी व्यक्त केले आहे.